वाहनचालकांसाठी अडथळ्यांची शर्यत; वाहतूक कोंडीचा नागरिकांना फटका

भिवंडी शहरात माणकोली गावाच्या बाजूने प्रवेश करताना होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहराच्या प्रवेशद्वारावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून दोन मार्गिकेत उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उजव्या मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले. दुसऱ्या बाजूच्या डावीकडील मार्गिकेचे काम काही महिन्यांपासून रखडलेले आहे.

डाव्या बाजुच्या मार्गिकेचे खांब, त्यावरील तुळया (गर्डर) टाकण्याची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. ही कामे वेगाने पूर्ण करण्यात येत नसल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना अडथळ्याची शर्यत पार  करत प्रवास करावा लागत आहे.

भिवंडीत अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. दूरवरून येणारे मालवाहू ट्रक शहरात शिरण्यास वाव नसल्याने राष्ट्रीय महामार्गावर या वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. दूरवरून प्रवास करून येणारी मालवाहू वाहने राष्ट्रीय महामार्गावरून माणकोली बाजूने शहरात प्रवेश करतात. हे वळण घेत असताना नेहमी शहराच्या प्रवेशद्वारावर वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपुलाची मागणी पुढे आली. त्यानुसार गेल्या वर्षी उड्डाणपूलाच्या उजव्या मार्गिकेचे काम घाईने पूर्ण करण्यात आले. दुसरी मार्गिका लवकरच पूर्ण होऊन या भागातील कोंडी सुटेल, असे आश्वासन ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी  दिले होते. मात्र मार्गिकेचे काम पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे.

एमएमआरडीएची टोलवाटोलवी

या पुलाचे काम का रखडले आहे ही विचारणा करण्यासाठी एमएमआरडीएच्या अभियंत्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता याविषयी कुणीही बोलण्यास तयार नव्हते. जनसंपर्क विभागातील सुचिता कदम यांनी यासंदर्भात मिडिया विभागाचे संजय क ऱ्हाडे यांना संपर्क करण्यास सांगितले. क ऱ्हाडे यांनी माहिती घेऊन सांगतो असे सांगितले खरे मात्र त्यानंतर प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे एमएमआरडीएकडून या पुलाचे काम रखडले आहे. ते गती का घेत नाही, यासंदर्भातची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.