ठाणे : शहरातील मुख्य आणि अंतर्गत मार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम संबंधित प्राधिकरणांकडून सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे शनिवारी दिवसभर ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रात्री विविध संस्थांकडून सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी सत्कार सोहळय़ांच्या परिसरातील वाहतूक पोलिसांनी वाहने रोखून धरली होती. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडली. 

मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाण्यातील साकेत पूल ते भिवंडीतील रांजनोली नाका, मुंब्रा बाह्यवळण मार्ग आणि कळवा या भागात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. साकेत आणि खारेगाव खाडीपुलावरील खड्डे बुजविण्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने शनिवारी सुरू केले. त्याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर झाला. पर्यटनासाठी नागरिक मोठय़ा संख्येने बाहेर पडल्याने  कोंडीत भर पडली.