कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील झाडांवर करण्यात आलेली विद्युत रोषणाई काढून टाकून पालिकेच्या उद्यान विभागाने पालिका हद्दीतील वृक्ष प्रदूषक रोषणाई मुक्त केले आहेत. गेल्या आठवड्यापासून ही मोहीम उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने सुरू केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिका हद्दीतील अनेक झाडांवर काही हाॅटेल, ढाबे मालकांनी विद्युत रोषणाई करून झाडांचे विद्रुपीकरण, विद्युत रोषणाई करून प्रदूषण निर्माण केले होते. झाडांवरील पक्ष्यांच्या अधिवासाला, जैवविविधतेला धोका पोहोचविला होता. याविषयी मुंबई उच्च न्यायलयात एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावेळी न्यायालयाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व पालिकांना आपल्या हद्दीत झाडांंवर विविध व्यावसायिक, नागरिकांकडून करण्यात आलेली विद्युत रोषणाई तातडीने हटविण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा – ठाणे: सहस्त्रपती स्पर्धक; अब्जाधीश उमेदवारांसमोर अपक्ष, छोट्या पक्षांच्या उमेदवारांचे आव्हान

कल्याण डोंबिवली पालिकेने टिटवाळा, कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम, शिळफाटा रस्ता भागातील झाडांवर हाॅटेल्स व्यावसायिक, शिकवणी चालक, विकासक, गॅरेज चालक, ढाबे मालक यांनी केलेली विद्युत रोषणाई काढून टाकली. याशिवाय झाडांवर खिळे ठोकून जाहिराती लावणे, झाडांना बाधा होईल अशा प्रकारची कृती करणे अशा नागरिकांवर कारवाई करण्याचा निर्णय मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी घेतला आहे.

पालिका हद्दीतील सुमारे तीनशेहून अधिक झाडांवरील विद्युत रोषणाई काढून टाकण्यात आली आहे. या कामासाठी उद्यान विभागाने विशेष पथके तयार केली होती. झाडांना विद्युत रोषणाई केल्याने या झाडांवरील पक्ष्यांच्या अधिवासाला धोका उत्पन्न होत असल्याचे, याशिवाय झाडावर विविध प्रकारचे परिणाम होत असल्याची निरीक्षणे पर्यावरण अभ्यासकांनी काढली आहेत. मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीचे उद्यान अधीक्षक महेश देशपांडे आणि पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा – शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनामुळे ठाणेकर कोंडीत

पालिका हद्दीतील झाडांवर नागरिक, व्यावसायिकांकडून करण्यात आलेली सर्व विद्युत रोषणाई काढून टाकण्यात आली आहे. अशाप्रकारची कृती कोणीही केली तर त्यांच्यावर यापुढे कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच झाडांना खिळे ठोकून जाहिराती लावणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. – संजय जाधव, मुख्य उद्यान अधीक्षक, कडोंंमपा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trees in kalyan dombivli free of electric lighting ssb