महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या एका व्यक्तीला आणि त्याला सहाय्य करणाऱ्या महिलेला ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बदलापुरातून अटक केली.
बदलापूर पश्चिमेकडील स्टेशन रोडजवळील रस्त्यावर एक इसम आणि एक महिला एकमेकांशी संपर्क साधून काही महिलांना बोलावून त्यांना ग्राहकांकडे सोपवणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखा ठाण्याच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शरद पंजे यांनी आपल्या पथकासह रात्री ११.३० च्या सुमारास कारवाई केली. यात युसूफ सिद्धिकी (५५) आणि उषा कातांगळे (४०) या दोघांसह चार पीडित महिलांनाही ताब्यात घेतले. युसूफ हा उषा कातांगळे हिला दूरध्वनी करून वेश्याव्यवसायासाठी काही महिलांची मागणी करीत होता. उशा ही महिलांना पैशाचे आमिष दाखवून युसूफ याच्याकडे ग्राहकांना देण्यासाठी सुपूर्द करायची, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
महिलांना आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेतल्याबद्दल युसूफ आणि उशा यांच्याविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलांची सुटका करून त्यांची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक वांढेकर करत आहेत.