scorecardresearch

शिष्यवृत्ती सराव परीक्षेची दोन दशके

बोर्डाची परीक्षा म्हटले की सगळ्यांना आठवतात ती दहावी बारावीची वर्षे. या वर्षी मुलांना अभ्यासाचे टेन्शन येऊ नये, त्यांच्या मनावरील ताण हलका व्हावा यासाठी विविध संस्थांच्या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येते.

tv16बोर्डाची परीक्षा म्हटले की सगळ्यांना आठवतात ती दहावी बारावीची वर्षे. या वर्षी मुलांना अभ्यासाचे टेन्शन येऊ नये, त्यांच्या मनावरील ताण हलका व्हावा यासाठी विविध संस्थांच्या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येते. मात्र दहावी-बारावीच्या आधी अनेकांनी पूर्वप्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांच्या निमित्ताने बोर्डाच्या परीक्षेचा अनुभव घेतलेला असतो. शैक्षणिक पर्वातील ती पहिली स्पर्धात्मक परीक्षा असते. मात्र या परीक्षांसाठी कुठेही मार्गदर्शन शिबिरे होत नाहीत. डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली गेली दोन दशके या शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करत आहे.
१९९३ मध्ये डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने वर्षभर उपक्रम राबविण्याच्या हेतूने मंडळ कायमस्वरूपी नोंदणीकृत केले. वर्षभर कोणता उपक्रम राबवायचा याविषयी सल्लामसलत सुरू झाली आणि शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रम राबविण्याचा विचार पुढे आला. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रकाश जोशी यांनी शिष्यवृत्ती परीक्षांसाठीचे मार्गदर्शन वर्ग भरविण्याची कल्पना मांडली. सुरुवातीला पूर्वप्राथमिक शिष्यवृत्ती आणि पाच वर्षांनंतर सातवीला शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर वर्ग संस्थेने सुरू केले.
चौथी मराठीच्या मार्गदर्शनासाठी पहिल्या वर्षी पुण्यातले त्या वेळीचे स्कॉलरशिपचे सुप्रसिद्ध शिक्षक इनामदार सर आणि प्रकाश जोशी यांनी मार्गदर्शन केले. चौथीच्या मार्गदर्शनात मुलांबरोबर पालकांनाही आपल्या पाल्याची तयारी करून घेण्यासाठी सोप्या क्लृप्त्या कळाव्यात या हेतूने बसण्याची मुभा पहिल्या वर्षांपासूनच देण्यात आली. पुढे सात ते आठ वर्षे टिळक शाळेच्या मुख्याध्यापिका भट तसेच ठाण्याच्या सरस्वती शाळेच्या मनीषा जोगळेकर मार्गदर्शनासाठी येत होत्या. मंडळातर्फे लोकाग्रहास्तव सातवी मराठी माध्यमासाठीही मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले. भांडुपच्या अमरकोर शाळेतून सराव परीक्षेसाठी पेपर व उत्तरपत्रिका आणल्या जात होत्या. या मार्गदर्शन शिबिराचा आणि सराव परीक्षांचा मुलांना खूपच उपयोग होत आहे.
पालकांच्या वाढत्या आग्रहामुळे मंडळाने इयत्ता ४ थी आणि ७ वी इंग्रजी माध्यमासाठीही शिबीर आणि सराव परीक्षांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून स्कॉलरशिपच्या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक पंढरीनाथ राणे आणि त्यांचे सहकारी प्रकाश गावडे, अजय वाणी, शांताराम मेहर तसेच अंधेरीच्या दीक्षित बाई, डोंबिवलीच्या सुषमा देशपांडे, साने गुरुजी विद्यालयाच्या वैशाली ताम्हणे, ठाण्याच्या स्मिता हर्षे आणि दुसऱ्या वर्षांपासून सलग येणाऱ्या जोगळेकर या सर्वाचे मोलाचे मार्गदर्शन मुलांना मिळत आहे.
मंडळाच्या या उपक्रमाला आता संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला आहे. साधारणपणे गेली दहा वर्षे ७०० ते ८०० विद्यार्थी या उपक्रमाचा फायदा घेत आहेत. पालकांमध्येही या उपक्रमाची खूप चर्चा आहे, त्यामुळेच पालक आपली मुले तिसरीत असल्यापासूनच या उपक्रमाच्या चौकशीला सुरुवात करतात. डोंबिवलीमधील काही दानशूर व्यक्तींनी दिलेल्या देणग्यांमुळे मंडळ दरवर्षी साधारणपणे ७० ते ८० गरजू विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करत आहे. ठाणे, बोरिवली, वाशी, बदलापूर, वाडा आणि कल्याण येथील शाळांमधून दरवर्षी मुले या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. साधारणपणे दरवर्षी २५ ते ३० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाल्याचे पालकांकडून कळते आणि पालकांचे येणारे ते फोनच दरवर्षी पुन्हा हा उपक्रम करण्यासाठीची प्रेरणा कार्यकर्त्यांना देतात.
या वर्षी मंडळाच्या या उपक्रमाचे २१ वे वर्ष आहे. पण मंडळातील कार्यकर्त्यांच्या मनात एक सल आहे. स्कॉलरशिप मार्गदर्शन शिबीर आणि सराव परीक्षा हा उपक्रम गेली १५ वर्षे एकहाती समर्थपणे सांभाळणारे मंडळाचे माजी कार्यवाह चंद्रशेखर आजगांवकर तसेच नावनोंदणीची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या जयश्री राजवाडे या दोघांचे गेल्या वर्षी आकस्मिक निधन झाले. या उपक्रमादरम्यान मंडळातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना त्यांची उणीव नक्कीच जाणवणार आहे.
मंडळातर्फे या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या इयत्ता ४ थी व ७ वीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी पहिले मार्गदर्शन शिबीर गेल्या रविवारी १८ जानेवारीला झाले. आता २५ जानेवारी आणि १ फेब्रुवारीच्या रविवारी टिळकनगर विद्यामंदिर शाळेत शिबीर होईल. त्याचप्रमाणे ८ फेब्रुवारी रोजी सराव परीक्षेचेही आयोजन करण्यात आले असल्याचे संदीप वैद्य यांनी सांगितले. या शिबिरासाठी मंडळातील वरिष्ठ कार्यकर्त्यांचे तर हातभार आहेतच, मात्र नवीन येणारी पिढीही तेवढय़ाच हिरिरीने उतरून हे शिबीर यशस्वी करत आहे. त्यात प्रतीक वेलणकर, तन्मय गोखले, अमोल आठले, देवेंद्र कुलकर्णी, सोनाली गुजराथी, पल्लवी पळसुले यांचा सहभाग आहे.
शर्मिला वाळुंज

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two decades of scholarships practice tests

ताज्या बातम्या