तीव्र पाणीटंचाईमुळे शहर तसेच ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी वाढलेली वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी खासगी टँकरचालकांनी आता आपला मोर्चा चक्क खदाणींमधील अशुद्ध पाण्यांकडे वळविला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
विहिरी आणि कूपनलिकांचे पात्र खालावले आहे. अशा परिस्थितीत टँकरचालक कुठून पाणी भरतात, याचा फारसा विचार नागरिक आणि पालिका प्रशासनही करीत नाही. प्रत्यक्षात टँकरचालक ग्रामीण भागातील खदाणींमधून टँकरने पाणी भरून ते नागरिकांना पुरवत असल्याचे उघड झाले आहे. भोपर, उसरघर, संदप, उंबार्ली, आंतर्ली, हेडुसन, सोनारपाडा, दावडी आदी ग्रामीण भागांत १५ ते २० खदाणी आहेत. या खदाणींमध्ये साचलेले पाणी टँकरचालक उचलत असून तेच पाणी ग्रामीण भाग, उद्योगधंदे व शहरी भागातील नागरिकांना पुरवीत आहेत. रात्रीच्या वेळेस या खदाणींवर टँकर भरण्यासाठी टँकरच्या रांगा लागत असून यावर कोणाचेही अंकुश नाही. दहा हजार लिटरचा एक टँकर किंवा त्याहीपेक्षा मोठे टँकर या खदाणींमधून भरून नेले जातात, असे गावकरी सांगतात.
या टँकरचालकांवर कुणाचाही अंकुश नसून गावातील बडी मंडळी या टँकरचालकांकडून बक्कळ पैसा लाटून त्यांना या खदाणीतील पाणी पुरवीत आहेत. त्यामुळे एखादा गावकरी जर त्यांना अडविण्यासाठी गेला तर हे टँकरचालक त्यांना दमदाटी करतात. गावात खदाणी असूनही स्थानिकांना त्याचे पाणी मिळत नाही. टँकरचालक मात्र हे पाणी नेतात, त्यांना कुणी का अडवत नाही, असा प्रश्न ऊसरघर येथील गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

हे पाणी इतर उपयोगांसाठी
खदाणींमध्ये वर्षांनुवर्षे पाणी साचलेले असून त्यात कचराही मोठय़ा प्रमाणात आहे. या पाण्याचे शुद्धीकरण केले जाते का, असा प्रश्न एका टँकरचालकाला केला असता याविषयी मला काही माहिती नाही. आम्ही केवळ टँकर भरून ते पोहोचवायचे काम करतो, असे त्याने सांगितले. दुसऱ्या चालकाने सांगितले, हे पाणी पिण्यासाठी नाही, तर केवळ इतर वापरासाठी आम्ही देतो. मात्र सोसायटय़ांना तशी सूचना दिली जाते का, असे विचारले असता तो निरुत्तर झाला.

पालिकेचे मौन
शहरात असणाऱ्या तलावातील पाणी हे पिण्यासाठी तसेच वापरासाठीही योग्य नाही, अशी भूमिका घेणारे पालिका प्रशासन याविषयी मात्र गप्प आहे. खदाणीतील पाण्याची तपासणी कुणी केली आहे का? या पाण्याचा वापर शहरातील कोणत्या भागात केला जातो, यावर सध्या कुणाचेही नियंत्रण नाही.