वसई किल्ल्याला भेट दिल्यावर नरवीर चिमाजी अप्पांच्या शौर्याची, धडाडीची, नेतृत्वाची झळाळी जाणवू लागते. तीन बाजूंनी समुद्रांनी वेढलेला हा किल्ला अप्रतिम आहे. किल्ल्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे. वर चढायला पायऱ्याही आहेत. त्या चढून बुरूज व तटबंदीवरून आजूबाजूचा परिसर न्याहाळता येतो.

शाळेत शिकत असताना इतिहास हा विषय प्रिय असणारे विद्यार्थी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतील. त्या सनावळ्या, विविध राजांच्या राजवटी, त्यांनी हरलेल्या लढाया, केलेल्या स्वाऱ्या, जिंकलेला मुलूख अन् वेगवेगळे तह, त्या राजांच्या मृत्यू अन जन्माच्या तारखा फक्त घोकंपट्टी करायला लागल्यामुळे हा विषय लहानपणी अतिशय कंटाळवाणा वाटायचा; परंतु परवा वसईच्या किल्ल्याला भेट दिली आणि त्याच्या इतिहासाबद्दल खरंच मनोमन कुतूहल वाटलं. सत्तालालसा, साम्राज्यविस्तारासाठी नवीन प्रदेश काबीज करायचे मनसुबे, आपल्या धर्मप्रसारासाठी स्थानिकांना आपला धर्म स्वीकारायची केलेली जबरदस्ती, संपत्तीचा मोह असे अनेक राजकीय, सामाजिक, आर्थिक, भौगोलिक पदर एकेका आक्रमणाच्या कहाणीमागून खुणावायला लागले आणि त्यापलीकडे जाऊन मग नरवीर चिमाजींच्या शौर्याची, धडाडीची, नेतृत्वाची झळाळी जाणवू लागली. अवघा तेहेतीस वर्षांचा हा तरुण! किती तेजस्वी असेल! त्याची दमदार पावले या किल्ल्याच्या मातीला लागली असतील.

तीन बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या या किल्ल्याला जमिनीवरून जायला चौथा मार्ग आहे. किल्ल्यात आतपर्यंत डांबरी रस्ता आहे. किल्ल्यात सुरुवातीलाच पोर्तुगीजांवर विजय मिळवून वसईचा किल्ला जिंकणाऱ्या नरवीर चिमाजीअप्पांचा अश्वारूढ पुतळा असलेलं उद्यान आहे. किल्ल्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे. वर चढायला पायऱ्याही आहेत. त्या चढून बुरूज व तटबंदीवरून आजूबाजूचा परिसर न्याहाळता येतो. सागरी संरक्षणाच्या दृष्टीने हा किल्ला अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. या भिंतीची उंची, रुंदी, लांबी बघून थक्क व्हायला होतं. त्या काळात एवढी प्रचंड बांधकामे करायला किती पैसे लागले असतील आणि काळाच्या ओघात आणि निसर्गाच्या लहरींना तोंड देऊन हे बांधकाम टिकून राहिलंय ते किती दूरदृष्टीने उभारलेलं असेल याचा विचार करून अचंबा वाटतो. रोमन वास्तुशैलीत उभारलेल्या वास्तूंची पडझड बऱ्याच प्रमाणात झालेली असली तरी त्यांची भव्यता, मूळ सौंदर्य, त्या कमानी, उंचावरची गवाक्ष, प्रचंड दरवाजे, उंचच उंच छत, सज्जे आणि गोल झरोके गत सौंदर्याची साक्ष देतात. किल्लय़ातली तीन प्रार्थनागृहे बऱ्यापैकी शाबूत आहेत; परंतु अनेक वास्तू कसल्या असाव्यात याचा उलगडा होत नाही. भारतीय पुरातत्त्व खात्याने ही वस्तू संरक्षित म्हणून घोषित केलेली असली आणि थोडीफार डागडुजी केलेली असली तरी कुठेही माहितीचे फलक नाहीत.

माझे एक स्नेही परदेशात जाऊन आल्यावर उत्सुकतेने मी त्यांना विचारले होते की, कसा वाटला अनुभव? तेव्हा ते म्हणाले होते, की परदेशात मूळ चिमूटभर दाखवण्यासारख्या गोष्टीचं प्रेझेन्टेशन आणि मार्केटिंग करून प्रदर्शन मूल्य अवास्तव वाढवतात आणि आपल्याकडे जतन करण्याच्या अनास्थेमुळे, असूनही कशाचं मोल नाही. त्यांच्या या विधानाचा प्रत्यय वसईच्या किल्ल्याला भेट दिल्यावर मला आला. किल्ल्याचा विस्तीर्ण परिसर, अजूनही बऱ्यापैकी शाबूत असलेल्या इमारती, गुप्त भुयारे यामुळे किल्ला गिरिप्रेमी व इतिहासप्रेमींना आकर्षक वाटला तर नवल नाही, परंतु माझ्यासारख्या अगदी सर्वसामान्य पर्यटकांचेदेखील मन मोहून घेतो. किल्लय़ात कैऱ्यांनी खच्चून लगडलेली आंब्याची झाडे ठायीठायी आहेत. त्यामुळे पक्ष्यांची रेलचेल आहे. याशिवाय खजुराचे वृक्षही अमाप आहेत, त्यांची नीरा गोळा करण्यासाठी लावलेल्या मडक्यांमध्ये चोच बुडवून पक्षीही रसपान करताना आढळतात. किल्ल्यात अनेक पायवाटा जंगलात लुप्त होताना दिसतात. त्यामुळे पक्षिनिरीक्षण व निसर्गभ्रमंतीसाठी हे ठिकाण आदर्श आहे. तथाकथित अचेतन दगडी भिंती आणि आजूबाजूचं हिरवं चैतन्य या मिलाफातून चित्रकारांना प्रेरणा देतील अशी अफलातून कंपोझिशन्स इथे पदोपदी आढळतात. छायाचित्रकारांनादेखील या वास्तूचे सौंदर्य नक्कीच साद घालील. सिव्हिल इंजिनीअरिंग व आर्टेक्चरच्या विद्यार्थ्यांची अभ्याससहल इथे आणता येईल.

वाटाडय़ासह किल्ल्याची सफर इथले आकर्षण बनू शकेल. ध्वनिप्रकाशाच्या माध्यमातून इतिहास आकर्षकपणे सादर करता येईल. इथल्या भव्य पटांगणामध्ये ऐतिहासिक वास्तूंच्या पाश्र्वभूमीवर खजुराहोच्या धर्तीवर कला महोत्सव रंगत आणू शकेल. अगदी पाश्चात्त्य अभिजात संगीताचे कॉन्सर्ट इथे रसिकांसाठी होऊ  शकतील. वसईच्या नामवंत कलावंतांच्या कुंचल्यातून साकारलेल्या किल्ल्याशी संबंधित चित्रांचे कलादालन इथे शोभून दिसेल. शिल्पकलेच्या आविष्कारातून तत्कालीन समाजजीवनाची झलक प्रदर्शन रूपात इथे उभारता येईल. जवळच असलेल्या जेट्टीवर साहसखेळ प्रस्तावित आहेत. त्यांच्यासह एक दिवसाची सुनियोजित सहल इथे छान घडू शकेल. वसईतील खाद्यसंस्कृतीद्वारे व मत्स्यप्रेमींसाठी इथे खास खाद्य महोत्सव घडवता येतील. किल्ल्याच्या प्रतिकृती, छायाचित्रे असलेली वा चिमाजीअप्पांच्या प्रतिमेची स्मृतिचिन्हेसुद्धा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देता येतील.

बाजारूकरण होऊ न देता हे केलं तर हा उपेक्षित किल्ला पर्यटनाचा आकर्षणबिंदू नक्कीच होईल आणि अशा सहलीच्या रूपात इतिहास भेटला, तर छोटय़ा मुलांचा तो नावडता नक्कीच राहणार नाही.

वसईचा किल्ला

कसे जाल?: वसई स्थानकाबाहेरून इथपर्यंत यायला महापालिकेची नियमित बससेवा आहे. ऑटोरिक्षादेखील मिळतात.