महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली

ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण पश्चिम आणि पूर्व या दोन्ही मतदारसंघांत शिवसेना-भाजपच्या इच्छूक उमेदवारांनी बंडखोरी केली असतानाच त्यापाठोपाठ अंबरनाथमध्ये महायुतीत असलेल्या रिपाइंने तर कळवा-मुंब्रा मतदारसंघात शिवसेनेत बंडखोरी झाल्याचे समोर आले आहे. या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नसल्यामुळे महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली असून या बंडखोरांना रोखण्यात महायुतीच्या नेत्यांना अपयश आल्याचे स्पष्ट होत आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाइंची महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. युती आणि आघाडीच्या जागावाटपामुळे मतदारसंघ गमवावा लागल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. त्यामुळे अनेक इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली. अर्ज माघार घेण्याच्या दिवशी बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील, असे युती आणि आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होते. अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना युती आणि आघाडीच्या नेत्यांनी अर्ज मागे घेण्यासाठी बंडखोरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही मात्र अनेक मतदारसंघांमध्ये युती आणि आघाडीत बंडखोरी झाली आहे. कल्याण पश्चिम आणि पूर्व या दोन्ही मतदारसंघांत शिवसेना-भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केली आहे तर अंबरनाथमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बंडखोरी झाली आहे. अशाच प्रकारे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. या मतदारसंघामध्ये दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढविण्यासाठी राजेंद्र साप्ते, सुधीर भगत आणि प्रदीप जंगम हे इच्छुक होते. पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या जंगम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी अर्ज मागे घेतला नसल्यामुळे ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जंगम यांची बंडखोरी रोखण्यात शिवसेनेच्या नेत्यांना अपयश आल्याचे चित्र आहे.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीतर्फे डॉ. बालाजी किणीकर यांना देण्यात आली आहे. यामुळे भाजपमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले सुमेध भवार हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन मनसेतर्फे निवडणूक लढवीत आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे राहुल साळवे यांना उमेदवारी देण्यात आली असतानाही राष्ट्रवादीचे प्रवीण खरात यांनी बंडखोरी केली आहे. असे असतानाच रिपाइंचे ठाणे जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे यांनीही बंडखोरी करत या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीसाठी तायडे यांना या मतदारसंघातून भाजपच्या कोटय़ातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, अखेरच्या दिवशी ही उमेदवारी जाहीर झाली होती आणि त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी वेळेत पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. या संदर्भात रामभाऊ तायडे यांच्याशी संपर्क साधला असता, भाजप-शिवसेना-रिपाइं अशी महायुती असली तरी मुंबईत आमच्या पक्षाला सोडलेल्या जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळेच अंबरनाथ मतदारसंघात शिवसेनेविरोधात आम्ही अर्ज दाखल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.