लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान योजनेच्या माध्यामातून राबवण्यात येणाऱ्या ‘आमचा गाव आमचा विकास’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा विकास आराखडा कसा तयार करावा, याबाबत नुकतेच विस्तार अधिकारी आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर शहापूर वनविभाग येथे पार पडले.

पंधराव्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार ‘आमचा गाव, आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर आहे. हा विकास आराखडा कसा तयार करावा, यासाठी विविध स्तरावर कार्यशाळाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाची एक कार्यशाळा बुधवारी जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी आणि पर्यवेक्षकांसाठी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत यशदा येथे प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी विस्तार अधिकारी आणि पर्यवेक्षकाना मार्गदर्शन केले. तसेच आमचा गाव आमचा विकास या उपक्रमाची ओळख आणि उद्देश याची सविस्तर माहितीही यावेळी त्यांना देण्यात आली. गावाचा विकास आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेत अधिकऱ्यांची भूमिका व जबाबदाऱ्या याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. योजनांचे अभिसरण, मूल्यमापन व  ध्ययेनिश्चिती कशी असावी, याची माहितीही कार्यशाळेत दिली. गावाचा विकास करण्यासाठी गाव आराखडा तयार करणे गरज या वेळी प्रतिपादण्यात आली.

सहभागी प्रत्येक घटकाला प्रशिक्षण

गाव विकास प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या प्रत्येक घटकाला प्रशिक्षण देऊन गाव विकास आराखडा कसा तयार करावा, याची माहिती दिली जात आहे. यासाठीच गावपातळी ते जिल्हा स्तरावर विविध घटकांच्या कार्यशाळा ग्रामपंचायत विभाग वेळोवेळी घेणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) चंद्रकांत पवार यांनी या वेळी दिली. या कार्यशाळेत जिल्हा पेसा समन्वयक मीनल बाणे यांनीही मार्गदर्शन केले.