आकांक्षा मोहिते
ठाणे : येऊरमधील आदिवासींच्या भाषेत नावे असणाऱ्या २५ पेक्षा अधिक पाणवठय़ांच्या स्वच्छतेसह आणखी पाच नव्या पाणवठय़ांच्या निर्मितीचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले असून यामुळे यंदाही येथील वन्यप्राण्यांना जलसंजीवनी मिळणार आहे.
ठाणे शहरापासून काही अंतरावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेले येऊर वनपरिक्षेत्र आहे. या वनपरिक्षेत्रात विविध पक्षी आणि वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. या वन परिक्षेत्रात साधारण पंचवीस नैसर्गिक पाणवठे आहेत. पावसाळय़ात येथील पाणवठय़ात मुबलक प्रमाणात पाणी साचत असल्याने जंगलातील प्राण्यांना पाणी पिण्यासाठी या पाणवठय़ांचा उपयोग होतो. उन्हाळय़ात मात्र पाणवठय़ातील पाणी आटत असल्याने पाणवठे कोरडे होऊन त्यावर दगड, मातीचा गाळ साचतो. करोना काळात शासकीय यंत्रणा तसेच अनेक सामाजिक संस्थांच्या कामावर निर्बध आल्याने वन क्षेत्रातील पाणवठय़ांची सफाई मोहीमही थंडावली होती. यामुळे येऊर जंगल परिसरात पाण्याच्या कमतरतेमुळे जाणवत असल्यामुळे ते पाण्याच्या शोधात मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतात. असेच चित्र यंदाही आहे.
मागील आठवडय़ात येऊरमधील माकड, सांबर, हरिण, वानरे पाण्यासाठी वणवण फिरत मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. त्यामुळे मानवी वस्तीत भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही गोष्ट लक्षात घेऊन येऊर वनविभाग आणि ‘जीवोहम ट्रस्ट’ने एकत्र मिळून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय करून देण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी येऊरमधील चार बाय एक, म्हातरिखड, केतकीचे पाणी अशा ठिकाणी पाच ते सहा कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. त्याचबरोबर आंब्याचे पाणी, चिखलाचे पाणी, चिम्बोनाचे पाणी, पायरीचे पाणी, मानिखलाचे पाणी, माकडाचे पाणी अशा एकूण पंचवीस नैसर्गिक पाणवठय़ांमधील दगड, मातीचा गाळ बाजूला करून स्वच्छ केली असून तिथे पाण्याची सोय केली आहे.
उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे येऊरच्या जंगलातील प्राण्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. त्यामुळे नैसर्गिक पाणवठय़ातील गाळ, कचरा बाहेर करून पुनरुज्जीवित करण्यात आले आहे. त्याचबरोबर कृत्रिम पाणवठे तयार करून त्यामध्ये पाण्याची सोय करून देण्यात आली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही, असे येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश सोनटक्के यांनी सांगितले.
पाणवठे स्वच्छ करण्याची पद्धत
वनविभागाचे कर्मचारी आणि निसर्गमित्र यांच्याकडून जंगलातील पाणवठय़ांची जागा शोधून काढली जाते. या पाणवठय़ांच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन स्वच्छ केले जातात. अशा पाणवठय़ांमध्ये साधारण एक ते दोन दिवसात पाणी उपलब्ध होते. मागील आठवडय़ांपासून येऊर वनपरिक्षेत्रातील ३० पाणवठे वन्यप्राण्यांसाठी उपलब्ध करून दिली आहेत.
तापमान वाढीमुळे येऊरच्या जंगलातील वन्यजीव उष्णतेने हैराण झाले होते. त्यात मुबलक पाण्याकरिता त्यांची भटकंती सुरू होती. अन्न, पाण्याच्या शोधार्थ वन्यजीवांनी मानवी वस्तीकडे धाव घेतली. हे टाळण्यासाठी जंगलातील नैसर्गिक झरे व कृत्रिम पाणवठे यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. तरच ही वनसंपदा अबाधित राहील, यासाठी लोकसहभाग हा महत्त्वाचा आहे – ज्ञानेश्वर शिरसाट, स्वयंसेवक, जीवोहम ट्रस्ट, ठाणे

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…