scorecardresearch

आठवडय़ाची मुलाखत : मुद्रांक आणि प्रीमियम शुल्कात सवलत द्या

करोना संकटामुळे गेली दोन वर्षे ठाण्यात मालमत्ता प्रदर्शनात खंड पडला होता; परंतु आता करोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

जितेंद्र मेहता, अध्यक्ष, क्रेडाई एमसीएचआय

करोना संकटामुळे गेली दोन वर्षे ठाण्यात मालमत्ता प्रदर्शनात खंड पडला होता; परंतु आता करोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणेकरांना एकाच छताखाली मालमत्ता आणि गृहवित्त कर्ज घेण्याचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. यानिमित्ताने क्रेडाई एमसीएचआय संस्थेचे विद्यमान अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्या घेतलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी ग्राहक आणि बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मुद्रांक आणि प्रीमियम शुल्कात कपात करण्याची भूमिका मांडली.

  • करोनाकाळाचे आव्हान कसे पेलले?

दोन वर्षांपूर्वी करोनाची पहिली लाट आली. टाळेबंदी लागू करण्यात आली. यामुळे सर्वच ठप्प झाले. या काळात बांधकाम करणारे मजूर गावी निघून गेले. काही मजूर इथेच थांबले होते. त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था बांधकाम व्यावसायिकांनी केली होती. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर नोकरी राहील याचीही अनेकांना खात्री नव्हती. यामुळे नागरिकांनी घर खरेदीची नोंदणी रद्द केली. घरांची विक्री पूर्णपणे बंद झाली. यामुळे बांधकाम क्षेत्र आणि त्यावर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यवसाय आर्थिक संकटात सापडले होते. तरीही आम्ही करोनाकाळात ठाणेकरांच्या मदतीसाठी महापालिकेच्या सोबत उभे राहिलो. आमच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करीत असलेल्या कामगारांची सातत्याने आरोग्य तपासणी करीत होतो. त्यांच्या आरोग्याची काळजी घेत होतो. त्याचबरोबर करोना उपचारासाठी महापालिकेकडून रुग्णालयांची उभारणी करण्यात येत होती. त्यासाठी संस्थेने पुढाकार घेऊन महापालिकेला साथ दिली. त्याचबरोबर औषधेही अनेकांना उपलब्ध करून दिली. आपल्या शहरावर करोनाचे संकट ओढावले होते म्हणून सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून आम्ही हे काम केले.

  • आता बांधकाम क्षेत्राची  सद्य परिस्थती काय आहे?

करोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने टाळेबंदी आणि निर्बंध शिथिल झाले आहेत. सर्वच व्यवहार पुन्हा सुरळीत होऊ लागले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करीत असलेले बांधकाम क्षेत्रही उभारी घेऊ लागले आहे. राज्य शासनाने मुद्रांक शुल्क आणि प्रीमियम शुल्कात सवलत दिली होती. यामुळे बांधकाम क्षेत्राला उभारी घेण्यात मोठी मदत झाली. त्याचबरोबर मुद्रांक शुल्ककपातीमुळे ग्राहकांनाही मोठा फायदा झाला. इतकेच नव्हे तर बांधकाम व्यावसायिकांनी प्रीमियम शुल्क सवलतीचा फायदा घेण्यासाठी महापालिकेकडे उर्वरित शुल्काचा भरणा केला. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेच्या तिजोरीतही मोठा महसूल जमा झाला. राज्य शासनाकडून एप्रिल महिन्यापासून मुद्रांक शुल्कात वाढ करून सात टक्के केले जाणार आहे. त्याचा भार ग्राहकांवर पडणार असल्याने गृह खरेदी करण्याचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे राज्य शासनाने मुद्रांक आणि प्रीमियम शुल्कात सवलत द्यायला हवी अशी संस्थेची भूमिका आहे.

  • ठाण्यातील घरांना ग्राहकांची अजूनही पसंती आहे? 

मुंबई शहराला खेटूनच ठाणे शहर आहे. ठाणे हे मध्यवर्ती शहर आहे. मुंबईतील अंधेरी, बोरिवली, दहिसर या ठिकाणी घरांच्या १२ ते १५ हजार इतका चौरस फुटामागे दर आहे. घोडबंदर भागात ८ ते १२ हजार इतका चौरस फुटामागे दर आहे. या भागातूनही मुंबई जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी रस्ते उपलब्ध आहेत. त्यात निसर्गरम्य वातावरणही आहे. शहरात पालिकेच्या माध्यमातून चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्य सरकार, एमएमआरडीए आणि पालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविले जात आहेत. त्यात मेट्रो, गायमुख ते बोरिवली भुयारी मार्ग, मुंबई फ्री-वेचा ठाण्यापर्यंत विस्तार, समृद्धी महामार्ग, खाडीकिनारी मार्ग अशा प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे ठाणेकरांना दळणवळणासाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे निश्चितच अशा प्रकल्पांमुळे ठाण्यातील घरखरेदीकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. शहरातील भविष्यातील गरज लक्षात घेऊन ,सात पाण्याच्या टाक्यांची उभारणी बांधकाम व्यावसायिकांनी करून दिली आहे.

  • मालमत्ता प्रदर्शनाचे वैशिष्टय़ काय असणार आहे?

करोना संकटामुळे दोन वर्षे खंड पडलेले मालमत्ता प्रदर्शनाचे यंदा आयोजन करण्यात आले आहे. ११ ते १४ मार्च या कालावधीत ठाण्यातील रेमंड मैदानात हे प्रदर्शन होणार असून या ठिकाणी विनामूल्य प्रवेश असणार आहे. १२ मार्चला प्रदर्शनच्या हॉलमध्ये फॅशन शो आयोजित केला जाणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठाणेकरांना एकाच छताखाली मालमत्ता आणि गृहवित्त कर्ज घेण्याचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. ३० लाखांपासून पुढील किमतीची घरे येथे उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांना आपल्या स्वप्नातील घर निवडण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

– मुलाखत : नीलेश पानमंद

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Weekly interview discount stamp and premium feesysh

ताज्या बातम्या