आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन जुन्यानव्याचा संयोग करीत सुसंस्कारित विद्यार्थी तयार करणे हे सर्व शाळांसाठी एक आव्हानच आहे. ठाण्यातील श्रीरंग विद्यालय इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मात्र अशा स्वरूपाचे व्यापक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक प्रयत्न सातत्याने केला जातो. मूल्य संस्कारांच्या भक्कम पायावर विद्यार्थ्यांचा सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकास साध्य करताना तो शिक्षणक्षेत्रातील तीव्र स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी सक्षम असेल या दृष्टीने या शाळेमध्ये वर्षभर अनेकविध उपक्रम, कार्यक्रम राबवले जातात हे विशेषत्वाने नमूद करण्याजोगे.

या शाळेमध्ये वर्षभर विविध सण, उत्सव, राष्ट्रीय सण, थोर व्यक्तींच्या जयंत्या इ. सर्वप्रकारचे महत्त्वाचे दिन साजरे केले जातात. प्रत्येक कार्यक्रम करताना त्या त्या दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत परिणामकारकरीत्या पोचवण्याच्या उद्देशाने मोठी प्रतिकृती तयार केली जाते. त्या प्रतिकृतीबरोबरच माहिती फलक, मोठे कटआऊटस, कधी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनादेखील तो विषय अधिक चांगल्याप्रकारे समजवण्यासाठी सामावून घेतले जाते. आपल्या सण-उत्सवांप्रमाणेच ख्रिसमसचा सणदेखील हौशेने साजरा केला जातो. त्या दिवशी  येशूच्या जन्माचा देखावा भव्य प्रतिकृतीच्या माध्यमातून तयार केला जातो. त्याचबरोबर ख्रिसमस ट्री सजावट आणि प्रत्येक हाऊसतर्फे कॅरोल सिंगिंगच्या कार्यक्रमाचा अनुभवही विद्यार्थी घेतात. यानिमित्ताने विद्यार्थी छोटय़ा भेटवस्तू आणतात आणि मग त्या अनाथाश्रमातील मुलांना भेट म्हणून दिल्या जातात. खरंतर सण-उत्सवांमागील व्यापक हेतू विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा, त्यांच्या मनावर रुजवण्याचा हा अत्यंत स्तुत्य प्रयत्न आहे. अशा तऱ्हेचा व्यापक उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच शाळेतला प्रत्येक उपक्रम आणि कार्यक्रमाची आखणी केली जाते. त्यासाठी या शाळेमध्ये शिक्षकांना जबाबदारी वाटून देताना सांस्कृतिक शाळाबाह्य़ स्पर्धा, शाळाबाह्य़ परीक्षा, शिस्तपालन, शाळाअंतर्गत/आंतरशालेय क्रीडा स्पर्धा इ. विविध समित्या आहेत.

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
Assistant Police Inspector promoted soon
आनंदाची बातमी! सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पदोन्नती
3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

विद्यार्थ्यांना विषयाचे मुळातून आकलन व्हावे, प्रत्येक संकल्पना स्पष्ट व्हावी, आणि संपूर्ण विषय स्पष्ट व्हावा यादृष्टीने शिक्षक प्रत्येक विषयाची पूर्वतयारी करतात. प्रत्येक शिक्षक स्वत:चा विषय पीपीटी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर मांडतो आणि त्यासाठी स्वत: मेहनत घेऊन पीपीटी तयार करतात. (कार्यानुभव, शारीरिक शिक्षणासारखे विषयही याला अपवाद नाहीत). उदा. पीक तयार होतं म्हणजे त्याची प्रक्रिया कशी असते हे सर्व टाप्पे पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थी अनुभवतात. श्रीरंग विद्यालय ही डिजिटल बोर्डाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी ठाणे जिल्ह्य़ातली पहिली शाळा आहे. त्याचबरोबर या शाळेत थ्रीडी लॅब आहे. विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारण्यासाठी इंग्रजी सेंटर लॅब आहे. अद्ययावत प्रयोगशाळा हे या शाळेचे वैशिष्टय़ आहे. शाळेच्या ग्रंथालयात पाच हजार पुस्तके आहेत आणि विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून त्यांचा उपयोग केला जातो. आणि त्यासाठी प्रत्येक वर्गाला एका शिक्षिकेची खास नियुक्ती करण्यात आली आहे हे विशेषत्वाने नमूद करण्याजोगे! तीस संगणकांनी युक्त असा वातानुकूलित संगणक कक्ष आणि चर्चा कक्षही येथे आहे.

श्रीरंग विद्यालय इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाच्या इतिहासातील सुवर्णअक्षरांनी लिहिला जावा असा गौरवपूर्ण सोहळा म्हणजे २३वी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद. २०१५-१६ मध्ये या परिषदेत २५०० पेक्षा जास्त प्रकल्प जिल्हास्तरावर सादर करण्यात आले. त्यातील २७ प्रकल्पांची पुढच्या फेरीसाठी निवड करण्यात आली होती आणि त्यापैकी ३ प्रकल्प हे श्रीरंग विद्यालयाचे होते. त्यापुढील राष्ट्रीयस्तरावरील फेरीसाठी या शाळेचे तिन्ही प्रकल्प निवडण्यात आले हे विशेषत्वाने नमूद करण्याजोगे! शाळेचा गटप्रमुख अमोघ पाटील याच्या गटाच्या प्रकल्पाची निवड सवरेत्कृष्ट सोळा प्रकल्पांमध्ये झाली होती. हवेतील घटकांचा जलीय परिसंस्थेवर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाययोजना आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अनुभव घ्यावा आणि स्वत:चे ज्ञान वाढवावे म्हणून ही शाळा सातत्याने प्रयत्नशील असते. अशातऱ्हेचे विद्यार्थ्यांचे यश हे शाळेसाठी आणि शिक्षक, मुख्याध्यापक सर्वासाठी हुरूप देणारे, समाधान देणारे असते.

या शाळेचे वैशिष्टय़ म्हणजे भारत स्काऊट गाईड राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राज्यपाल आणि राष्ट्रपती पुरस्कारांच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी उत्तम यश प्राप्त करतात. कब बुलबुल (प्राथमिक विभाग), हिरक पंख आणि सुवर्णबाण या सर्व वयोगटासाठी असणाऱ्या परीक्षांसाठी शाळेचे विद्यार्थी मोठय़ा संख्येने बसतात आणि उत्तीर्णही होतात. सुवर्णबाण या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.

शाळा सुटल्यानंतर कराटे, जिम्नॅस्टिक, स्केटिंग, नृत्य इ.चे प्रशिक्षण देणारे उपक्रम शाळेत राबवले जातात. सुट्टीनंतर राबवले जाणाऱ्या या उपक्रमांमध्ये परिसरातील इतर विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येते.

गेल्या तीन वर्षांपासून शाळेत मिलिटरी अ‍ॅकेडमीचा उपक्रम राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्यामध्ये देशाभिमान आणि देशाविषयी प्रेम, आदर निर्माण व्हावा या व्यापक हेतूनेही सुरू करण्यात आली आहे. विविध राज्यांमध्ये होणाऱ्या कँपमध्ये सहभागी होण्याची संधी या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना प्राप्त होते.

या शाळेचा क्रीडा महोत्सव हा एक पाहण्यासारखा कार्यक्रम असतो. शाळेच्या या कार्यक्रमासाठी एक विषय निश्चित करून कार्यक्रमाची आखणी त्यानुसार केली जाते. यावर्षी नारीशक्ती या विषयावर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आला. ड्रिल, मार्चपास, कवायत आणि मग त्या वर्षीच्या विषयाला साजेसे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. ज्याद्वारे विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोचवला जातो. लाल, निळा, हिरवा, पिवळा अशा चार गटांमध्ये (हाऊस) विद्यार्थ्यांची शाळेमध्ये विभागणी केलेली असते. या सर्व विद्यार्थ्यांचा मार्चपास आणि थीमवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम हे उपस्थितांची दाद घेऊन जातात.

श्रीरंग विद्यालयामध्ये इ. ९वीला कुकरीसारखा विषय शिकवला जातो आणि त्यासाठी सर्व साधनांनी युक्त कुकरी रूमदेखील शाळेमध्ये आहे. स्वत: शिक्षिका विविध पाककृतींची प्रात्यक्षिके विद्यार्थिनींना करून दाखवतात.

शाळेचे स्नेहसंमेलन दर्जेदार असण्यावर भर दिला जातो आणि त्यासाठी एक चांगला विषय दरवर्षी निवडला जातो. यावर्षी बाजीराव पेशवा उद्घाटनाच्या वेळी शनिवारवाडय़ाच्या प्रवेशद्वार (भव्य देखावा) स्टेजवर आल्याचे दृश्य विलोभनीय असे होते. विविधतेतून एकता, महाराष्ट्राची लोकधारा, विविध भाषेतील लोकनृत्य इ. विषय हाताळले गेले आहेत.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे साहाय्य घेतले जाते, त्याचप्रमाणे मानसिक आरोग्याचाही विचार केला जातो. त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत या दृष्टीने प्रार्थना, प्रतिज्ञा, पसायदान, रोजचा सुविचार, वर्तमानपत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या यावर भर दिला जातो. प्रत्येक गटाला त्यासाठी दिवस ठरवून दिला जातो. संस्थेतर्फे समुपदेशकांची विद्यार्थ्यांसाठी नेमणूक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये जर काही बदल दिसून आला तर शिक्षक त्याच्याशी संवाद साधतात.

शालांत परीक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन शाळेतर्फे जागरूकपणे प्रयत्न केले जातात. ज्यांना वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज आहे अशा विद्यार्थ्यांना शाळेनंतर एक तास वर्षभर मार्गदर्शन दिले जाते. सर्व भाषा व त्यांचे व्याकरण यावर भर दिला जातो. त्यामुळे शाळेचा निकाल दरवर्षी उत्तमच असतो. विद्यार्थ्यांना सर्व शाळाबाह्य़/ स्पर्धा परीक्षा, आंतरशालेय स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, विविध सांस्कृतिक स्पर्धा यात आवर्जून सहभागी केले जाते. या शाळेच्या विविध उपक्रमांविषयी जाणून घेतल्यावर, एक गोष्ट प्रकर्षांने म्हणावीशी वाटते. विद्यार्थ्यांचा सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकास, बहुआयामी व्यक्तिमत्त्व इ. विषयी हल्ली वारंवार बोलले जाते. श्रीरंग एज्युकेशन ट्रस्ट संस्थेच्या या शाळेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून हे साध्य होणार आहे. त्यासाठी प्रयत्नांची खरोखरच पराकाष्ठा करणाऱ्या शाळेशी संबंधित सर्वाचेच अभिनंदन करावयास हवे.