उल्हासनगरातील धक्कादायक प्रकार; पालिकेचे छापे, चाचणी संच बनावट असल्याचा संशय

उल्हासनगर : अस्सल वस्तूंची हुबेहूब नक्कल करणाऱ्या उल्हासनगर शहरात करोना चाचणी करण्यासाठी लागणाऱ्या संचामधील स्वॅब चाचणीची कांडी पाकीटबंद करण्याचे काम घराघरांत सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प दोन भागांतील खेमानी परिसरात काही सुज्ञ नागरिकांना हा प्रकार समोर आणला. याची माहिती मिळताच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी येथे धाव घेत हा प्रकार बंद पाडला. त्यामुळे या चाचण्यांचे संच बनावट तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच या कांडय़ांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

mumbai businessman cheated for rupees 22 lakhs, lure of secret gold
गुप्तधनातील सोन्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्याला अटक
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Employer killed owner for non-payment of wages
ठाणे : मजुरीचे पैसे दिले नाही म्हणून मालकाची चाकू भोसकून हत्या

उल्हासनगरातील खेमानी परिसरात संत ज्ञानेश्वर नगर येथे काही महिला गृहउद्योगाप्रमाणे या कांडय़ा पाकीटबंद करत असल्याची माहिती परिसरातील काही नागरिकांना मिळाली. अधिक माहिती घेतली असता आरटीपीसीआर चाचण्यांचे नमुने घेण्यासाठी ज्या कांडय़ा वापरल्या जातात, त्याच कांडय़ा या महिला पाकीटबंद करत होत्या. या कांडय़ा पाकीटबंद करण्यासाठी एका उद्योजकांकडून आणल्या जात होत्या. या उद्योजकाकडून प्रति हजार काडय़ांमागे २० रुपये दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक महिला तीन ते चार हजारांपेक्षा जास्त कांडय़ा दररोज पाकीटबंद करतात. या कांडय़ा जमिनीवर ठेवून उघडय़ा हातांनी कोणतीही सुरक्षा संसाधने न वापरता पाकीटबंद केली जात होती. गेल्या तीन ते चार दिवसांपासून या कांडय़ा पाकीटबंद वितरित केल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांत ५० ते ६० हजार कांडय़ा अशा प्रकारे पाकीटबंद करण्यात आल्याची शक्यता आहे. त्यामुळे या किटच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालिकेची धावाधाव

हा प्रकार समोर येताच उल्हासनगर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने येथे पालिकेने कारवाई केली असून या प्रकाराची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली गेली आहे. यातील कोणतेही संच उल्हासनगर शहरात वापरले गेले नाहीत, अशी स्पष्टोक्ती अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी दिली आहे, तरीही शहरात खासगी डॉक्टर किंवा प्रयोगशाळांनी याचा वापर केला असेल तो त्वरित थांबवावा, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांना केल्याचेही डॉ. जुईकर यांनी सांगितले. तर या प्रकरणी तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त धुला टेळे यांनी दिली. या प्रकरणाबाबत स्थानिक अन्न व औषध अधिकाऱ्यांना संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

करोना संशयितांची चाचणी करत असताना नमुने घेताना संबंधित आरोग्य कर्मचारी पीपीई किट घालून आणि संपूर्ण सुरक्षा संसाधने वापरून नमुने घेत असतो. मात्र चाचणी घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संचातील महत्त्वाचा भाग असलेल्या या स्वॅब कांडय़ा अशा प्रकारे पाकीटबंद होत असतील तर त्याच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.