कल्याण- घरात लपून बसलेल्या चोरट्याला पकडण्यासाठी पोलीस आले आहेत हे पाहून त्याला पोलिसांच्या अटकेपासून वाचविण्यासाठी घरातील तीन महिलांनी अंगावरील कपडे काढून पोलिसांसमोर आणि घरासमोरील रस्त्यावर धिंगाणा केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. कल्याण रेल्वे यार्ड ते कर्पेवाडी भागात ही घटना घडली.
सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या महिलांच्या विरुध्द दाखल केली आहे. या प्रकाराने पादचारी, परिसरातील रहिवासी आश्चर्यचकित झाले होते. लोहमार्ग पोलीस, महिला पोलीस या महिलांना समजावून सांगत होते. तरीही त्या दाद देत नव्हत्या.




हेही वाचा >>> शहापूर : गर्भवती महिलांच्या जीवाशी खेळणारा स्त्रीरोग तज्ज्ञ तडकाफडकी कार्यमुक्त
कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात प्रवाशांकडील मोबाईल काही भुरट्या चोरांकडून लांबविले जातात. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होतात. एका प्रवाशाचा मोबाईल अशाच पध्दतीने कल्याण रेल्वे स्थानकातून लांबविण्यात आला होता. प्रवाशाकडून तक्रार दाखल झाल्यानंतर कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी तपासाचे आदेश दिले होते.
पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील घटनास्थळाच्या भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यावेळी एक चोरटा प्रवाशाचा मोबाईल चोरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्या चोरट्याची ओळख पटवली. तो कल्याण येथील कर्पेवाडी भागातील असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्याआधारे लोहमार्ग पोलिसांचे पथक शुक्रवारी त्या चोरट्याच्या घरी धडकले. त्यावेळी तो घरात लपून बसला होता. त्याच्यावर अटकेची कारवाई होणार हे चोरट्याच्या घरातील तीन महिलांना समजताच त्यांनी अंगावरील कपडे काढून पोलिसांसमोर धिंगाणा करण्यास सुरुवात केली. आमच्या घरात यायचे नाही. असे बोलून त्यांनी घर आणि रस्त्यावर गोंगाट घातला.
हेही वाचा >>> कल्याणमधील मोहन्यातील घरातून ३५ तोळे सोन्याची दिवसाढवळ्या चोरी
चोरट्याला वाचविण्यासाठी या महिलांनी हा प्रकार केला आहे हे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी या महिलांना समजविले. त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. अखेर या महिलांच्या विरुध्द पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन चोरट्याला ताब्यात घेतले.
हा प्रकार बघण्यासाठी कर्पेवाडी भागात बघ्यांची गर्दी जमली होती.