विविध कार्यक्रमांच्या आयोजनाला वनविभागाची तिलांजली

वनक्षेत्र असतानाही एरवी तरुणांचा धांगडधिंगा आणि मद्यमेजवान्या यामुळे वन्यजीवांची झोपमोड करत रात्ररात्र गजबजणाऱ्या येऊरमध्ये यंदा जागतिक वन्यजीवदिनी मात्र शुकशुकाट असणार आहे. वन्यजीवांचे संवर्धन, संरक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक वन्यजीवदिनी म्हणजे आज, ३ मार्च रोजी येऊरमध्ये एकाही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही. ठाणे वनक्षेत्र रक्षणाची जबाबदारी असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला या दिवसाचा पूर्णपणे विसर पडल्याचे दिसून येत आहे.

ठाणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयअंतर्गत सहा हजार हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर वनपरिक्षेत्राबरोबरच तब्बल तीन महापालिकांच्या वनपरिक्षेत्राचाही समावेश आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत असलेले येऊर वनपरिक्षेत्र दोन हजार हेक्टर परिसरावर पसरले आहे. येऊर वनपरिक्षेत्रात येऊरसह चेन्ना, नागला बंदर, मानपाडा, घोडबंदर आदी परिसराचा समावेश होतो. ठाणे, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार या तीन महापालिकांच्या हद्दीत येऊर वनपरिक्षेत्र विभागले गेले असून या परिसराचा आवाकाही मोठा आहे. त्यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणात वन्यजीव संपदा आढळते. तसेच वनपरिक्षेत्राभोवती नागरीकरणाचा रेटा वाढत असल्याने वनविभागाच्या हद्दीत अतिक्रमणांचा धोकाही अधिक असतो. त्यातच वन्यजीवांचे संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही वनविभागाची आहे. मात्र यावर्षी जागतिक वन्यजीवदिनी वनविभागाला वन्यजीवांचा विसर पडल्याचे यावरून दिसून येते.

जंगली पशुपक्ष्यांची शिकार तसेच त्यांचा व दुर्मीळ वनस्पतींचा चोरटा व्यापार तेथील स्थानिकांच्या मदतीशिवाय शक्यच होणार नाही. त्यामुळे असे न करण्याबाबत जनजागृतीचे काम या वन्यजीव दिनानिमित्त करण्यात येते.

निसर्गाच्या साखळीतला प्रत्येक घटक जीवसृष्टीसाठी महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर वन्यजीव हे आपले शत्रू नसून मित्र आहेत. त्यांचे संगोपन, संरक्षण करणे, हे प्रत्येक मानवाचे आद्य कर्तव्य आहे. जंगलाचे संरक्षण करण्याची गरज व त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम, याबाबत जनजागृती या निमित्ताने केली जाते. मात्र या संदर्भात उपक्रम यंदा राबविण्यात येणार नसल्याची माहिती परिक्षेत्र वन अधिकारी संजय वाघमोडे यांनी दिली.

जागतिक वन्यजीव दिनाची संकल्पना..

१९७०च्या सुमाराला वन्यप्राणी आणि इतरही घटकांची शिकार व चोरटा व्यापार यांचे प्रमाण वाढू लागले होते. त्यापैकी बरेचसे  कायमचे नष्ट होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. याबाबत जागृती करण्यासाठी ‘युनो’ म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा वन्यजीवन दिवस ठरविला. नामशेष होण्याचा धोका असलेल्या वन्यसृष्टीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा ३ मार्च १९७३ रोजी १८० देशांनी मान्य केला म्हणून या दिवसाला महत्त्व आहे.