नाइट क्लब व हुक्का बारमध्ये तरुण मुले जातात. पण आता काही शहरांमध्ये एक नवबौद्धिकांचा वर्ग तयार होत आहे. तो संवेदनशील आहे, त्यांना डिस्कोथेक, हुक्काबार, डान्सबार खुणावत नाहीत तर असे बुक कॅफे आनंद देतात. समाजातील तरुण पिढी सरसकट वाया गेलेली नाही. कॉफीचा वाफाळता कप हातात घेऊन वाचनाचा आनंद  ती मिळवू इच्छित आहे. कोलकात्यामध्ये सुरू झालेल्या आगळ्या बुक कॅफेनिमित्ताने..
बुक स्टोअरमध्ये लाउंजसारखा आनंद मिळावा यासाठी आता ‘सिटी ऑफ जॉय’ मानल्या जाणाऱ्या कोलकात्यात बुक कॅफे सुरू झाले आहे. तिथे आरामात बसून कॉफी पीत पुस्तके वाचण्याचा आनंद मिळणार आहे. ‘स्टोरी’ असे या बुक कॅफेचे नाव आहे. तिथे ग्राफिक कादंबऱ्या, कॉमिक बुक्स उपलब्ध आहेत. पेंग्विन बुक्सचा वेगळा विभाग आहे, तसेच बोर्ड गेम्सही आहेत. लिहिण्यासाठी पॅड्स, पेन्सिल ठेवलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही तुम्हाला जे वाटते ते लिहून ठेवू शकता. पुस्तकप्रेमींसाठी ही मेजवानी असून पेंग्विनची तीन हजार पुस्तके तिथे आहेत. येथे येऊन लोकांनी कथा वाचाव्यात, कथा लिहाव्यात, कथा सांगाव्यात, कथा चित्रात मांडाव्यात अशी अपेक्षा आहे, असे या कॅफेचे प्रमुख सिद्धार्थ पानसरी यांचे मत आहे. ‘पेंग्विन’ या ठिकाणी प्रकाशित न झालेली पुस्तकेही ठेवणार आहे. काही दुर्मीळ पुस्तकेही ठेवणार आहेत. हा १५ हजार स्क्वेअर फुटांचा पुस्तकांचा मॉल असून तेथे अनेक कोपरे असे ठेवले आहेत, जिथे जाऊन तुम्ही वाचू शकता, चित्र काढू शकता, कथाकथन करू शकता, चित्रपटाचे लाँच करू शकता. कोलकातावासीयांसाठी हा वेगळा अनुभव आहे. कोलकात्यात दरवर्षी पुस्तकांचे मोठे प्रदर्शनही भरते. दिल्लीतही पुस्तक प्रदर्शन भरते, पण प्रत्येक वेळचा अनुभव वेगळा असतो. काहींना पुस्तके परवडत नाहीत, त्यांना पुण्यात अगदी रस्त्यावर सहजगत्या अतिशय दुर्मीळ पुस्तके नाममात्र किमतीत मिळून जातात. काही ठिकाणी तर पुस्तके भाडय़ाने मिळतात, पण ती बहुधा अभ्यासाची असतात. अक्षरधारा या पुण्याच्या बुक गॅलरीमध्ये झाडाखाली पुस्तक प्रकाशन व गप्पांचा कार्यक्रम करण्याची सोय आहे. यातून काही उद्देश साध्य  होतात ते म्हणजे लेखक- वाचकांच्या भेटी होतात. नवीन कल्पनांवर चर्चा होते. काहींना निवांतपणे पुस्तके वाचता येतात.
चाय बार किंवा बुक कॅफे यांचे भारतीय महानगरांमध्ये पेव फुटले आहे. पण कोलकाता ही भारताची सांस्कृतिक राजधानी मानली जाते, त्यामुळे तेथील बुक कॅफेचा अनुभवही वाचकांना अभिरुची व रुची अशा दोन्ही अंगांनी संपन्न करणारा आहे.
थोडा इतिहास
पुस्तके व अन्न, शीतपेये यांचा संबंध तसा जुनाच आहे. व्हिक्टोरिया काळापासून महिला किटी पार्टी करायच्या व मोठय़ाने गॉसिप वाचायच्या, नवीन पुस्तकातील कथित चविष्ट प्रकरणांची चहा घेत चर्चा करायच्या. पुरुषांचे जरा वेगळे होते. ते चहा पाटर्य़ाचा उपयोग उद्योगांच्या चर्चेसाठी करायचे. आर्यलडमध्ये तर अशा कॅफेमध्ये कथाकथन केले जात असे, तेव्हापासून या कॅफेंना अधिक सांस्कृतिकता प्राप्त झाली. आपल्याकडेही आता पुस्तक महोत्सव वगैरे होतात. त्यात गरमागरम चर्चा होतात व बातमी नक्कीच मिळते. आर्यलडमधील अशा निवांत ठिकाणी चहा, कॉफीबरोबर वाईनही मिळत असे.
आनंदाचा व्यापार!
आजकाल पुस्तकाची दुकाने पूर्वीसारखी किरटी, कमी जागेत नसतात, पुस्तके चाळणे, बघणे हा एक अनुभव असतो. त्याला व्यावसायिक बाजू आहे हे खरे, पण लोकांच्या रिकाम्या वेळेचा फायदा घेतला नाही तर व्यावसायिक कसले. ऑक्सफर्ड बुकस्टोर, क्रॉसवर्ड, स्टोरी, स्टारमार्क अशा अनेक खास ठिकाणांनी पूर्व भारतात वाचनानुभव अभिरुचीसंपन्न व आरामदायी केला आहे. वाचलेल्या पुस्तकांवर पांडित्यपूर्ण पद्धतीने चर्चा करण्याची फॅशन पहिल्यांदा कॅफे कॉफी डे (सीसीडी) ने आणली. एक कप कॉफीच्या बदल्यात खरे तर आपण खूप वेळ जागा अडवून बसतो, पण ते इथे माफ आहे. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात जरा काही वेगळे केल्याचा आनंद यात मिळतो. तिथे तुम्हाला एकटेपणा वाटत नाही. ऑक्सफर्डच्या बारमधले वातावरणही चांगले आहे. तिथे संगीत, चित्रपट व इतरही वेगळ्या सोयी आहेत.
जगातील बुक कॅफे
१.     द ग्राउंड्स अ‍ॅलेक्सांड्रिया, ऑस्ट्रेलिया
२.     द व्हिंटेज एंपोरियम, लंडन
३.     हॉटेल सेंट्रल अँड कॅफे,     कोपनहेगन
४.     बालझॅक, टोरांटो
५.     लोसिव्ह थी, पॅरिस
६.     ला डिस्ट्रिब्युटाइस, माँट्रियल
७.     लिटल नॅप कॉफी स्टँड,    टोकियो
८.     स्निककार बॅकेन ७ स्टॉकहोम
९.     कॅफे कॉच्युम, पॅरिस
१०.    लीली व्हॅनिली, लंडन