सौदर्यांचा कुरूप मार्ग

उदारीकरणानंतरच्या दशकाने भल्यापेक्षा बुऱ्याच गोष्टींचा सातत्याने पुरवठा केला. विविध प्रकारांतील व्यसनांधता, स्थूलत्व आणि नवरोगांचा प्रसार याच काळात झाला आणि त्या प्रत्येक गोष्टीवर अक्सिर इलाजाद्वारे औषध व सौंदर्य प्रसाधन कंपन्याही धनलठ्ठ बनत गेल्या.

उदारीकरणानंतरच्या दशकाने भल्यापेक्षा बुऱ्याच गोष्टींचा सातत्याने पुरवठा केला. विविध प्रकारांतील व्यसनांधता, स्थूलत्व आणि नवरोगांचा प्रसार याच काळात झाला आणि त्या प्रत्येक गोष्टीवर अक्सिर इलाजाद्वारे औषध व सौंदर्य प्रसाधन कंपन्याही धनलठ्ठ बनत गेल्या. याच काळात दूरचित्रवाहिन्यांच्या निव्वळ दोन पर्यायांना अमर्याद साथ लाभली आणि त्याद्वारे जगसपाटी झाल्यामुळे सौंदर्याच्या संकल्पना, फॅशनच्या व्याख्या बदलत गेल्या. पाच दिवसांत तारुण्यपीटिकांची वासलात लावणाऱ्या जाहिरातींपासून कृष्णवर्ण हा शाप असल्याचा अन् तो घालवून देणे शक्य असल्याचा दावा करणाऱ्या ‘हॅण्डसम’ जाहिरातींनी भुरळ पडलेली सौंदर्येच्छुक पिढी छान दिसण्याच्या नादात शरीर आणि त्वचाशत्रू बनू लागली. विश्वसुंदरी आणि जगत्सुंदरीच्या बाहुल्या भारतात तयार झाल्यानंतर जगभरच्या प्रसाधन कंपन्यांनी भारत ही हक्काची वसाहत बनवून टाकली. ईस्ट इंडिया कंपनीच्या लुटीला त्रोटक ठरवू शकणारी परदेशी प्रसाधनांची धनजोड बाजूला ठेवली, तरी भारतीय आबालवृद्धांना सौंदर्यअट्टहासाच्या या मार्गातील कुरूपतेची जराही कल्पना नाही. नव्या उत्पादनांच्या मागे सौंदर्यप्रेमींकडून त्वचेवर केल्या जाणाऱ्या अत्याचारावर आणि एकूणच सौंदर्यसंकल्पनेवर या सूर्यतीव्रतेच्या दिवसांत टाकलेला वेध..

प्रसाधनांचे अंतरंग
इजिप्तमध्ये सौंदर्यप्रसाधनांचा वापर हा देव-देवतांचा सन्मान करण्यासाठी, त्याचबरोबर शरीराची काळजी घेण्यासाठी होता. रोमन सनेटने असा कायदा केला होता की, स्त्रियांनी सौंदर्यप्रसाधने सार्वजनिक पातळीवर वापरू नयेत. त्या कायद्याचे नाव ‘लेक्सोपिया’ असे होते. शरीर दिवसभर सुगंधी ठेवण्यापासून ते केसांना नवजीवन देणाऱ्या जाहिरातींचा दररोज आपल्यावर मारा होत असतो. या प्रसाधनांमध्ये आयुर्वेदिक जडीबुटी असल्याची आणि त्यांच्या गुणगायनाची अंताक्षरीच आपल्याला पाहायला मिळते. या प्रसाधनांच्या वापरात अलीकडे लिंगभेदही पुसट झाला आहे. महत्त्वपूर्ण प्रसाधनांच्या अंतरंगात डोकावले, तर जाहिरातीमध्ये या बाबी कधीच आपण पाहिलेल्या दिसत नाहीत. जे प्लास्टिक पर्यावरणात जाऊन हानी करते त्याचे अगदी नॅनोकण म्हणजे मायक्रोप्लास्टिक हे सौंदर्यप्रसाधनात वापरले जाते. त्यांच्या वापरातून ते पर्यावरणात मिसळते. प्लास्टिकचे हे मणी काही मिलिमीटर रुंदीचे असतात. अमेरिकेत १२०० क्युबिक मीटर मायक्रोप्लास्टिक सौंदर्यप्रसाधनात वापरले जाते, न्यूयॉर्कमध्ये सौंदर्यप्रसाधनात प्लास्टिक वापरण्यास बंदी आहे. स्क्रबमध्ये ते जास्त वापरतात. पूर्वी अप्रिकॉट केरनेल, वॉलनट, कोरडे खोबरे स्क्रबमध्ये वापरले जात असे. त्याऐवजी आता प्लास्टिकचे कण पीई, पीपी व पीईएमए या नावाने वापरले जातात. आपल्या टीव्हीवरील मालिका, क्रिकेट मॅच प्रायोजित करणाऱ्या कैक कंपन्यांची धेंडे हा मार्गच चोखाळतात.

ब्लीचिंग क्रीम की भीषण क्रीम?
 त्वचा काळी पडू नये यासाठी ती काळी पडल्यानंतर गोरी कशी करता येईल, याचा विचार केला जातो. सनस्क्रीन लोशन जर नीट चोळून लावले व २५ मिनिटे ठेवून मग बाहेर गेले तरच फायदा होतो, अन्यथा त्याचा फारसा फायदा होत नाही. त्यामुळे त्वचा काळी पडते. पाश्चात्त्य देशात सूर्यप्रकाश फारसा नसतो त्यामुळे सनबाथ घेण्याची वेळ येते; पण येथे हेही लक्षात ठेवा की, सूर्यप्रकाशामुळे शरीरात ‘डी’ जीवनसत्त्व तयार होत असते. ब्लीचिंग क्रीममध्ये हायड्रोक्विनोन व रेटिनॉइड हे त्यातील प्रमुख घटक असतात, हायड्रोक्विनोन हा घटक त्वचेचा काळपटपणा घालवतो. तो दोन टक्के प्रमाणात वापरायचा असताना चार टक्के वापरला जातो. सहा महिन्यांच्या वर त्यांचा वापर करणे चुकीचे आहे, अन्यथा ‘ऑख्रोनेलिक’ हा त्वचेचा रोग होतो. नसíगकदृष्टय़ा  विचार केला तर अंडी, मासे यांचा आहारात समावेश करणे हा त्यावरचा एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. रेटिनॉइडमुळे त्वचा पातळ बनून ते आत मुरते व त्वचेला काळसरपणा आणणाऱ्या मेलॅनाइनचे प्रमाण कमी होते. यात मेलॅनोसाइट या पेशींना धक्का न लावता हा परिणाम साधला जातो. अनेक वनस्पतीजन्य घटकही यात वापरतात, त्यात अरब्युटिन, पेपर मलबेकी, ग्राबरटिन, अलोसिन, जेनटिस्क अ‍ॅसिड, हेरपरडाइन, अस्कॉरबिक अ‍ॅसिड, मॅग्नेशियम अस्कॉरबिल फॉस्फेटस नियासिनामाइड, यीस्टची उत्पादने, सोयाबीन प्रोटिन्स, पॉलिफेनॉल याचा वापर केला जातो. अझेलेइक अ‍ॅसिड, कोजिक अ‍ॅसिड, मेक्विनॉल आयसोप्रोपील कॅट्कॉल हे इतर घटकही वापरले जातात. सध्या बाजारात जी स्कीन व्हाइटिनग क्रीम मिळतात, त्यात सोडियम लॅक्टेट, अस्कॉरबिल फॉस्फेट (२०० टक्के) व सोडियम लॅक्टेट, व्हिटोनिल, अल्फा अरब्युटीन हे घटक असलेले स्कीन व्हाइटिनग क्रीम मेलॅनिन (काळेपणा आणणारा घटक) ५२ टक्के  कमी करतो व तीन महिन्यांत त्वचेचा काळेपणा नाहीसा होतो. लक्स इनटेनसिव्ह, इल्युमिनेटर ६ आय, डरमॉलॉजी स्कीन ब्रायटर, लॅक्टिक अ‍ॅसिड फिफ्टी पर्सेट जेल ही उत्पादने जास्त चांगले परिणाम देऊ शकतील असा दावा करण्यात आला आहे; तरीही त्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये.

स्मृतिभक्षक डिओडरंट
आपल्या शरीरात २६ लाख घर्मग्रंथी डर्मिस नावाच्या थरात असतात. ओठ, स्तनाग्र, िलग यांजवळ त्या नसतात. बाकी सगळीकडे असतात. त्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाण्यावाटे घाम बाहेर टाकतात. महिला व पुरुषांच्या डिओडरंटचे घटक सारखेच असतात. त्यात सीएफसीचा वापर असल्याने ते घातक ठरतात. मम या नावाने फिलाडेल्फियात पहिला अँटीपरस्पिरंट म्हणजे घामरोधक तयार करण्यात आला. त्याचे पेटंट ज्यूल्स माँटेनियक यांना मिळाले, पण घाम रोखणे हे निसर्गाच्या विरोधात आहे. डिओडरंटमध्ये अ‍ॅल्युमिनियम क्लोरोहायड्रेट, अ‍ॅल्युमिनियम झिरकोनियम टेट्राक्लोरोहायड्रेट्स यांचा वापर असतो. ती मेंदूत साठून स्मृतिभ्रंशाचा धोका असतो. सध्या स्त्रिया व पुरुष डिओडरंट यथेच्छ वापरताना दिसतात. एकतर ते कपडय़ावर फवारावे. अंगावर फवारण्याचे डिओडरंट वेगळे असतात, तेही वापरण्याची गरज नाही. साधे डिओडरंट कपडय़ावर फवारले तर खूप वाईट परिणाम होत नाही.

नेत्रदु:खद मस्कारा?
  डोळ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या घटकात पूर्वी कोळशाचा वापर केला जात असे. आता त्यात पाणी, मेण, थिकनर, रंग, कार्बन व लोहाचे ऑक्साइड (तपकिरी रंगासाठी) वापरतात. पॅराफिन तेल, एरंडाचे तेल यातही वापरतात. यात वॉटरप्रूफ मस्काराही मिळतो, पण तो घातक ठरू शकतो, कारण त्यात पाणी वापरलेले नसते. सौंदर्य वाढविण्याच्या नादात डोळ्यांना आणि त्या भोवतालच्या भागाला अधिक कुरूप करण्याचा प्रकार यातून होऊ शकतो.

वयरोधक क्रीम्स
 आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर सुरकुत्या येतात याचे कारण वयपरत्वे कोलॅजेनची निर्मिती थांबते. सूर्यप्रकाश व धूम्रपान यामुळे कोलॅगेन कमी होते. त्यामुळे सिगारेटपासून दूर राहणे व सनस्क्रीन क्रीम लावले तर सुरकुत्या लगेच येणारच नाहीत. सुरकुत्या घालवणाऱ्या या क्रीममध्ये अँटीऑक्सिडंट (ई-जीवनसत्त्व), ह्य़ालुरोनिक आम्ल (बाष्प शोषणारे माइस्चरायझर), हायड्रॉक्सी आम्ल (जुनी त्वचा काढून टाकण्यासाठी), पेप्टाइड (यात पेंटापेप्टाइड व कॉपर पेप्टाइड कोलॅगेनच्या निर्मितीसाठी वापरतात), रेटिनॉल (रेटिनल-ए जीवनसत्त्वयुक्त संयुगाचा प्रकार) यांचा वापर केला जातो. यांनी वयरोधनचा सुखद प्रकार दिसत असला, तरी कालांतराने दुष्परिणाम दिसू लागतो.

टोनर
यालाच फ्रेशनर, अ‍ॅस्ट्रिंजंट असेही म्हणतात. क्लीनझरला जी धूळ काढता येत नाही ती काढण्याचे काम  ते करते. टोनर्स हे पाणी, अलोव्हेरा (कोरफड) किंवा चमेली, वनस्पती तेले यांची बनवलेली असतात. तर फ्रेशनर्स ही अल्कोहोलमुक्त तर अ‍ॅस्ट्रिंजंट ही अल्कोहोलयुक्त असतात. पुटकुळ्या ज्यामुळे तयार होतात ती मृत त्वचा काढण्यासाठी सॅलिसिलिक अ‍ॅसिड वापरतात. ते त्वचेची सर्व छिद्रे स्वच्छ करते, जीवाणूंना मारते. अल्कोहोल आधारित टोनर्समुळे त्वचेला फायदा होतो. पाणी व ग्लिसरीनमिश्रित, रोझ वॉटर किंवा संत्र्यासारख्या आंबट फळांच्या अर्काने चांगला फायदा होतो, ते सुवासिकही असतात. पाण्यावर आधारित टोनर्सही मिळतात त्यात नियासायनामाइड व अँटीऑक्सिडंट हे घटक असतात. तुमच्या त्वचेचा पोत बघून डॉक्टरांकडून टोनर ठरवून घ्या, कारण काहींची त्वचा कोरडी असते, काहींची नसते. जाहिरातींनी भुलून जागतिक ब्रँडच्या उत्पादनांचा वापर त्वचेवर केल्यास प्रत्येकालाच फरक जाणवत नाही, याचे कारण प्रत्येकाच्या त्वचेची त्या कृत्रिम उपायांना साद देऊ शकत नाही.

लिपस्टिक
लिपस्टिकमध्ये मधमाश्यांच्या पोळ्यातील मेण, कँडेलिला मेण (मुळीपासून मिळवलेले), कारनुबा मेण (पामच्या झाडापासून मिळणारे मेण) वापरतात. लिपस्टिक ओठांच्या आकारात पसरवण्यासाठी ते वापरले जाते. त्यात तेलही वापरतात. एरंड, वनस्पती तेल, लॅनोलिन, खनिज तेल, कोको बटर यांचा वापर करतात. रंग म्हणून बिस्मथ ऑक्सिक्लोराइड, मँगनिज व्हायोलेट टिटॅनियम ऑक्साइड, रेड नं. ६, रेड नं. २ ऑरेंज नं. १७, रेड नं. ३४ हे रंग वापरतात, ते झाडांपासून मिळवलेले असतात. मिश्रण बनवण्यासाठी अल्कोहोल व सुवासाचा वापर करतात. ते टिकण्यासाठी त्यात अँटीऑक्सिडंट वापरतात. लिपस्टिक चमकण्यासाठी हेिरग माशाच्या खवल्यांची पूड वापरतात. त्यात सिलिका, मायका, कोरफड, जोजोबा वनस्पतीचे तेल, श्ॉमोमाइल चेस, हळद, बीटकंदाचा अर्क वापरतात. त्यात शिसे, कोळसा, कॅरेमाइन, कोलटार, कृत्रिम सुवास निर्माण करणारे घटकही असतात.

केसांचा रंग
केसांचा रंग हा मेलॅनिनवर अवलंबून असतो. रिफीलमधील शाई संपली की ती पांढरी दिसते. त्यामुळे केसातील मेलॅनिन संपले की, केस पांढरे दिसू लागतात. माणसाचे केस महिन्याला ०.५ इंच वाढतात. आपल्या डोक्यावर साधारण एक ते दीड लाख केस असतात. केसात युमेलॅनिन व (जे केसांना तपकिरी ते काळा रंग देते) दुसरे फॅमेलॅनिन (त्यामुळे केस पिवळसर, लालसर दिसतात) असते. आपण केसांना परस्पर जे रंग लावतो ते चुकीचे आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय रंगांचा वापर करू नये. काही लोक सहजपणे मेंदीचा वापर करतात. १८९९ पर्यंत केस रंगवण्यासाठी नसíगक पदार्थ वापरले जात असत. फ्रान्सचा रसायनशास्त्रज्ञ युजेन शुलर याने प्रथम १९०९ मध्ये केसांचा रंग तयार केला, त्यात पॅराफेनिलिनडायामाइन वापरलेले होते. नंतर फ्रेंच हार्मलेस डाय कंपनीने तो बाजारात आणला. नंतर लोरियल कंपनीने केसांच्या रंगांची दुनिया बदलून टाकली. काही रंग तर असे आहेत की, बारा वेळा श्ॉम्पू केल्यानंतरही जात नाहीत. हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर यात रंग बसण्यासाठी केला जातो. त्याचे प्रमाण ३० टक्के ठेवावे लागते. अमोनियाचा वापर अल्कलाइन म्हणून केला जातो. हायड्रोजन पेरॉक्साइड व अमोनिया यांच्या मिश्रणामुळे रंग केसाच्या क्युटिकल भागापर्यंत जातो. केसांच्या पोतानुसार कुठला रंग लावणे योग्य ते ठरते त्यावर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

फेस मॉइस्चरायझर
 यात नसíगक पदार्थ म्हणून दुधाचा वापर करता येतो. कृत्रिम मॉइस्चरायझरमध्ये त्वचा तुकतुकीत होते. यात डाय मेथीकोन हा घटक वापरतात; त्यामुळे त्वचेला संरक्षक थर मिळतो, त्वचा तडकत नाही. पेट्रोलॅटम, लॅनोलिन, खनिज तेल, हायलॅरॉनिक अ‍ॅसिड यांचा वापर यात करतात. त्यामुळे त्वचा मऊ राहते. शरीरात हे अ‍ॅसिड असते, पण ते वेगळ्या स्वरूपात असते. सेरॅमाइडस नावाचा घटकही त्वचेच्या बाहेरच्या थरातील चरबीत असतो. आपली त्वचा पेशींनी बनते; या पेशीच्या मधल्या भागात सेरॅमाइड नसेल तर त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे त्याचा यात वापर केला जातो, पण त्याचे प्रमाण कमी असते.

टॅटू
 ही प्रिय व्यक्तीप्रती निष्ठा व्यक्त करणारी खूण असते. काही वेळा गंमत म्हणूनही टॅटू करतात. पूर्वी स्त्री व पुरुष अशा प्रकारे नाव शरीरावर गोंदवीत असत. आदिवासींमध्ये गोंदवण्याच्या प्रथा पूर्वीपासून आहे. एकोणिसाव्या शतकात टॅटू मशीन अस्तित्वात आले. टॅटू कृष्णधवल व रंगीत दोन प्रकारचे असतात. अल्ट्राव्हायोलेट टॅटू फक्त अंधारात हव्या त्या व्यक्तीलाच म्हणजे निकटच्या व्यक्तीला दिसतात. १८ ते ३० वयोगटात टॅटू काढले जातात, त्यात लेसर यंत्र, सुया व यूव्ही इंक वापरली जाते. साधा टॅटू १८ महिन्यांत आपोआप जातो, यात जंतुसंसर्गाची भीती असते. त्यामुळे फॅशनसाठी हा धोका घ्यायचा की नाही हे ज्याने त्याने ठरवावे.

सनस्क्रीन लोशन
 यात त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण केले जाते. त्यात पॅराअमिनोहेनझॉइक असिड हे अतिनील किरण शोषणारे रसायन वापरतात. त्याचा वापर नंतर बंद करण्यात येऊन बेन्झोफेनोन वापरले जाऊ लागले. यात अतिनील किरण परावíतत करण्यासाठी टिटॅनियम ऑक्साइड व िझक ऑक्साइड ही रसायने वापरतात. पण हे लोशन पुरेशा प्रमाणात २५ मिनिटे अगोदर लावल्याशिवाय फायदा होत नाही. यात त्वचा काळी करणारे मेलॅनिन कमी तयार होते, त्यामुळे त्वचा काळी पडत नाही.

प्लास्टिक सर्जरी
प्लास्टिक सर्जरी याचा अर्थ प्लास्टिक घेऊन शरीरात भरतात असा नाही तर सिलिकॉन व इतर पदार्थ वापरून शरीराला पुन्हा आकार दिला जातो. काहींचा ओठ तुटलेला असेल, भाजल्याने जखमा असतील तर कालांतराने त्यावर प्लास्टिक सर्जरी करून हवा तसा आकार दिला जातो. यात प्लास्टिको याचा अर्थ शरीराला हवा तसा आकार प्राप्त करून देणे हा आहे. प्लास्टिक सर्जरीत बोटुलिझम जिवाणूपासून तयार केलेले बोटोक्स हे विषारी औषध चेहऱ्याचे स्नायू तात्पुरते बधीर करून सोडले जाते, त्यामुळे सुरकुत्या निर्माण करणारे स्नायू आक्रसतात व तूर्त सुरकुत्या दिसत नाहीत. ४-६ महिने हा परिणाम टिकतो. काही वेळा ह्य़ालुरोनिक आम्ल इंजेक्शनने चेहऱ्यावर टोचतात. त्याचे दुष्परिणाम आहेत. पुरुषांच्या पोटावरची चरबी काढण्यासाठी लिपोसक्शन केले जाते. स्त्रियांमध्ये स्तनवृद्धीसाठी ब्रेस्ट इम्प्लांट केले जातात. ते सलाइनचे व सिलिकॉनचे अशा दोन प्रकारांत मिळतात. यात जेलचा वापर करता येतो त्यामुळे आकार सगळीकडे सारखा दिसतो. सिलिकॉनचे जास्त काळ टिकतात. पण दोन्हीमध्ये ते फुटण्याचा धोका असतो त्यामुळे आरोग्यास धोका होऊ शकतो.

भारतात सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ येत्या काही वर्षांत १५ ते २० टक्के म्हणजे अमेरिका व युरोपच्या बाजारपेठेपेक्षा दुप्पट असेल. फास्ट मूव्हिंग कंझ्युमर प्रॉडक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्पादनांना खूप मागणी आहे. स्किन व्हायटिनग क्रीम ही पुरुष व महिला दोघेही वापरतात. त्यांचा बोलबाला सध्या जास्त असला तरी इतर सौंदर्य उत्पादनांचा खपही चांगला आहे. गेल्या पाच वर्षांत सौंदर्य उत्पादनांची बाजारपेठ ६० टक्के  वाढली. त्वचेची काळजी घेणारी उत्पादने मागे पडली. अँटी िरकल क्रीम, क्लीन्झर्स व टोनर्स यांच्यापेक्षा फेशियल क्रीम, मॉइस्चरायझर्स व फेअरनेस क्रीम यांना जास्त मागणी असून पाँडस व फेअर अँड लव्हली या कंपन्या त्यात आघाडीवर आहेत. सलूनचा वाढीचा दर ३५ टक्के आहे. सौदर्योपचारांचे प्रमाण ५ टक्के आहे. केस व सौंदर्य यांचाही संबंध असून त्यावर दरडोई खर्च वर्षांला १.२ डॉलर आहे. तो २०१५ पर्यंत ६.२ डॉलपर्यंत जाईल. स्पा व बॉडी ट्रीटमेंटची बाजारपेठ पाच ते आठ वर्षांत ७७.२ कोटी असेल.
– मासूमा, संपादक, न्यू एज सलून अ‍ॅण्ड स्पा मॅगझिन

आमच्याकडे उपचार करून घ्यायला येणाऱ्यात दिवसाला दोन-तीन जण त्वचेच्या समस्या घेऊन येतात. त्यांना फेअरनेस क्रीम हवे असते. त्वचा गोरी करवून घेण्यासाठी ते आलेले असतात. त्यात आता मुले-मुली दोन्हीही असतात, पण आमचे नीतीशास्त्र पाहिले तर त्वचा गोरी करणारे असे कुठलेही औषध नसते. त्यामुळे अशी क्रीम्स लावून थोडाफार फायदा होत असला तरी विपरीत परिणामही होऊ शकतात.
– डॉ. अलका डोग्रा, त्वचारोगतज्ज्ञ

आपण सुंदर दिसणे म्हणजे गोरे असणे ही एक मानसिकता समाजात रूढ आहे. त्यामुळे मुले-मुली त्यामागे लागलेले आहेत. गोरी त्वचा म्हणजे सुंदरता असे समीकरणच झाले आहे, पण ते सगळे समज आपल्या मेंदूत पक्के बसलेले आहेत. प्रत्यक्षात तसे नसते. शहरातील लोकांचा तो सौंदर्याच्या आकलनाचा मापदंड आहे.
– बी. पी. मिश्रा, मानसशास्त्रज्ञ

भारतात गोरेपणाचे आकर्षण पूर्वीपासून आहे. आता त्यात भरच पडली आहे. आपण भारतीय लोक गोऱ्या कातडीच्या कल्पनेने इतके भारावून गेलो आहोत त्याचा पगडा कायम आहे. ब्रिटिशांच्या वसाहतवादी राजवटीचा तो परिणाम आहे. अमेरिकी संस्कृतीचा प्रभाव आपल्यावर आहे, तिथे असण्यापेक्षा दिसण्याला फार महत्त्व दिले जाते. माझ्या मते अमेरिकेत ऑपरा विन्फ्रे नावाची टीव्ही कार्यक्रम सादरकर्ती लोकप्रिय बनली, पण ती वर्णाने काळी आहे म्हणजे रंगाचा आणि यशस्वीतेचा काही संबंध नसतो. भारतात अशी खास भारतीय धाटणीची ऑपरा विन्फ्रे जन्मली तर आपल्यालाही आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटेल. वारशाचा अभिमान वाटेल व आपण जसे दिसतो त्याचा तर नक्कीच वाटेल.
प्रिय वॉरिक, माजी मिस इंडिया

सौंदर्येतिहासाचे महत्त्वाचे टप्पे
१९१५ मध्ये लिपस्टिकचा वापर हा पोर्टेबल लिपस्टिकने वाढवला, अरब वैज्ञानिक व शल्यविशारद अबुलकासिस याने (आधुनिक शल्यशास्त्राचा पिता) घन स्वरूपात लिपस्टिक तयार केले. ते पेंटब्रशशिवाय लावता येत असत. कॅथॉलिक चर्चने सौांदर्यप्रसाधनांना विरोध केला, त्यामुळे नंतर काही काळ त्यांचा वापर कमी झाला. त्यानंतरच्या काळात राणी एलिझाबेथ प्रथम यांनी गोरा चेहरा व लालचुटूक ओठ ही स्टार्क व्हाइट फॅशन आणली होती, त्यात विषारी रंग असूनही त्यांचा वापर होत असे.
१९२० म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास सौंदर्यशास्त्रज्ञ व रसायनतज्ज्ञ असलेल्या व्यक्तीने एका वेळी मस्कारा, आयब्रो पेन्सिल, लिप ग्लॉस, सनस्क्रीन तेल, हेअर स्प्रे ही सगळी साधने शोधली होती. पण ती कुणी वापरताना पकडले गेले तर लगेच फासावर लटकावले जात असे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला डिओडरंटचा (दरुगधीनाशकाचा) शोध लागला होता. कोलगेट ही दातासाठी वापरायाची टूथपेस्टही बाजारात आली होती.
१९६० –    मध्ये मुलींनी माफक प्रमाणात मेकअप वापरायला सुरुवात केली. आता सौंदर्यप्रसाधनांचा उद्योग वर्षांला २० अब्ज डॉलरने वाढला.
१७०० -मध्ये जपानमधील गेइशा वापरत असत तो व्हाइट गेइशा पेंट आला.
१८८८ -मध्ये पहिले डिओडरंट बाजारात आले.
१८९२ -अमेरिकेत ‘व्होग’ हे पहिले फॅशन नियतकालिक आले.
१८९६ –   कोलगेट टूथपेस्ट बाजारात आली.
१९०७ -लोरियल कंपनीने केसांना लावता येईल असा पहिला सुरक्षित हेअर डाय शोधून काढला.
१९१५ -पोर्टेबल लिपस्टिक बाजारात आली.
१९३६ –  लोरियल कंपनीने सनस्क्रीन बाजारात आणले.
१९४८ -पहिला हेअर स्प्रे तयार करण्यात आला.
१९९७ -प्रगत देशांसाठी वेशभूषेसाठी आणि दुसऱ्या-तिसऱ्या जगातील देशांसाठी संस्कृती घुसळण करणारी फॅशन टीव्ही ही वाहिनी सुरू झाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Thats इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Potential threats of using make up cosmetics

ताज्या बातम्या