|| गजेंद्र अहिरे

विनया मला तशी प्रत्यक्ष कधी कुठे भेटली आठवत नाही का ती मनातच होती? ‘शेवग्याच्या शेंगा’मध्ये जेव्हा ती आली तेव्हा, तिनं नाटकाच्या अक्षांश रेखांशाचं काम केलं, पण आता तिच्याविषयी लिहिताना जाणवतंय ती म्हणजे मीच होतो..

नाटकाचा पडदा सरकतो आणि विनया दिसते. तिच्या हातात कॅमेरा आहे. डायरी लिहिण्याची तिची ही वेगळी पद्धत आहे, ती कॅमेऱ्यात बोलते. आता काय वाटतंय ते, आणि रेकॉर्ड करून ठेवते. ती एकेक पात्र सांगू लागते.. विद्या मॅडम, मग ससाणे, मग आरती आणि शेवटी विनयाचा बॉयफ्रेंड..

ती हे सगळं तिच्या कॅमेऱ्याशी बोलतेय आणि जे काही सांगू पाहतेय ते नाटकात दिसत जातं. शोध शोध शोधल्यावर तिला विद्या मॅडमच्या बंगल्यात पेइंग गेस्ट म्हणून राहायला जागा मिळाली आहे. विनया हौशी फोटोग्राफर आहे आणि तिला करिअर ही यातच करायचंय. आई मराठी, वडील बंगाली. वडिलांनी तिला पूर्ण स्वातंत्र्य दिलय. तिचं लहानपण कोलकात्यात गेलंय आणि आता ही मुंबईत स्थिरावतीये.

विनया आत्ताच्या पिढीची आहे. वर्तमानात आजमध्ये जगणारी.

ससाणे जेव्हा टपरीवर किती मुली सिगरेट घेऊन गेल्या याचा स्कोअर लिहीत असतात तेव्हा आरती खवळते नि किती मुलांनी सिगारेट घेतल्या हे का नाही मोजत विचारते, त्यावर ससाणे म्हणतात, ‘‘त्यात काय मुलं घेतातच..’’

विनयाचा प्रियकर म्हणतो, ‘‘ससाणे बरोबर आहे.’’ यावर विनया म्हणते की, ‘‘याचा बाऊ काय करताय. कुणीच नको ओढायला खरं तर. आमच्या खेडय़ात कित्येक आज्या सर्रास विडय़ा ओढत होत्या. त्यात कुणाला काहीच वाटलं नाही. एकशे तीन वर्षांची पणजी गेली, ती रोज एक कप दारू पीत होती.’’ या गोष्टींचं ती समर्थन नाही करत आणि कौतुकही करत नाही. विनया विद्या मॅडमकडे राहते. त्यांच्या जगण्याचा एक वेगळा अँगल तिला दिसतोय. या बाई झाडांना पाणी घालताना बघून ससाणे खवळतात. त्यांच्याकडे तिसऱ्या मजल्यावर पाणी येत नाही बाई सांगतात, ‘‘मी दिवसाआड आंघोळ करते आणि ज्या दिवशी करत नाही ते पाणी या झाडांना घालते. आंघोळ नाही केली तर माणसं मरत नाहीत, झाडं मरतात.’’ ससाणे आणि विद्या दोन टोकाची दोन माणसं, दोघांचे जोडीदार गेलेले, दोघेही एकटं आयुष्य जगताहेत. मग सोबत का नाही राहायचं? सोबत होईल एकमेकांना. पण या, ‘का नाही’च्या उत्तरात अनेक प्रश्न दडलेत. ससाणेच्या मुलीला हे कळतं तेव्हा ती प्रोत्साहन देते. विद्याच्या मुलाला कळतं. तो अमेरिकेत आहे. तो घाबरतो. बाबांची कुणी एक होती म्हणून अर्धी प्रॉपर्टी गेली. आता आईचा कुणी एक आहे म्हणून उरलेली जायला नको. तो इथे येऊन थयथयाट करतो.

पर्सनल लाईफमध्ये लक्ष्य घालायचं नाही या बोलीवर विनयाला ही जागा मिळालीये. ती अलिप्तपणे हे सारं पाहतेय, पण शेवटी विद्या मॅडमला तिच्याकडे व्यक्त होण्याशिवाय मार्ग उरत नाही. विनयाला खरं तर ससाणे आणि विद्या यांनी एक कुकर, एक इलेक्ट्रिसिटी, एक छत असं एकत्र येऊन राहणं अत्यंत प्रॅक्टिकल वाटतंय. दोघे एकटे आहेत आणि दोघांमध्ये मैत्र आहे. किती सहज भावना आहे ही. खरं तर काळाची गरज आहे ही.. कित्येक आजी- आजोबा असे आहेत ज्यांची मुलं गोतावळा दूर आहे. अशात एखादी आधाराची ऊब मिळाली तर स्वीकारायला नको?

आरती विनयाला सतत तिने केलेली पॉटरी दाखवायला आणि तिचे फोटो काढायला बोलावत असते. इथेही पुन्हा विनया आरतीचा आउटलेट आहे. आरतीचा नवरा लैंगिकदृष्टय़ा असमर्थ होत गेला. त्याने स्वत:च आरतीला मोकळं केलं, आरती उधळली आणि शांत होत गेली. आरतीची कहाणी विनयाला करुण वाटत नाही. आरतीने आता तिच्या तरुणपणीचा फोटो टाकून फेसबुक प्रोफाईल बनवलंय आणि ती नवनवीन व्हच्र्युअल बॉयफ्रेंड करत चाललीये. तिला त्यात एक्साईटमेंट वाटतेय. प्रत्यक्ष कुणाला भेटायचं नाही, पण मजा खूप वाटतेय अशा झोनमध्ये आरती आहे. विनया तिला सांगते, ‘एक दिवस तू यात लटकशील’, पण हा खेळ आरती तिच्याशी शेअर करत राहते. आरतीचा आनंद विनया मान्य करतेय पण त्यात सामील होत नाही.

विद्या मॅडमने ठणकावून सांगितलंय, इथे बॉयफ्रेंड आणता येणार नाही. विनया तिच्या मित्राला गळ घालते. मला फोटो शूटला जायचंय. दहा दिवस जंगलात जाऊ. खरं तर तिला त्याच्या सहवासात वेळ घालवायचाय. तोही मोठय़ा मुश्किलीने वेळ काढतो आणि जातो. दोन दिवसात ‘परत फिरू या’ म्हणू लागतो, हेच दिवस आहेत मरमरून काम केलं पाहिजे. विनया म्हणते हेच दिवस आहेत भरभरून जगायला हवं.

तो परत फिरतो ती एकटी जंगलात राहते. तिचा प्रोजेक्ट पूर्ण करूनच येते. परत येते तेव्हा विद्या मॅडम पडल्यात. त्यांचा पाय मोडलाय आणि ससाणे त्यांची काळजी घेताहेत. एक नवं नातं फुलतंय, तू तिकडे जाऊ नकोस माझ्याकडेच राहा असं सांगून आरती तिला आपल्याकडे नेते.

विनयाचं तिच्या मित्रावर खूप प्रेम आहे, तो खूप ‘फोकस्ड’ आहे. त्याचा प्रोजेक्ट उभा राहतोय आणि ती त्याला सतत साथ देतेय.

एकदा झारा येते युरोपातून गोव्याला.. झारा आणि विनया फोटोंच्या निमित्तामे झालेल्या मैत्रिणी. झारा पन्नाशीजवळ आलेली, ही पंचविशीची. ती झाराला भेटायला गोव्याला जाते. मित्राला गळ घालते, तो म्हणतो शनिवारी येईन खूप काम आहे.

झारा पंजाबी ड्रेस घालून समुद्रात जाणाऱ्या बायकांवर हसते. इथला पेहराव वेगळा आहे का? झारा आणि विनया बिकिनीवर समुद्रात जातात. बीचवर हुंदडतात. विनयाचा मित्र येतो आणि वैतागतो, ‘अशी काय फिरतीयेस, लाज नाही का वाटत?’ विनयाला त्याचं रागावणं समजतच नाही, हा इथला पेहराव आहे. समुद्रावर तोच असायला हवा.

संध्याकाळी विनया बंगाली साडी नेसते. तो खूश होतो आणि झारा तिच्या प्रेमात पडते. किती सुंदर दिसतीयेस तू? मी लेस्बिअन असायला हवं होतं म्हणते..

झाराचं ब्रेक अप झालंय. आता परत गेली की ती दुसऱ्या नात्याचा शोध घेणार, दोन नात्यांच्या मधली ही मधली सुट्टी होती. ती मधल्या सुट्टीवर आली होती. विनया ही गोष्ट समजून घेते.

तिच्या मित्राचा प्रोजेक्ट आता जमू लागलाय, तिचे वडील म्हणतायत लग्न कर त्याच्याशी आणि मोकळी हो. विनयाला प्रश्न पडतो मोकळी तर मी आता आहे, लग्न करून मी मोकळी कशी होऊ.

वडिलांनी सगळं स्वातंत्र्य दिलं. पण मुलीच्या लग्नाच्या बाबतीत जगातला प्रत्येक बाप सारखाच विचार करत असावा.

विनया, विद्या मॅडम, आरती, ससाणे या पन्नाशी ओलांडलेल्या माणसांच्या नात्यांचे बारकाईने निरीक्षण करते. तिला समजतं प्रियकर-प्रेयसी म्हणून आपण आपल्या मित्राबरोबर परफेक्ट आहोत. पण लग्न?

लग्नाच्या मागण्या वेगळ्या आहेत, तो अगदीच परिपूर्ण आहे. सरळ रेषेत जाणारा महत्त्वाकांक्षी मेहनती आणि मी? मी कलावंत आहे, मोकळी आहे वेगळ्या फ्रेम्स शोधणारी कॅमेरा हाताळणारी. विनया धीराने निर्णय घेते, तिला त्याचं भलं समजतंय. त्याला परफेक्ट बायको मिळायला हवी आणि ती तसा प्रयत्न करते. हिशोबाशी हिशोब जुळायला हवा, गणिताचा ताळा व्यवस्थित यायला हवा.

..आणि एक दिवस त्याचे आर्थिक व्यवहार सांभाळणारी हुशार मुलगी मागणी घालते. तो म्हणतो मला गर्लफ्रेंड आहे. ती मुलगी म्हणते मला माहीत आहे. त्या काय असतातच! आज नसेल तर उद्या होणारच नाही याची काय खात्री. माझ्याशी लग्न कर. विनया या प्रपोजलसाठी त्याला प्रोत्साहन देते आणि नात्यातून बाहेर पडते, कॅमेरा घेऊन प्रवासाला निघते.

जाण्याआधी आरतीला आलेलं तिच्याच नवऱ्याचं प्रपोजल समजावून सांगते. गरजांची प्रायोरिटी बदलली असेल तर त्याचं ऐक आणि त्याच्याकडे परत जा. विशिष्ट काळ गेला, वय गेलं की नात्याचा दृष्टिकोनच बदलतो, जसा लाईट आणि अँगल बदलला की फोटो काही वेगळं म्हणतो. विनया मला खऱ्या अर्थाने आजची मुलगी वाटते. तिच्या वर्तमान भवतालाने ज्या सुविधा तिला दिल्यात त्याची योग्य समज तिच्याकडे आहे. लिहिताना मी हे लिहून टाकलं. नाटक आलं, कादंबरी कदमने ती भूमिका सुरेख केली. विनयाला चेहरा दिला तिने.. नंतर मात्र मला विनया भेटू लागल्या, अनेकींमध्ये विनयाचं काही ना काही जाणवत राहिलं.

एकदा मी आणि नेहा महाजन ‘नीलकंठ मास्तर’च्या सेटवर गप्पा मारत होतो, तेव्हा तिने झारा आल्याचं सांगितलं आणि ती भेटून आली होती झाराला, तिथून झारा आली लिखाणात. विनया आधी आणि नंतर तुकडय़ा तुकडय़ांत भेटत राहिली. मला विनयाच्या वागण्याची भुरळ आहे.

आता ही विनया माझ्या सिनेमात आहे, पुन्हा नव्याने सिनेमासाठी तिची प्रेमकहाणी चितारली मी आणि ती आणखी गडद आणखी स्पष्ट दिसू लागली. ही आली कुठून ते अजून नक्की सापडत नाहीये, पण ती आहे आणि राहील आसपास..

gajendraahire@hotmail.com

chaturang@expressindia.com