‘महिको’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. बद्रिनारायण बारवाले यांनी स्थापन केलेला ‘महिको’ उद्योग समूह स्पर्धेत मागे पडू नये म्हणून कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण घेत बियाणांवर संशोधन करणाऱ्या, आपल्या व्यवसायाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन संशोधनात नवनवीन प्रयोग करणाऱ्या ‘महिको’च्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. उषा बारवाले-झेहर यांच्याविषयी.

‘महिको’ हा कृषी क्षेत्रातील भारतातील आघाडीचा समूह. बीटी तंत्रज्ञानाने तर तो जागतिक पातळीवरही पोहोचला. अधिकतर निसर्गावर अवलंबून असलेल्या आणि अनिश्चित अशा कृषी क्षेत्राशी संबंधित या व्यवसायाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळण्यास ‘महिको’च्या संस्थापक कुटुंबातीलच एक स्त्री निमित्त झाली. डॉ. उषा बारवाले-झेहर यांनी मराठवाडय़ातील जालना ते अमेरिका असा कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान विकासाचा प्रवास ऐन तारुण्यात सुरू केला. ‘महिको’च्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी या नात्याने डॉ. उषा यांचा तो प्रवास आज वयाच्या पन्नाशीतही कायम आहे.
वडिलांनी लावलेल्या बियाणे उत्पादन व्यवसायाच्या रोपटय़ाची केवळ निगाच नव्हे तर त्याचा निकोप वटवृक्ष करण्यासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची कास डॉ. उषा यांनी धरली. वडिलांनी स्थापन केलेला ‘महिको’ उद्योग समूह स्पर्धेत मागे पडू नये म्हणून मुद्दामच कृषी क्षेत्राशी निगडित तांत्रिक, शास्त्रीय अभ्यासाची निवड डॉ. उषा यांनी केली. मराठवाडय़ातील स्वातंत्र्यसेनानी डॉ. बद्रिनारायण रामुलाल बारवाले यांनी १९६४ मध्ये ‘महिको’ची अर्थात ‘महाराष्ट्र हायब्रीड सीड्स कंपनी’ची जालना (महाराष्ट्र) येथे स्थापना केली. वर्षभरातच ३५० एकर जागेवर त्यांनी बियाणे उत्पादनासह प्रकल्प साकारला आणि पुढील वर्षांतच बियाणांसाठीचे संशोधन व विकास केंद्रही सुरू केले. साठच्या दशकात पहिल्यांदा बद्रिनारायण बारवाले यांनी पुसा सवनी भेंडी हायब्रीड बियाणे तयार केले होते. बियाणे निर्मितीबरोबरच कंपनी संशोधन व विकास क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याकडे अमेरिकेची ‘मॉन्सेन्टो’ कंपनी आकृष्ट झाली व १९९८ मध्ये ‘महिको’समोर सहकार्याचा हात पुढे केला.
विविध जीवनगौरव पुरस्कारप्राप्त व कृषी, सरकारी दप्तरी कृषक संशोधनाची जाण असलेले ‘महिको’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. बद्रिनारायण बारवाले यांना उषासह पाच मुली व एक मुलगा. भावंडांमध्ये पहिल्यापासून काहीशा टॉम बॉय म्हणून वावरणाऱ्या उषा यांचे शालेय, इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण हिंदी माध्यमातून मराठवाडय़ात तेही जालन्यातच झाले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी हिंदी माध्यमातूनच पण मुंबईत घेतले. मुंबईतच त्यांनी ११वी, १२वी केले आणि मग सूक्ष्म जैवतंत्रज्ञान हा विषय पुढे बीएस्सीत निवडला. त्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञान विषयातील पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम त्यांनी भारतात पूर्ण केला. ८० च्या दशकात एम.एस्सी आणि पीएच.डी. (कृषी) त्यांनी अमेरिकेतून पूर्ण केली. वडिलांच्या व्यवसायासंबंधित क्षेत्रातील उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्या ‘महिको’च्या संशोधन विभागात १९९७ मध्ये सहसंचालक म्हणून रुजू झाल्या.
मारवाडी कौटुंबिक पाश्र्वभूमी उषा यांना लाभली असली तरी लहानपणीच काय मोठेपणीही आपल्याला प्रतिगामी वागणूक घरातून कधी मिळालीच नसल्याचे उषा आवर्जून सांगतात. ‘‘आमच्या आईचे लग्न लहान वयातच झाले. तिचे शिक्षणही कमी. पण शिक्षणाच्या बाबतीत आम्हा मुलांना मात्र सर्व स्वातंत्र्य मिळाले. वडिलांचे शेती आणि समाजकार्य प्रत्यक्ष अनुभवतच आम्ही लहानाचे मोठे झालो. शिक्षणासाठी मुंबईत आल्यानंतर इथला प्रवास, इतरांबरोबर वावरणे यामुळे खूप काही शिकायला मिळाले. इथे छोटी छोटी पण खूप आव्हाने होती. त्यातून अनुभव मिळाला जो आत्ताही उपयोगी येतो आहे,’’ असे उषा यांनी सांगितले.
उच्च शिक्षणाच्या निमित्ताने १९९७ पर्यंत त्या अमेरिकेत राहिल्या. वडिलांचा व्यवसाय त्यांनी जवळून बघितला असल्याने याच क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले. त्यासाठी तिथला अभ्यास पूरक ठरला. भारतात परत आल्यानंतर त्या थेट ‘महिको’मध्ये जैवतंत्रज्ञान मोहिमेत सहभागी झाल्या. १५ जणांच्या चमूबरोबर त्या बियाणांवर संशोधन करत असत.
२०००च्या सुरुवातीच्या दशकात ‘महिको’ने बीटी तंत्रज्ञानावर विकसित बियाणे उत्पादन, ही मोठीच उडी होती. केली. कृषी क्षेत्रासाठी हे सारे नवे होते. या सगळ्यामागे उषा यांचे नेतृत्व होते. हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी उषा यांच्याकडे विदेशातील त्यांचा अभ्यास तसेच स्वत:चे संशोधन गाठीशी होते. दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर, योग्य त्या चाचण्यांनंतर त्यांचे बीटी तंत्रज्ञान यशस्वी ठरले. संस्थापक डॉ. बारवाले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महिको’ने सत्तरच्या दशकात हायब्रीड संशोधनाने या क्षेत्रात क्रांती केली होतीच. पण काळाची पुढची पावले ओळखणाऱ्या डॉ. उषा यांनी या व्यवसायाला, क्षेत्राला ‘बीटी’ची जोड देत ‘महिको’ला अव्वल तीन कंपन्यांच्या पंक्तीत नेऊन ठेवले.
कोणत्याही वातावरणात बियाणांचे अस्तित्व टिकवून ठेवणे आणि त्यांची उत्पादनक्षमता वाढवणे हे मुख्य ध्येय ‘महिको’त आमच्यासमोर असल्याचे उषा सांगतात. त्याचीच फलश्रुती ‘बीटी’ हे नवे साधन आहे, असे त्या मानतात. इथे गुणवत्तेशी तडजोड नाही, यावर त्या भर देतात. सध्या उषा यांच्याकडे कंपनीच्या संशोधन व विकास विभागाची जबाबदारी आहे. यानिमित्ताने जालना, मुंबई त्याचबरोबर देश-विदेशात त्यांचे सतत दौरे सुरू असतात. अधिकाधिक व चांगले बियाणे कसे तयार करता येईल यासाठीचा त्यांचा अभ्यास त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करण्यास प्रेरित करतो. पती निधनानंतर उषा ‘महिको’त अधिकच व्यग्र झाल्या आहेत. भावंडांमध्ये लहान-राजेंद्र सध्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. उषा यांची दोन्ही मुले सध्या परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. तर भाचे मंडळी व्यवसायात लक्ष घालू लागली आहेत.
वडिलांचा बियाणांच्या उद्योगाचा वारसा पुढे नेण्यासाठी त्या विषयातील उच्च शिक्षण घेणाऱ्या, कोणत्याही वातावरणात बियाणांचे अस्तित्व टिकवून त्यांची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी अविरत संशोधन करणाऱ्या डॉ. उषा यांचा हा प्रवास आजही अखंडपणे चालू आहे. अधिकतर निसर्गावर अवलंबून असलेल्या आणि अनिश्चित अशा आपल्या कृषी क्षेत्रासाठी तो नक्कीच फायदेकारक ठरू शकेल.

व्यवसायाचा मूलमंत्र :
कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान अशा साऱ्यांची सांगड घालताना कंपनी, शासन तसंच प्रत्यक्ष क्षेत्रात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. अशा वेळी आपल्याला नेमके काय करायचे हे निश्चित करून त्या दिशने पुढे गेले पाहिजे. तंत्रज्ञानाची कास धरून आपल्यासमोरील आव्हानांचा बिमोड करण्यात खरे कौशल्य आहे. व्यवसायात गुणवत्तेशी कधीही तडजोड करू नका.

आयुष्याचा मूलमंत्र :
तुम्ही कुटुंबात, समाजात असता तेव्हा तुमची एक ‘ब्रॅण्ड इमेज’ तयार झालेली असते. तिला धक्का लागेल असे कार्य तुमच्या हातून घडता कामा नये, याची सतत जाणीव ठेवा. तुम्हाला जे काही करायचे त्यासाठी आकाश मोकळे आहे. संधी शोधा आणि पुढे जा. कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. दैनंदिन आयुष्यात प्रत्येकाशी चांगले संबंध जोपासण्याचा प्रयत्न करा.

उषा :
जैवतंत्रज्ञान शिक्षणाची पाश्र्वभूमी असलेल्या उषा यांनी ‘महिको’त सशक्त बियाणांसह त्यापासून होणारे उत्पादन दीर्घकाल टिकणारे आणि अधिक मात्रेत असेल, असे हायब्रीड तंत्रज्ञान विकसित केले. बीटी म्हणून क्रांतिकारक ठरलेले विज्ञान, तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिले बीज त्यांच्या कार्याच्या रूपाने ‘महिको’त रुजले गेले.

‘महिको’ :
हा समूह कृषी क्षेत्रातील विविध २०० हून अधिक बियाणे कंपनी विकसित करतो. तिची २७ उत्पादन केंद्रे, ८ प्रक्रिया प्रकल्प, एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग आणि देशभरात ५ हजारांहून अधिक विक्री दालने ९,००० टन साठवणूक बियाणे उत्पादन, हजारांहून अधिक कर्मचारी असा सारा ‘महिको’ समूहाचा पसारा आजमितीस २००० कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे.
veerendra.talegaonkar@expressindia.com