गिरिस्थान म्हटलं की अनेक वेळा आपल्या डोळ्यासमोर खंडाळा व लोणावळ्याला चालणारा पावसाळ्यातील िधगाणा, माथेरान बाजारपेठेतील गर्दी व मागे लागणारे घोडेवाले, महाबळेश्वरला वेण्णा लेकमधील बोटिंग आणि पावभाजी व चाटच्या स्टॉल्सवरील गोंगाट असंच चित्र येतं. रिसॉर्टवर मोठय़ाने गाणी लावत रेनडान्स करून, सुरक्षिततेचे नियम डावलत धबधब्यांतील निसरडय़ा ठिकाणी जाऊन, रानवाटेवरून वेगात गाडी चालवून व बेजबाबदारपणे कचरा टाकून अनेक लोकं आपल्या बिघडलेल्या शहरी जीवनशैलीची प्रचिती देतात.
फारच थोडे जण तेथील निसर्ग व नीरव शांततेचा अनुभव घेतात. सह्याद्रीतील पठारांवर सर्वच ऋतूत निसर्ग सोहळा अनुभवता येतो. पावसाळ्यात तर ही निसर्गवारी अधिकच मोहक असते. कास किंवा रायरेश्वरसारख्या पठारांवरील सोनकी, तेरडा व अन्य जातींची पुष्पशोभा मंत्रमुग्ध करते तर महाबळेश्वर किंवा आंबोलीसारख्या पठारांवर सदाहरित जंगल डोळ्यांना सुखावतं. प्रचंड पाऊस व वाऱ्याशी टक्कर देत उभी असलेली जांभूळ, अंजनी, गेळा, मेडिशगीसारख्या झाडांची ही घनदाट जंगलं विविध पशु-पक्ष्यांचं आश्रयस्थान आहेत, तर झाडांच्या फांद्यांवर ऑíकड उगवलेली दिसतात. महाबळेश्वरमधील पंचगंगा किंवा आंबोलीमधील हिरण्यकेशीसारखी गर्द रानातील मंदिरं अशीच अनुभूती मिळावी म्हणून आपल्या पूर्वजांनी बांधली असावीत. आज आपण तेथील विहंगरूपी दैवी सौंदर्याचं दर्शन घेणार आहोत. पावसाने मध्येच उघडीप घेतली की हे विहंगगान आपल्याला खुणावू लागतं.
पसरणी घाटातून आपण वर चढू लागलो की पाचगणीपर्यंत तुरळक मिश्र पानझडी रान लागतं. इथे चिमणीपेक्षा थोडा मोठा चकचकीत काळा युवराज मध्येच एखाद्या झुडपावर किंवा खडकावर बसलेला दिसला. कवडय़ा गप्पीदास याच परिसरात दिसण्याची शक्यता असते. पुढे महाबळेश्वरमध्ये लाल मिशीचा बुलबुल सर्वत्र दिसतो. क्षेत्र महाबळेश्वरहून जंगलातील पायवाटेने जाताना मला बुलबुलची दोन पिलं जमिनीपासून केवळ तीन फूट उंचीवर झुडपातील घरटय़ात दिसली होती. पिलांजवळ माणसं दिसताच वर बुलबुल नर-मादीचा कलकलाट चालू झाला. मी मनातल्यामनात त्यांना सांगितलं की त्यांच्या पिलांना काही इजा करणार नाही व पुढे निघून गेलो. तांबटचा भाईबंद असलेला कुतुर्गा इथे दिवसभर ‘कुटरू कुटरू’ असा ओरडताना ऐकू येतो.
महाबळेश्वरच्या जंगलातील डांबरी रस्त्याने किंवा पायवाटेने चालताना करडी रानकोंबडी व त्यासारखीच दिसणारी लाल साकोत्री दिसू शकतात. जिथे जंगल थोडं विरळ किंवा खडकाळ आहे तिथे ठिपकेवाला कवडा व लाल मानेचा कवडा हमखास दिसतात.
क्षेत्र महाबळेश्वर परिसरात सातभाई, पांढऱ्या गळ्याचा सातभाई, विविध प्रकारचे वटवटे, पाकोळ्या, समशेर सातभाई, सामान्य फुलटोच्या, भारद्वाज व जांभळ्या पाठीचा िशजीर असे पक्षी दिसतात किंवा त्यांचा आवाज ऐकू येतो. तिथून पुढे ‘आर्थर सीट’च्या बाजूला माणसांचा वावर कमी असतो. या रस्त्यावर सकाळी किंवा संध्याकाळी पायी फिरल्यास पक्षिनिरीक्षण चांगलं होतं. पांढऱ्या शुभ्र रंगाचा व रिबीनसारखी लांब शेपटी असलेला स्वर्गीय नर्तक सहज दिसतो. याची मादी व लहान वयाचा नर तांबूस रंगाचे असतात. याच रस्त्यावर मला निलगिरी रानकबूतर दिसलाय व अनेक वेळा पट्टेदार कोकीळचा आवाज ऐकलाय.
आंबोली परिसरातील सदाहरित जंगलात सुद्धा असाच पक्षिखजिना निसर्गाने भरून ठेवलाय. लाल मिशीचा बुलबुल, कुतुर्गा, सुभंग, करडी रानकोंबडी व हिरवा वेडा राघू इथे जागोजागी दिसतात. एमटीडीसी विश्रामगृहाच्या मागच्या जंगलात समशेर सातभाई व पट्टेदार कोकीळ यांचे आवाज ऐकू येतात. अतिशय सुंदर व ज्वालेसारखा तेजस्वी शेंद्री िशजीर हा छोटासा पक्षी व एका पाणवठय़ावर पांढऱ्या छातीची पाणकोंबडी मी याच भागात पाहिली आहे. कच्च्या िलबासारखा रंग असलेली पिवळ्या भुवईच्या बुलबुलची जोडी इथल्या एका रिसॉर्ट मालकाने ठेवलेल्या वाडग्यातील पाणी पिताना मी अलीकडे पाहिली. इथे तपकिरी गालाचा फुलवेटा हा लहानसा पक्षीही दिसू शकतो.
चौकुळ गावच्या वाटेवर सुद्धा खूप पक्षी दिसतात. रस्त्याजवळच्या एका घनदाट जंगलाने वेढलेल्या पाणवठय़ावर मी अलीकडे मलबार कस्तुर पहिला. याचा सुंदर तुकतुकीत काळपट निळा रंग व नादमधुर शीळ नेहेमी लक्षात राहते. पावसाळ्यातील ढगाळ वातावरणात गार वारे वाहत असताना तर याची शीळ अधिकच सुंदर भासते. अशा वेळी एकप्रकारची निरामय आध्यात्मिक शांती अनुभवता येते. या स्वर्गीय अनुभवाकरिता आंबोलीला पावसाळ्यात एकदातरी जायलाच हवं. याच जंगलातून एकदा सकाळी दहाच्या सुमारास तपकिरी ससाणा-घुबड ‘व्हू व्हू’ असं ओरडताना ऐकलं म्हणून थोडा पुढे गेलो तर माझ्या येण्याने दचकलेला तुरेवाला सर्पगरुड डौलदारपणे जमिनीवरून झाडांच्या शेंडय़ाकडे झेपावला. शामाचे मंजूळ स्वर याच रस्त्यावर सकाळी ऐकायला मिळतात.
हिरण्यकेशी नदीच्या उगमाजवळ एक लहानसं मंदिर दाट झाडांच्या सावलीत आहे. याच शीतल छायेत चिमणीएवढय़ा आकाराचा सुंदर नीलमणी पक्षी दिसतो. वाटेत थोडा मोकळा व उंच-सखल प्रदेश लागतो. इथे काळा गरुड दिमाखदार भराऱ्या मारताना दिसू शकतो. रात्री वाहनातून महादेवगडच्या दिशेला गेलं तर करडय़ा रातव्यांचे डोळे जागोजागी प्रकाशात चमकताना दिसतात. ‘कप्पू कप्पू’ असा त्याचा आवाज रात्रीच्या शांततेत लक्ष वेधून घेतो. आंबोलीला या ऋतूत विविध प्रकारचे बेडूक, वृक्षबेडूक, देवगांडूळ, अन्य उभयचर व निरनिराळ्या प्रकारचे सरपटणारे प्राणी सुद्धा दगडांखाली व पायवाटांवर सहज दिसतात. मात्र सोबत एखादी माहीतगार व्यक्ती असलेली चांगली. ‘बीएनएचएस’तर्फे येथील जैवविविधतेचं सखोल संशोधन करण्यात आलं आहे.
सह्याद्रीतील परिचित ठिकाणांची ही अपरिचित बाजू एकदा समजली व भावली की पुन:पुन्हा त्याची अनुभूती घ्यायला यावंसं वाटतं. मग बिघडलेल्या शहरी सवयी नकळत सुटतात आणि जंगलातील वाऱ्याच्या मंद झुळकेवर आपण या पाखरांच्या दुनियेत तासन्तास आनंदात घालवू शकतो.