ट्रेकिंग, गिर्यारोहण, भटकंती, दुर्गभ्रमंती ही सारीच क्षेत्रे खरेतर आजही चाचपडत प्रवास, भ्रमंती करणारी आहेत. माहितीचा अभाव, साहित्य-सुविधांची वानवा, अभ्यासू दृष्टिकोन नसणे अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. पण आता या विषयातही अनेक अभ्यासक पुढे येऊ लागले आहेत, पुस्तकांपासून-माहितीपर्यंत ज्ञानार्जनाची अनेक साधने तयार होऊ लागली आहेत. यातीलच एक नवे पाऊल म्हणजे यंदाच्या दिवाळी अंकाकडे पाहावे लागेल. यातील काही विशेषांक भटकंतीच्या विश्वातील संग्राहय़ दालने ठरावीत असे आहेत. अशाच काही अंकांचा हा परिचय.
किल्ला
नावाप्रमाणेच हा दिवाळी अंक किल्ला या विषयाला वाहिलेला आहे. ‘किल्ला – इतिहासातला, मनातला आणि वास्तवातला’ अशी संकल्पना असलेला हा अंक वेगवेगळय़ा प्रदेशाची दुर्ग-मुशाफिरी घडवून आणतो. दुर्गाचा इतिहास, भूगोल, स्थापत्य, कला, दुर्गाचे लष्करी सामथ्र्य असे अनेक दुर्गपैलू या अंकात जसे उलगडतात, तसेच दुर्गभटक्यांचे या नायकाबरोबरचे ऋणानुबंध, एखाद्या अभ्यासकाचे मैत्र, एखाद्या चित्रकाराचे दुर्गरंग आणि छायाचित्रकाराचा ‘दृष्टी’कोन असे नाना अद्भुत-रम्य प्रांतही इथे आपले आयुष्य संपन्न करून जातात.
अंकातील पहिलाच विषय या दुर्गरंगांनी भारलेला आहे. प्रसिद्ध चित्रकार भास्कर सगर यांचे कलाजीवनातील हे दुर्गरंग पाहता-पाहता आपणही त्यांचे होऊन जातो. डॉ. अरविंद जामखेडकर यांचा ‘वंडरफुल महाराष्ट्र’ हा लेख वाचताना आमच्याच या ऐतिहासिक वारशाचे नवल, कुतूहल आणि अभिमान वाटू लागतो. मराठवाडय़ातील एक महत्त्वाचा किल्ला असलेल्या नळदुर्गाला केंद्रस्थानी ठेवून चंद्रशेखर बुरांडे यांनी दुर्गस्थापत्याची पोतडी उघडली आहे. सुहास सोनावणे यांनीही अशीच शिवराजकोषातील रहस्ये वाचकांना खुली केली आहेत. कॅप्टन आनंद बोडस यांची हवाईयात्रा, उद्धव ठाकरे यांचे हवाई दुर्गछायाचित्रण, सचिन जोशी यांची तोफांवरील माहिती, प्रा. राजेंद्र केरकर यांनी घडवलेले गोमंतकातील दुर्गदर्शन हे सारेच लेख ज्ञानात भर घालतात. ‘ड्रेस्डेनचा औरंगजेब’ हा एक ताजा विषय राजीव खांडेकर यांनी उभा केला आहे. तर, गिर्यारोहक श्रीकांत लागू यांच्या आठवणी ह्रषीकेश यादवांनी जागवल्या आहेत. अभिजित बेल्हेकर यांचे ‘मैत्र दुर्गाचे’ या गडकोटांशी ओलावा तयार करते. तर, प्रा. प्रदीप हिरुरकर यांचा ‘अश्मयुगीन गुहांचा शोध’ एका ध्यासाची गोष्ट सांगतो. याशिवाय जंजीरा (महेश केळुसकर), किल्ले तोरणमाळ (प्रा. दत्ता वाघ) हे विषयही दुर्गाच्या या प्रदेशात फिरवून आणतात. एखाद्या विशिष्ट विषयाचा खोलवर घेतलेला वेध, अभ्यासू-व्यासंगी साहित्य, लक्षवेधक छायाचित्रांची जोड, आकर्षक मांडणी आणि सर्वात महत्त्वाचे उत्कृष्ट छपाईमुळे ‘किल्ला’ अंकाने आपली गुणवत्तेची परंपरा यंदाही कायम राखली आहे.
दुर्गाच्या देशातून
गडकोटांची भटकंती करणाऱ्यांच्या अभिव्यक्तीचे हे आणखी एक पाऊल. या अंकाचे यंदा दुसरे वर्ष असून यंदाही यामध्ये राजगड ते माऊंट एव्हरेस्ट असा भटकंतीचा मोठा परीघ उलगडलेला आहे. तब्बल ३५ लेखांमधून भटकंतीच्या तेवढय़ाच वाटा, विषय ही अंकाची जमेची बाजू आहे.  राजगड, भरतगड, विश्रामगड, ढाक, धोडप, पुरंदर-वज्रगड, अंकाई-टंकाई, पावनगड, तोरणा अशा महाराष्ट्रातील गडकोटांपासून ते थेट बुंदेलखंडातील कालिंजर किल्ल्यापर्यंत असा भलामोठा मुलूख या अंकाद्वारे आपण फिरून येतो. ल्होत्से-एव्हरेस्टची मोहीम, उंबरखिंडचे युद्ध, दुर्गसंवर्धन चळवळ, मराठय़ांचे आरमार असे अन्य विषयही भटकंतीची ही वाट फुलवतात.
जिद्द
गिर्यारोहण-गिरिभ्रमण विषयाला वाहिलेला अंक अशी ‘जिद्द’ची ओळख आता बरीच जुनी आहे. त्यांच्या या परंपरेला साजेसा असाच असा यंदाचा अंक आहे. या अंकात पाटगावचे मौनीबुवा (अरूण भंडारे), दक्षिणेतील स्वराज्य (शिल्पा परब-प्रधान), शुर्पारक-निर्मळ तळे (रत्नाकर देसाई) हे तीन लेख इतिहासातील वैभवाकडे घेऊन जातात. ‘वणी ते धोडपगड’ चे पदभ्रमण (गजानन परब), सांदण दरीतील साहसावर ‘उंच माझा झोका’ (सूरज मालुसरे), हिमालयातील वेगळी वाट – ‘गोचाला पास’ (सुप्रिया चक्रवर्ती), युरोपातील सायकल वारी (धनंजय मदन), जीपीएसचे घूमजाव (तुहिना कट्टी) हे लेख वेगळय़ा साहसवाटांची सफर घडवतात.
ट्रेकिंग, गिर्यारोहण, भटकंती, दुर्गभ्रमंती ही सारीच क्षेत्रे खरेतर आजही दुर्लक्षित. या विषयावर लेखन हा आजही हौसेचाच भाग आहे. या पाश्र्वभूमीवर अशा विषयांवर दिवाळी अंकांची निर्मिती हे या भटकंतीतील एक नवे पाऊल म्हणावे लागेल.
अंकासाठी संपर्क – (किल्ला- रामनाथ आंबेरकर (९०२९९२९५००), दुर्गाच्या देशातून- संदीप तापकीर (९८५०१७९४२१),  जिद्द- सुनील राज (९८६९३३१६१७)

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क