गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या दुर्गसाहित्य संमेलनाचे पाचवे पुष्प यंदा २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान पुणे जिल्ह्य़ातील सिंहगड किल्ल्यावर गुंफले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे माजी संचालक आणि ज्येष्ठ पुरातत्त्व शास्त्र तज्ज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे संमेलनाचे निमंत्रक तर जयप्रकाश सुराणा हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत.

ज्येष्ठ साहित्यिक गोपाल नीलकंठ दांडेकर यांना एक दुर्गप्रेमी म्हणून सारा महाराष्ट्र ओळखतो. त्यांचे साहित्य आणि अनेक उपक्रमांतून महाराष्ट्रातील या दुर्गाचे मनोज्ञ दर्शनच घडते. अशा या ‘गोनीदां’च्या नावाने महाराष्ट्रभरातील त्यांच्या प्रियजनांकडून गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. या मंडळाच्यावतीने अन्य उपक्रमांच्या जोडीने दरवर्षी एका किल्ल्याच्या सान्निध्यात ‘दुर्ग साहित्य संमेलन’ भरवले जाते. यापूर्वी राजमाची, कर्नाळा, विजयदुर्ग आणि सज्जनगड किल्ल्यांवर चार संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. २०१५ सालच्या संमेलनासाठी सिंहगडची निवड करण्यात आली आहे. प्राचीन इतिहास असलेला सिंहगड हा शिवरायांच्या स्वराज्यातील एक महत्वाचा किल्ला होता. वीर तानाजी मालुसरे यांचा पराक्रम, छत्रपती राजाराम महाराजांचे निधनस्थळ, नावजी बलकवडे यांचा इतिहास आणि लोकमान्य टिळक यांच्या वास्तव्यामुळे सिंहगड इतिहासात अजरामर झालेला आहे. असंख्य ऐतिहासिक वास्तू, निसर्गरम्य परिसर, गिरीस्थान, प्रसिद्ध पर्यटनस्थळ या साऱ्यांमुळे मराठी मनांमध्ये सिंहगडला एक मानाचे स्थान आहे. अशा या दुर्गमंदिरी यंदाच्या चौथ्या दुर्ग साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे.
सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आतकरवाडीतील ‘गप्पांगण’ येथे होणाऱ्या या तीनदिवसीय सोहळय़ात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, दुर्गविषयक परिसंवाद, विशेष व्याख्यान, माहितीपट, सिंहगड दर्शन, सह्य़ाद्रीवरील चित्र-छायाचित्र प्रदर्शने, गिर्यारोहणातील साहित्याचे प्रदर्शन, गोनीदांच्या कादंबरीचे अभिवाचन, मुलाखत, विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी प्रदीप जोगदेव (९३७१९१७७६८) किंवा विशाल देशपांडे (९८८१७१८१०४) यांच्याशी संपर्क साधावा. ३१ जानेवारी ही नावनोंदणीची अंतिम तारीख आहे.