मुंबई- आग्रा महामार्गाने धुळय़ाहून नाशिकच्या दिशेने जाऊ लागलो, की अंदाजे दहा किलोमीटरवर एक डोंगररांग आडवी येते. या डोंगररांगेला छेदत हा महामार्ग वाहतो. खरेतर तो इतिहासकाळापासून उत्तरेकडील इंदूर, आग्रा, दिल्ली शहरांकडे धावतो आहे. या अशा ऐतिहासिक वाटेवरच लक्ष ठेवण्यासाठी एक बळीवंत दुर्गठाणे कधीचे इथे ठाण मांडून बसलेले आहे, नाव लळींग!
महाराष्ट्रातील ऐतिहासिक घराण्यांमध्ये खान्देशातील ‘फारूकी’ घराणे एक मोठे. या घराण्याने या प्रदेशावर तब्बल पाचशे वर्षे राज्य केले. या घराण्याची काही काळ राजधानी असलेला हा दुर्ग लळींग!
धुळय़ाहून नऊ किलोमीटरवर हा किल्ला. पायथ्याशीच लळींग नावाचेच छोटेसे गाव. धुळय़ाहून मालेगावकडे जाणारी कुठलीही एसटी बस या लळींगला दोन घटका थांबते. एसटीतून उतरताच गावचा पाठीराखा असलेला लळींग लक्ष वेधून घेतो. विशेषत: त्याचे ते तटावरील कमानींचे बांधकाम तळातून अधिकच गूढ वाटू लागते.
लळींग हे गावही गडाएवढेच प्राचीन! या गावातही इतिहासाचे काही धागेदोरे दडलेले आहेत. गावातील महादेवाचे मंदिर हेमाडपंती. चांगले हजारएक वर्षे प्राचीन! पण या मंदिराचा मुखमंडप, सभामंडप सारे पडून गेलेले किंवा पाडलेले. केवळ गर्भगृहच ते काय शिल्लक. पण तरी शिल्लक भिंती, त्यावरील कलात्मक कोनाडे, प्रवेशद्वारावरील नक्षीकाम हे सारे आजही कधीकाळचे वैभव दाखवते.
गावातून बाहेर पडताच लगेच लळींगचा डोंगर भिडतो. लळींगची उंची समुद्रसपाटीपासून ५९३ मीटर! सह्य़ाद्रीच्या ऐन धारेवरील किल्ल्यांच्या मानाने ही उंची बेताचीच.
मळलेली वाट गडाकडे निघते. वाटेत काही ठिकाणी पायऱ्यांचे अवशेष दिसतात. दोन ठिकाणी दगड रचलेल्या तटबंदीच्या भिंतीही आडव्या येतात. काही ठिकाणी प्रवेशद्वाराचीही रचना वाटते.
या डोंगरावर अनेक खुरटी झाडे आहेत. पावसाळय़ानंतर यामध्ये गवताळ कुरण तयार होते. या गवतातून अनेक रानफुलेही उमलतात, कोंबडतुरे डोकावू लागतात. लळींगच्या या गवतालाही खरेतर ऐतिहासिक संदर्भ! महात्मा गांधींनी ज्या वेळी ‘मिठाचा सत्याग्रह’चे आंदोलन जाहीर केले, त्या वेळी त्याच्या समर्थनार्थ खान्देशातही चळवळ उभी राहिली. फक्त अडचण आली, ती इथे समुद्र-मीठ कुठून आणायचे? मग या भिल्ल, आदिवासी जनतेने ब्रिटिशांनी गवत कापण्याविरोधात केलेला कायदा मोडण्याचे ठरवले. १ सप्टेंबर १९३० रोजी ही सारी जनता इथे लळींग किल्ल्याच्या पायथ्याशी जमा झाली आणि गवताची कापणी करत त्यांनी सविनय कायदेभंग केला. लळींगच्या गवताला जणू दांडीच्या मिठाचे महत्त्व आले!
अध्र्याएक तासात आपण गडमाथ्याजवळ पोहोचतो. गडाजवळ आलो, की खोदीव पायऱ्या दिसतात. पुढे कडय़ात काही खोदकामेही आहेत. ही खोदकामे पाण्याच्या टाक्या आहेत, की लेण्या हे मात्र समजत नाही. पण ही अशी खोदकामे गडाचे प्राचीनत्व सिद्ध करतात.
या खोदकामाशेजारूनच चार पावले उजवीकडे चालत गेलो, की गडाचे प्रवेशद्वार समोर उभे ठाकते.
मुख्य दरवाजाची कमान कधीच ढासळली आहे. पण त्याभोवतीच्या भिंती, तट मात्र अद्याप शाबूत. यातील उजव्या भिंतीवर असलेले शरभाचे शिल्प आपल्याशी बरेच हितगूज करत असते. महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक वास्तूंवर दिसणारा हा काल्पनिक पशू. मगर, सिंह, वाघ, कुत्रा अशा अनेक प्राण्यांच्या संयोगातून तयार झालेला. हे शिल्प विविध कालखंडात आणि हिंदू-मुस्लीम अशा दोन्हीही स्थापत्यावर दिसते. यामुळे त्याची ‘जडण-घडण’ही कालपरत्वे आणि कलासंस्कृतीप्रमाणे बदललेली दिसते.
लळींगचा घेर आटोपशीर. मध्यभागी एक छोटीशी टेकडी, तिच्यावरच गडाचा बालेकिल्ला आणि उर्वरित सपाटीचा भाग तटाकडेने धावणारा. या तटाकडेच्या फेरीसाठी मुख्य प्रवेशद्वारापासून डावी-उजवीकडे दोन वाटा फुटतात. अगदी सुरुवातीला उजव्या हाताला वळावे. लळींगला निघाल्यापसून सतत खुणावत असणारे कमानींचे बांधकाम इथे पुढय़ात उभे असते. पूर्व तटालगतचे हे बांधकाम. तटावरच विटांचे काम केलेले. त्यामध्ये गवाक्षांच्या कमानी नटवलेल्या. भिंतीच्या डोक्यावर पुन्हा पाकळय़ांच्या नक्षीची ओळ! शेजारच्या तटावरही मारगिरीच्या चर्या! मुस्लीम स्थापत्यशैलीतील ही सारी कलात्मकता. बाहेरून भव्य वाटणाऱ्या या वास्तूची आतील बाजू पडलेली असल्याने तिचा नेमका अंदाज येत नाही.
या कलेला अजून नाजूक करणारे दृश्य इथल्याच एका कमानीतून खाली तळात दिसते. गडाच्या उत्तर अंगास खाली एक खोदीव, बांधीव स्वरुपाचा तलाव आहे आणि त्याच्या काठावर एक घुमटवजा मनोरा उभा आहे. सारेच रेखीव!
या वाटेवरच पुढे एक बुलंद बुरुज. यावर तोफेसाठीचा गोल कट्टा दिसतो. हे सारे पाहात पुन्हा प्रवेशद्वारापासून डाव्या हातास निघावे. सुरुवातीला काही खोदीव हौद दिसतात. पुढे टेकडीलगत चुन्यात बांधलेले तेला-तुपाचे रांजण येतात. गडावर जसे दारूगोळय़ाचे, धान्याचे कोठार, पाण्याचे हौद, तसेच हे तेला-तुपाचे रांजण! गडकोट ही कायम संघर्षांची -युद्धाची भूमी. अशा या युद्धभूमीवर मग जखमींच्या उपचारासाठी शुद्ध तेला-तुपाचे साठे ठेवावे लागतात.
लळींगच्या टेकडीभोवती दक्षिण अंगास काही टाक्या खोदलेल्या आहेत. पण गडावरील साऱ्याच हौदातील पाण्याने जणू वैर मांडलेले. हिरवा, पिवळा, काळा असे निरनिराळे रंग. वासही चार हात दूर ठेवणारे. काय करणार; या गडाची काळजी घेणारे त्याचे मालकच जिथे शेकडो वर्षांपूर्वी हे घर सोडून खाली उतरले तिथे मग हे पाणी रुसून बसणार नाहीतर काय!
दक्षिण अंगाकडील गडाचा तट त्याच्या डोक्यावरील पाकळय़ांचे तोरण मिरवत पुढे येतो. गडाच्या अंगा-खांद्यावरच्या या जागोजागीच्या फारुकी खुणा! कमानींच्या या पाकळय़ांमधूनच मग दक्षिण-पश्चिमेकडील अनेक दुर्गशिखरे डोकावतात. पिसोळगड, कंक्राळा, डेरमाळ असे कितीतरी; गाळणा या साऱ्यांतील बिनीचा शिलेदार! खान्देशची ही दौलत पाहातच पश्चिम तटावर उतरावे. या अंगाला गडाचा दुसरा दरवाजा. छोटासा कमानीचा, तटात खोलवर लपलेला. तिथे उतरण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग.
गडाच्या मधोमध असलेली टेकडी म्हणजे लळींगचा बालेकिल्ला. वाडय़ांची जोती, घरांचे अवशेष, दुर्गामातेचे मंदिर, धान्य कोठाराची इमारत, त्या भोवतीचे पाण्याचे हौद ही सारी या बालेकिल्ल्याची संपत्ती!
लळींगवरची ही सारी बांधकामे फारूकी काळातील. इसवीसन १३७० मध्ये राजा मलिकने या फारूकी घराण्याच्या राज्याची स्थापना केली. इसवीसन १३९९ मध्ये त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा नसीरखानकडे लळींग आणि भोवतालचा प्रदेश आला. त्यानेच लळींगला राजधानीचा दर्जा दिला. त्याने फारूकी राजवटीचा विस्तार बऱ्हाणपूपर्यंत केला. परंतु इसवीसन १४३६ मध्ये बहमनी सरदार मलिक-उल-तुजारबरोबर झालेल्या युद्धात या नसीरखानचा लळींग किल्ल्याखालीच पराभव झाला. पराभवाच्या या अपमानातच १७ सप्टेंबर १४३७ मध्ये त्याचा गडावर मृत्यू झाला. फारूकींची सत्ता बुडाल्यावर पुढे बराच काळ हा किल्ला मुघलांकडे होता. इसवीसन १७५२ मध्ये झालेल्या भालकीच्या लढाईतून खान्देशातील अनेक गडांबरोबर लळींगच्या प्रवेशद्वारावर मराठी जरीपटका फडकू  लागला. तो १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज लढाईपर्यंत होता. इतिहासाचा हा एवढा मोठा कालखंड आज जणू इथे लुप्त झाला आहे.
बालेकिल्ला पाहत पुन्हा उत्तर दिशेकडील त्या कमानींच्या बुरुजावर उतरावे. धुळे शहर, त्या पाठीमागचा सोनगीरचा किल्ला दिसू लागतो. एखादा गुराखी पश्चिम क्षितिजावरचा भामेरगडही दाखवतो. एकाच ठिकाणहून असे तीन-चार किल्ले दिसले, की दुर्गभटक्यांना उगाचच एकाच यात्रेत ‘त्रिस्थळी’चे पुण्य पदरात पडल्याचा आनंद होतो. लळींगचा हा भवताल पाहात असतानाच त्या कमानीतून खालचा तलाव आणि त्या काठचा तो मनोरा पुन्हा खुणावू लागतो.
अष्टकोनी हा तलाव साधाच, पण त्याच्या एका कोनावर उभारलेल्या त्या घुमटवजा मनोऱ्याने त्याला वेगळीच उंची दिली आहे. स्थापत्याला आगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे. कसे असेल त्यावेळचे दृश्य..पाण्याने भरलेला जलाशय, त्यामध्ये फुललेले कमळांचे वेल, विहार करणाऱ्या बदकांच्या काही जोडय़ा आणि या साऱ्यांतील सौंदर्य अनुभवत, पश्चिमेच्या वाऱ्याशी हितगुज करत त्या तिथे मनोऱ्यात बसलेला कुणी शाही परिवार!
..स्वप्नांची ही दुनिया आज कोरडय़ा- शुष्क झालेल्या त्या तलावालाही थोडेसे ओले, नाजूक, तरल करून गेली.
    ल्ल  अभिजित बेल्हेकर

tanker overturned, tanker overturned,
बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर परिसरात अल्कोहोलचा टँकर उलटला
mumbai pune expressway marathi news
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांचा वेग वाढणार, बोरघाटात आता ताशी ६० किमी वेगाने वाहने धावणार
mumbai nashik highway, traffic route changes
मुंबई नाशिक महामार्गावर उद्या मोठे वाहतूक बदल
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद