भटकंतीचे वेड वाढू लागले की, नवनव्या डोंगरवाटा खाली-वर होऊ लागतात. हळूहळू या भ्रमंतीत मुक्कामाचे पाडावही पडू लागतात. यासाठी रात्रीच्या आसऱ्याची शोधाशोध सुरू होते. अशाच वेळी मग एखाद्या सपाटीवर पाठीवरचा तंबू खाली उतरतो आणि अवघ्या काही क्षणात भटक्यांची ती झोपडी उभी राहते.
काही दिवसांचे पदभ्रमण, गिर्यारोहणाच्या मोठय़ा मोहिमा आणि आडवाटांवरची-जंगलातील शिबिरे या साऱ्या भटकंतीत तंबू ही आता एक अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. जिथे अन्य कुठलाही आसरा, छत नाही तिथे ही कापडी झोपडी उघडली आणि उभारली की झाले. भटकंतीच्या या खेळात तंबूचा आधार घेण्याची पद्धत फार पूर्वीच रुजली आहे. अगदी सुरुवातीला लाकडी बांबू, खिळे, दोरी आणि कॅनव्हॉसचे जाडजूड कापड यातून हे तंबू उभे केले जायचे. ‘ए’ आकाराचे झोपडीप्रमाणे दिसणारे हे तंबू आम्ही प्रदीर्घ काळ वापरले. आजही सुरक्षादल, पुनर्वसन शिबिरांसाठी असे तंबू वापरले जातात. पण छोटासा आकार, भलेमोठे वजन, वापर-हाताळण्यास अवघड, ने-आण करणे गैरसोयीचे आणि उंचीवर ऊन, वारा, वादळ, पाऊस, बर्फासारख्या नैसर्गिक आपत्तींपुढे कुचकामी ठरणारे हे तंबू हळूहळू हद्दपार झाले आणि त्यांच्या जागी नवे आले. हे नवे तंबू वजनाने हलके, वापरण्यास-लावण्यास सोपे, नैसर्गिक आपत्तींना तोंड देणारे, टिकावू आणि सुरक्षित असे बनले आहेत.
पूर्वी सर्व तंबू हे ‘ए’ आकारात बनवले जायचे. पण पदभ्रमण किंवा गिर्यारोहणाच्या अवघड-उंच जागी हे तंबू फार काळ टिकाव धरत नसल्याचे लवकरच लक्षात आले. मग यातूनच विविध प्रयोग सुरू झाले आणि त्यातून आजचे सर्वत्र वापरले जाणारे ‘डोम’ आकाराचे तंबू तयार झाले. निसर्गनियमानुसार हा आकार वारा, वादळ, पाऊस आणि हिमवृष्टीचा जास्त चांगल्यारीतीने सामना करतो. तसेच या आकारात तंबूच्या आतमध्ये मोठी जागा उपलब्ध होते.
तंबूच्या साहित्यातही बदल झाले. पूर्वीचे कॅनव्हासचे जाडजूड, पाठीवर वजन वाढवणारे कापड जाऊन तिथे ‘नायलॉन’ चे हलके-टिकाऊ कापड आले आहे. बांबू, लाकूड जात तिथे एफआरपी किंवा ‘अलॉय’ पासून बनवलेल्या नळय़ांचा सांगाडा तयार होऊ लागला. तंबू आधिक सुरक्षित करण्यासाठी त्याला आतील-बाहेरील अशी दोन आवरणे आली. या तंबूनाही खिडक्या, दारे, हवा-प्रकाशासाठी जाळय़ा, सामान ठेवण्यासाठी कप्पे करण्यात आले. एकूणच हे तंबू म्हणजे आता अवघड वाटांवरील सुरक्षित घरे बनली आहेत. या अशा तंबूंचे विविध प्रकार, त्यांची निवड, किंमत आणि घ्यावयाची काळजी या साऱ्यांविषयी पुढील भागात माहिती घेऊयात. (अधिक माहितीसाठी मुफी लोखंडवाला (९८२२३९७७४१) यांच्याशी किंवा w.gypsytents.com
या संकेतस्थळाला भेट द्या.)