ज्येष्ठ साहित्यिक गोपाळ नीलकंठ दांडेकर यांना एक दुर्गप्रेमी म्हणून सारा  महाराष्ट्र ओळखतो. त्यांचे साहित्य आणि अनेक उपक्रमांतून महाराष्ट्रातील या दुर्गाचे मनोज्ञ दर्शनच घडते. अशा या ‘गोनीदां’च्या नावाने महाराष्ट्रभरातील त्यांच्या प्रियजनांकडून या गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. या मंडळाच्यावतीने अन्य उपक्रमांच्या जोडीने दरवर्षी एका किल्ल्याच्या सान्निध्यात ‘दुर्ग साहित्य संमेलन’ भरवले जाते. यापूर्वी राजमाची, कर्नाळा या दोन किल्ल्यांवर या संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. २०१३ सालच्या संमेलनासाठी ‘विजयदुर्ग’ची निवड करण्यात आली असून ‘किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती’ने त्याचे आयोजकत्व स्वीकारले आहे.
‘विजयदुर्ग’ हा छत्रपती शिवरायांच्या अभेद्य आरमारातील एक महत्त्वाचा जलदुर्ग! राजा भोजची निर्मिती, शिवरायांनी त्याला दिलेले तिहेरी तटबंदीचे बुलंद रूप, पुढे मराठय़ांच्या आरमाराचे बनलेले मुख्य केंद्र, जंजिऱ्याच्या सिद्दीपासून ते इंग्रज, डच, पोर्तुगीजांसारख्या अनेक विदेशी शक्तींचे इथेच झालेले पराभव,  हेलियमचा शोध..अशा अनेक घटना-प्रसंगांनी हा जलदुर्ग भारावलेला आहे. अशा या ‘विजयदुर्ग’च्या भूमीवरच २५, २६ आणि २७ जानेवारी २०१३ रोजी तिसरे दुर्ग साहित्य संमेलन भरवले जात आहे.
यंदाच्या या तीनदिवसीय सोहळय़ात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, दुर्गविषयक परिसंवाद, व्याख्याने, माहितीपट, विजयदुर्ग दर्शन, गडकोटांची छायाचित्रे आणि जलरंगांतील चित्रांची प्रदर्शने, शेकडो नौकांमधून विजयदुर्गला प्रदक्षिणा, गोनीदांच्या कादंबरीचे अभिवाचन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या संमेलनास येऊ इच्छिणाऱ्यांनी विशाल देशपांडे (९८८१७१८१०४) आणि अमोल साळुंखे (९८८१२३१८९६) यांच्याशी संपर्क साधावा असे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Durga sahitya samelan this time third year is on vijay durga
First published on: 26-12-2012 at 01:04 IST