गिर्यारोहण-भटकंती म्हटले, की धडधाकट शरीराचे भटके डोळय़ांपुढे उभे राहतात. पण ज्यांना दृष्टीच नाही असे पाय या वाटेवर चालू शकतात का? त्या तिथला इतिहास-भूगोल, निसर्ग अनुभवू शकतात का? या साऱ्याच निरुत्तर प्रश्नांना उत्तर देत ‘कल्पविहार अडव्हेंचर’ने नुकतीच रायगडाची एक मोहीम केली आणि या साऱ्याच भटक्यांनी केवळ स्पर्शाने हा गड, त्याचा इतिहास-भूगोल अनुभवला. याच आगळय़ा-वेगळय़ा मोहिमेबद्दल..
ट्रेन, बसमध्ये प्रवास करताना आपण असे काही जण पाहतो की ज्यांना दैनंदिन कामांसाठीही कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो़  बस कोणती आहे हे जाणण्यासाठी, रस्ता ओलांडण्यासाठी अगदी डोळ्यांपुढची वाट कुठे जाते आहे याचीही माहिती घेण्यासाठी! कारण त्यांच्याजवळ डोळे असले तरीही दृष्टी नसत़े  त्यामुळे त्यांचे रोजचे जगणेच अडथळ्यांची भरलेल्या एखाद्या ट्रेकसारखेच असत़े  मग अशीही मुलं जेव्हा खऱ्याखुऱ्या ट्रेकला निघतात तेव्हा ते केवढं मोठं दिव्य असेल़
मुंबईतील ‘कल्पविहार अडव्हेंचर’ या गिरिभ्रमण संस्थेने दादर येथील कमला मेहता अंधशाळेतील सातवी, आठवी, नववीच्या मुलींसाठी नुकताच रायगडचा ट्रेक आयोजित केला होता़  संस्थेच्या सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून १, २ फेब्रुवारीला पंचवीस अंध मुलींना या विशेष मोहिमेवर विनामूल्य नेण्यात आले होत़े  या मोहिमेच्या माध्यमातून कोणतीही गोष्ट पाहू न शकणाऱ्या मुलींना रायगड नावाचे शीवतीर्थ अनुभवता आल़े  ३१ जानेवारीच्या रात्री मुलींची बस दादरहून निघाली़  इतिहास सांगण्यासाठी सोबत दुर्ग अभ्यासक आप्पा परब होतेच़  त्यामुळे बसमध्येच गडाची आणि इतिहासाची माहिती घेतच या मुली पायथ्याशी पोहोचल्या़  १ फेब्रुवारीला सकाळी सहा-साडेसहाला त्या चढाईसाठी सज्ज होऊन गडाच्या पहिल्या बुरुजासमोर उभ्या ठाकल्या़  पण त्यांना ना समोरच्या उंचीचा अंदाज होता ना आजूबाजूला पसरलेल्या खोलखोल दऱ्यांचा़  सुरक्षेसाठी कल्पविहारने प्रत्येक मुलीसोबत एक अशी स्वयंसेवकांची व्यवस्था केली होती़  समोर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीची अनुभूती शब्दांच्या माध्यमातून त्यांना करून देण्याचे काम हे स्वयंसेवक हौसेने करत होत़े  
‘हरहर महादेव’ म्हणत या पंचवीस ‘शीलेदारिणीं’नी रायगड चढायला सुरूवात केली.  पहिल्याच खुबलढा बुरुजापाशी त्यांचे पाय थबकल़े  आजवर इतिहासात ऐकलेला तो बुरुज त्यांनी अनुभवला, त्याचा इतिहास तिथेच ऐकला.
पहाटेचा बोचरा वारा आणि मोकळा आसमंत, यांच्या सोबतीने पुढचा प्रवास झपझप पावलांनी सुरू झाला़  कधी अचानक आडवी येणारी एखादी काटेरी फांदी, तर कधी पाय मुरगळवणारा खड्डा. पण या साऱ्यांवर मात करत हे मावळे वरवर चढू लागले. थोडय़ाच वेळात सारजण महादरवाज्यात पोहोचले आणि त्यांचे गडदर्शन खऱ्याअर्थाने सुरू झाले. कसा असतो गड, किती उंच असतो किंवा नेमकं काय काय असतं गडावर हे कधी चित्रातही पाहता येत नव्हतं़, पण इथे ते प्रत्यक्ष स्पर्शाने अनुभवू लागले. सोबतीने तो कानावर येणारा इतिहास देखील.आतापर्यंत हिरकणीचा पराक्रम केवळ धडय़ात ऐकला होता, तो बुरुज इथे प्रत्यक्ष पाहिला, स्पर्शाने अनुभवला़  टकमक टोक, तोफा, हिरवागार निसर्ग, शिवमंदिर, छत्रपतींची समाधी, बाजारपेठ हे सगळं आता आपल्या आजूबाजूला आहे, या कल्पनेनेच भारावून जायला झाले, अशी भावना या मुली व्यक्त करू लागल्या.परबांनी कवी कलश आणि शिवराय यांच्या पहिल्या भेटीचे वर्णन गडावरल्या शिवमंदिरात केलं, तेव्हा तर त्यांना अगदी इतिहासात जायला झालं़ मुस्लीम आक्रमकांनी फोडलेल्या  मंदिरासमोरील नंदीला हात लावला, तेव्हा त्यावेळच्या लढवय्या महाराष्ट्राने झेललेल्या जखमांची जाणीव झाली, ही बोचही त्यांनी व्यक्त केली. महादरवाज्यापासून सुरू झालेले त्यांचे हे आगळे-वेगळे दुर्गदर्शन सलग दोन दिवस त्या रायगडाच्या राहाळात फिरत आणि स्पर्शाने अनुभवत राहिले. आजवर हा सारा इतिहास केवळ ऐकलेला. पण आज तो त्यांना प्रत्यक्ष पाहिल्याचा, अनुभवल्याचाही साक्षात्कार झाला.

मोहिमेचा सहावा गड सर!
‘कल्पविहार’तर्फे २००४ सालापासून हा उपक्रम राबवित आहेत़  याअंतर्गत शिवनेरी, लोहगड, रायगड, कोरलई, पेठचा किल्ला, वसई असे अनेक किल्ले या मुलांनी सर केले. वैशाली देसाई यांच्या नेतृत्वाखाली जाणाऱ्या या मोहिमांमुळे या मुलींच्या जीवनातही जणू आता गिर्यारोहण फुलले आहे.