सियाचीन! जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी अशी या स्थळाची ओळख आहे. हिमच्छादित पर्वतरांगा, विरळ हवामान, गोठवणारे तापमान, अतिशय खडतर प्रवास, पावलापावलांवर आव्हाने या साऱ्यांमुळे सियाचिन गिर्यारोहकांसाठी एक आव्हान आहेच, पण यातही सीमावर्ती भागामुळे येणाऱ्या अडथळय़ांवरही इथे मात करावी लागते. यामुळे भटक्यांच्या जगात ‘सियाचीन’चा उल्लेख फारसा येताना दिसत नाही. पण अशी एक संधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे -‘सियाचिन ग्लेशियर ट्रेकिंग एक्सपिडिशन’!
भारतीय संरक्षण दलाच्या वतीने दरवर्षी ही मोहीम आयोजित केली जाते, तीच मुळी तरुणांच्या साहसी आणि विजिगीषू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी. सियाचिन ग्लेशियर ट्रेकिंग मोहीम फत्ते करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचा पूर्ण कस लागतो. समुद्र सपाटीपासून अधिक उंचीवर जायचे असल्याने आपली मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती खूपच महत्त्वाची ठरते. अशा मोहिमांमध्ये वातावरणाशी एकरूप होणे ही एक मोठी कसोटी असते. आजवर फारच थोडय़ा लोकांना या मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. अतिशय कठीण निकषांच्या आधारे संपूर्ण भारतातून केवळ २५ ते ३० जणांचीच यासाठी निवड केली जाते. यामध्ये जिगरबाज युवतींचाही सहभाग असतो. पूर्वी हिमालयातील अनेक मोहिमा पूर्ण केल्याचे दाखले तसेच स्वत:च्या जबाबदारीवर या मोहिमेवर जात असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आणि शारीरिक क्षमता तपासणीसंदर्भातील शिफारस पत्र आदी कागदपत्रे सादर करणे गरजेचे असते.
सियाचीन ग्लेशिअर ट्रेकिंग एक्स्पीडिशन या मोहिमेची सर्वात पहिली बॅच २००७ मध्ये गेली होती. त्याचवर्षी आर्मी माऊंटेनिअरिंग इन्स्टिटय़ूट (ए.एम.आय.) ची स्थापना जे. जे. सिंग मार्गदर्शनाखाली झाली. तेव्हापासून मोहिमेची प्रत्येक वर्षी एक बॅच जात असे.
या ट्रेक दरम्यान लडाख, सियाचीनपर्यंतचा प्रवास डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडतो. लडाख म्हणजे हिमालय आणि काराकोरममधले घरटेच आहे. समुद्रसपाटीपासून ३५०० मीटर उंचीवर असलेले, पृथ्वीवरील एक जादूयी अशी ही जागा. छायाचित्रकारांसाठी तर हा प्रदेश एक नजाराच आहे. येथील लोकांचे अर्थशास्त्र हे छोटय़ाश्या शेतजमिनीवर अवलंबून असले तरी त्याला पर्यटनाचीही जोड आहे. या भागात मोठय़ा प्रमाणात भारतीय सैन्य असून ते भारताची उत्तर सीमा पूर्णपणे लढवून असते.
लेह-लडाखनंतर या ट्रेकमध्ये पुढील मुक्काम खारदुंगला येथे घडतो. ही दागा म्हणजे जगातील सर्वाधिक उंचीवरील ‘मोटरेबल रोड’! या खारदुंगलामार्गेच  आपला पुढे खारदुंग, खलसर, सुमूर, पनामिक, हरगम अशा अनेक छोटय़ा गावांतून प्रवास होतो. या वेळी नुब्रा नदीची साथ मिळत असते. पुढे काही अंतरानंतर सियाचीन बेस कॅम्प आहे.
सियाचिन या शब्दाचा अर्थ खूप मजेशीर आहे. यातील ‘सिया’ म्हणजे ‘गुलाब’ आणि तेही गुलाबी रंगाचे तर चिन म्हणजे जागा. एकूणच गुलाबाच्या फुलांची जागा म्हणजे सियाचीन! या भागाचा शोध १८२१ साली डब्ल्यू मूरक्रॉफ्ट या व्यक्तीने घेतला. हेन्री एस याने १८४८  साली त्याला ‘सियाचीन’ हे नाव ठेवले. इंग्रजांच्या काळातील ‘सव्र्हे ऑफ इंडिया’ने या भागाला १८६१ साली नकाशावर घेतले.
सियाचीनच्या भोवती अनेक उंच पर्वत आहे. गिर्यारोहकांसाठी तर खाणच आहे. पण यातील काही भाग आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये येतो. के-२ (८६११ मीटर), इंदिरा पोल (६११५ मीटर), बेलाफीनुला (५५१५ मीटर), कोल इटालियनला (५९०० मीटर), तुर्कस्तानला (५७४० मीटर), ब्रॉडपिक (८०४७ मीटर), नंगा पर्वत (८१२५ मीटर), गेशरब्रम -१ (८०६८ मीटर), गेशरब्रम-२ (८०३५ मीटर), सेसर कांगडी (७६७२ मीटर), सियाला (५५९५ मीटर), सिया कांगडी  हे यातील काही महत्वाची पर्वशिखरे आहेत.
असे म्हणतात पृथ्वीच्या एकूण आकारमानात १० टक्के भाग हा हिमनद्यांनी  (ग्लेशियर)व्यापलेला आहे. सियाचिन भागात अशा अनेक हिमनद्या आहेत.  सियाचीन हा ‘थर्ड पोल ’ या नावानेही ओळखला जातो. याला ‘पोलर रिजन’ असेही म्हणतात.
या एकूण प्रवासात आपल्याला वन्यजीवनही मोठय़ा प्रमाणात पाहण्यास मिळते.  किमान २२५ वेगवेगळ्या जातींचे पक्षी एकटय़ा लडाख भागात दिसतात. ‘ज्युपिटर ’ नावाची वनस्पती येथे आढळते. या झाडाची पाने स्थानिक लडाखी लोक धार्मिक ठिकाणी धूप म्हणून जाळतात.
या साऱ्या प्रवासात चालणे, बर्फात चालणे, रॉक क्राफ्ट, आईसक्राफ्ट, चढाई, उतराई अशा अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. या मोहिमेत या प्रत्येक गोष्टींचे शिक्षण दिले जाते. हिमवादळासारख्या धोक्यांना सामोरे कसे जायचे शिकवले जाते. हे सारे शिक्षण घेत आणि अमाप कष्ट केल्यावर आपण इच्छितस्थळी पोहोचतो. या वेळी जणू परग्रहावर गेल्याची अनुभूती येते. सर्वत्र आच्छादलेल्या बर्फाच्या या रस्त्यावर चालताना, भारतीय जवानांना भेटणे एक वेगळाच अनुभव राहतो. इथे कमालीच्या टोकाच्या परिस्थितीत राहणाऱ्या स्थानिकांविषयी प्रेम वाढते.
ट्रेकिंगची आवड, साहसाविषयी आकर्षण आणि झुंजण्याची क्षमता असलेल्या तरुण – तरुणींसाठी ही ‘सियाचीन ग्लेशियर ट्रेकिंग एक्स्पीडिशन’ आयुष्यभराची ऊर्जा स्रोत ठरू शकते. आपल्यातील क्षमतांना वाव देण्यासाठी हा थरारक प्रवास करायलाच हवा. प्रवास माणसाला सर्वार्थाने समृद्ध करतो, हेच खरे!
    
* ‘सियाचिन ग्लेशियर ट्रेकिंग एक्सपिडिशन’ या मोहिमेत सहभागी होण्यासाठी संपर्क:
http://www.indianarmy.nic.in
adventure/sports
trek to siachen glacier for civilians

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trekking siachen glacier
First published on: 05-06-2013 at 09:07 IST