सातारा जिल्हय़ातील ‘माणदेश’ या शब्दाची ओळख, सान्निध्य तसे केवळ दुष्काळाशी! हे नाव उच्चारताच डोळय़ांपुढे तो वैराण मुलुखच उभा राहतो. एरवी कायम रखरखीत-उजाड, करपलेला असा हा भाग. पण पाऊस सुरू झाला, की मात्र थोडाफार हिरवा, कोमल बनतो. याच दिवसांत या माणदेशीच्या दुर्गभ्रमंतीवर निघावे. वर्धनगड, महिमानगड, संतोषगड आणि वारूगड ही या माणदेशीची दुर्गचौकडी, इतिहासाची दौलत! साताऱ्याकडून कोरेगाव मार्गे या प्रदेशात शिरलो, की वर्धनगडाच्या घाटात यातलाच पहिला शिलेदार आपली वाट अडवतो- वर्धनगड!
सातारा-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्याहून ३३ किलोमीटरवर हा किल्ला! साताऱ्याहून पुसेगावकडे जाणारी कुठलीही एसटी बस या दुर्गवारीसाठी सोयीची. या साऱ्या बस या गडाच्या पायथ्याशी असलेल्या वर्धनगड गावी थांबतात. या वाटेतील तालुक्याचे कोरेगाव ओलांडले, की लगेचच हिरवा बागायती भाग जाऊन उजाड माळ सुरू होतो. वर्धनगडाजवळ हे चित्र पूर्ण होते आणि माणदेशी आपले पाऊल पडते.
सहय़ाद्रीच्या मुख्य रांगेची एक उपशाखा या माणदेशातून फिरली आहे. महादेव डोंगर असे तिचे नाव. या रांगेवरच हा माणदेशीचा द्वारपाल उभा आहे. पंढरपूरकडे निघालेला रस्ता या गडाखालच्याच घाटवाटेतून वळण घेत वर्धनगड गावी येऊन थांबतो.
या घाटवाटेवरच लक्ष ठेवत, विशिष्ट कोन साधून बसलेला हा गड आणि त्याच्या या चित्राचा तोल सांभाळत बसलेले वर्धनगड गावही! गावात वळताच वेशीवर मांडलेल्या दोन तोफा स्वागताला पुढे येतात. या तोफांच्या पाश्र्वभूमीवर वर्धनगडाचे रूप आणखी खुलते.
अवघी १६०५ मीटर उंची! गावात शिरताच गडाच्या तटाचा दगड न् दगड स्वच्छपणे दिसू लागतो. पूर्व दिशेनेच गावातून एक वाट गडावर निघते. पायऱ्यांच्या या मार्गावर भैरव, मारुती, गणेशाचे दर्शन घडते. फारशी दमछाक न होता अध्र्याएक तासात आपण वर्धनगडाच्या दरवाजात उभे राहतो. दोन बुरुजांच्या मध्ये दडलेले हे गोमुखी पद्धतीचे प्रवेशद्वार! तट-बुरूज, प्रवेशद्वाराची कमान सारे काही आजही सुरक्षित. दाराशी शेंदूर फासलेले एक-दोन देव आणि दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांच्या खोल्या. हे सारे पाहात आत शिरावे तो जणू एवढा वेळ कोंडलेला वारा चहूदिशांनी उधळत अंगावर येतो. जणू माणदेशीचा हा सुसाट वारूच!
मधोमध टेकडी आणि भोवतीने तटालगतची सपाटी अशी गडाची रचना. यानुसारच टेकडी आणि या तटालगत अशा दोन वाटा निघतात. यातील टेकडीवर चढणाऱ्या वाटेवरच गडाची पडलेली सदर लागते. जुन्या पायरीमार्गाभोवती महादेव, मारुतीची राऊळे, खोदीव टाक्याही दिसतात.
टेकडीच्या सर्वोच्च स्थानी वर्धिनीमातेचे मंदिर आहे. जीर्णोद्धार केलेल्या या आधुनिक मंदिरातील देवीची मूर्ती पाहण्यासारखी आहे. चतुर्भुज; हाती ढाल, तलवार, नाग आणि पाश अशी आयुधे! पायाशी वाहन असलेला वाघ, सेवेशी भक्त! मूर्ती भोवतीच्या प्रभावळीमध्ये मोर, कीर्तिमुख कोरलेले. यातील मोरांच्या चोचीत नाग पकडलेले दाखवले आहेत.
वर्धिनीमातेचे हे दर्शन घेत टेकडीवरून फिरू लागलो, की गडाची तटबंदी खुणावू लागते. महाराष्ट्रात धडधाकट तटबंदी असलेल्या किल्ल्यांमध्ये वर्धनगडाचा समावेश करावा लागेल. खरेतर हेच या गडाचे वैशिष्टय़! जाड-रुंद बांधकामाचा हा तट आजही सुस्थितीत आहे. जागोजागीचे बुरूज, त्यावरील तोफांच्या खिडक्या, तटातील जंग्या, पाणी जाण्याचे मार्ग सारे काही व्यवस्थित. या तटावरून फिरताना मग ढालकाठीचा बुरूज, त्याअलीकडची चुन्याची घाणी, चोर दरवाजा, छोटय़ामोठय़ा पाण्याच्या टाक्या, गडाच्या उत्तर-पूर्व अंगास असलेले बांधकामांचे अवशेष दिसतात. या साऱ्याच खाणाखुणा वर्धनगडाचा इतिहास जोडू पाहतात.
वर्धनगडाची निर्मिती कोणी केली हे इतिहासाला फारसे माहीत नाही. पण छत्रपती शिवरायांनी अफझलखान वधानंतर माणदेशातील अन्य किल्ल्यांबरोबर वर्धनगडही जिंकून घेतला. या काळात इसवी सन १६६१ या वर्षी १४ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर महाराज स्वत: या वर्धनगडावर मुक्कामी होते. यानंतर त्यांनीच १६७३ ते ७४ मध्ये या गडाची पुनर्बाधणी केली. औरंगजेबाच्या दक्षिणस्वारीवेळी ६ जून १७०१ मध्ये त्याने वर्धनगड जिंकला आणि त्याचे नाव ठेवले ‘सादिकगड’! परंतु हा ‘सादिकगड’ औरंगजेबाची पाठ फिरताच मराठय़ांनी पुन्हा जिंकला आणि पुन्हा तो वर्धनगड झाला. मराठय़ांचा वर्धनगडावरील इतिहास पुढे १८१८च्या ब्रिटिशांबरोबरच्या शेवटच्या लढाईपर्यंत जागता होता.
वर्धनगडाच्या सर्पाकार तटावरून फिरताना त्याचा हा इतिहास जसा आठवतो तसेच तो भोवतीच्या माणदेशाचे दर्शनही घडवतो. पूर्वेला दूरदूरवर छोटय़ामोठय़ा टेकडय़ांमध्ये पसरलेला माण-खटावचा भाग दिसतो. मध्येच घरांच्या पुंजक्यांचे पुसेगाव सोडले तर हा सारा उघडा माळ. पावसासाठी आसुसलेला. उत्तरेला फलटणचा टेकडय़ांचा उंच-सखल प्रदेश आणि दक्षिण-पश्चिमेला कोरेगाव तालुका! तसा एरवी हा सारा करपलेला भाग. पण पाऊस सुरू झाला, की ही भूमी थोडीशी सुखावते, फुलते, हिरवी होते. एरवी दुष्काळाने होरपळलेल्या या लोकांच्या जीवनातही श्रावण उमलतो. दुखरी-तहानलेली नजर आनंदी-प्रसन्न होते. पडेल त्या पावसावर मग ज्वारी, बाजरी, भुईमूग पिकतो. माणदेशीच्या या सुगीत मग वर्धनगडही बहरतो.
आम्ही गेलो त्या वेळी वर्धनगडाचा हा भूगोल पाहता पाहताच डोक्यावरचे आकाश ढगांनी भरून आले. पर्जन्यछायेच्या या प्रदेशातही चार-दोन ढग पाऊस घेऊन आले. वर्धनगडाच्या तटावरून तो ढगांचा हलता-वाहता देखावा पाहता-पाहताच पावसाचा शिडकावा सुरू झाला आणि माणदेशीची तहानली भूमी तृप्त झाली.