News Flash

भातुकलीतलं लग्न २२ वर्षांनी वास्तवात

२२ वर्षांपूर्वी नाटकाचे नाव होते 'अॅन आर्मी मॅन्स वेडिंग' आणि आज तो लष्करामध्ये कॅप्टन आहे

श्रीराम रनजीत आणि आर्या श्री

लहानपणापासून एकाच शाळेत असणाऱ्या त्या दोघांनी १९९७ साली बालवाडीच्या स्नेहसंम्मेलनामध्ये बसवलेल्या नाटकामध्ये खोटं खोटं लग्न केलं होतं. भातुकली खेळण्याच्या वयात असताना त्यांनी ‘अॅन आर्मी मॅन्स वेडिंग’ या नाटकात नवरा-बायकोची भूमिका साकराली होती. आज २२ वर्षांनंतर खरोखरच त्या दोघांनी लग्न केलं. विशेष म्हणजे तो भारतीय लष्करामधील अधिकारी आहे. एखाद्या सिनेमाला शोभावी अशी ही प्रेम कहाणी आहे लष्करी अधिकारी असणाऱ्या श्रीराम रनजीत आणि आर्या श्री या दोघांची.

२६ जानेवारी रोजी रनजीत आणि आर्या दोघे केरळमधील भवानी शिवक्षेत्र मंदिरामध्ये विवाहबंधनात अडकले. या लग्नानंतर दोघांनीही कोच्चीमधील आपल्या शाळेला आवर्जून भेट दिली. पहिल्यांदा दोघे ज्या ठिकाणी भेटले त्याच ठिकाणी जाऊन त्यांनी लग्नाचा आनंद साजरा केला.

या लग्नासंदर्भात मुलीची काकू डॉ. दिपा संदीप यांनी फेसबुकवर लग्नाचे फोटो शेअर करत या दोघांची लव्हस्टोरी सांगितली आहे. आर्याची आई संध्या आणि रनजीतची आई मिनी दोघीही कोच्चीमधील श्री धर्मा परिपालन योगम या शाळेमध्ये शिक्षिका होत्या. एकच स्टाफरुम शेअर करणाऱ्या या दोघी एकाच वेळी गरोदर होत्या. संध्या यांना कन्यारत्न प्राप्ती झाली जिचे नाव त्यांनी आर्या ठेवले तर मिनी यांना मुलगा झाला ज्याचे नाव रनजीत ठेवण्यात आले. चार वर्षांनंतर आर्या आणि रनजीत दोघे एकाच शिशूवर्गात शिकत होते. त्या वर्षी शाळेतील मुलांना नृत्य शिकवणाऱ्या रशीद यांनी एक नाटुकलं बसवण्याचं ठरवलं. या नाटुकल्याचं नाव होतं ‘ओरु पट्टलाकारंती कल्याणम्’ म्हणजेच ‘लष्करातील जवानाचे लग्न.’ या नाटामधील पात्र निवडताना रनजीतने लष्करी जावानाची भूमिका साकारली तर आर्याने त्याच्या पत्नीची. या नाटकातील लग्नाआधी रनजीत खूप घाबरलेला होता असं दिपा आपल्या पोस्टमध्ये म्हणतात. ‘रनजीत तेव्हा आपल्या आईला म्हणला होता मला लग्न नाही करायचंय मला केवळ लग्नाच्या वेळी प्रथा म्हणून वाजवतात ती घंटा वाजवायची आहे’ असं दिपा यांनी पोस्टमध्ये लिहीले आहे. हे नाटक संपल्यानंतर दिपा यांनी स्वत: दिवसभर पाळपळी करुन थकल्याने झोपी गेलेल्या आर्याला तिच्या घरी सोडले होते अशी आठवणही या पोस्टमध्ये सांगितली आहे.

शाळेनंतर आर्या आणि रनजीत बरेच वर्षे भेटले नव्हते. ते एकमेकांच्या संपर्कातही नव्हते. दरम्यान रनजीत राष्ट्रीय सुरक्षा अकादमीची परिक्षा उत्तीर्ण होऊन लष्करामध्ये कॅप्टन पदावर रुजू झाला. तर आर्याने वैद्यकिय शास्त्रात करियर करण्याचे ठरवले. आर्या २२ वर्षांची असताना रनजीत आणि तिची पुन्हा फेसबुकवर भेट झाली. हळूहळू गप्पा वाढू लागल्यानंतर एकदा बोलता बोलता रनजीतने आर्याला लहानपणी केलेलं नाटकातलं लग्न खऱ्या आयुष्यात करुयात असं म्हणतं प्रपोज केलं. आर्यानेही त्याला होकार दिला. दोघांनीही हा निर्णय घरी कळवला आणि त्या दोघांपेक्षा घरचेच या निर्णयाने जास्त खूष झाले असं एशियानेटने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

आर्याची ती इच्छा अपूर्ण राहिली

या लग्नामध्ये एकच गोष्ट आर्याला खटकली ती म्हणजे साडी. लहानपणी रनजीतबरोबर लग्न करताना ज्या रंगाचे आणि पॉटर्नची साडी तिने नेसली होती तशीच साडी तिला लग्नात नेसायची होती. मात्र तशी साडी तिला सापडलीच नाही असं एशियानेटने म्हटलं आहे. तरी या लग्नसमारंभातील उत्साह पाहण्यासारखा होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 1:51 pm

Web Title: 22 years after marrying in a school play kerala couple get married for real
Next Stories
1 पेटीएमवरही बुक करता येणार हॉटेल्स
2 लय भारी! सियाचीनच्या बर्फाळ पर्वतात जवानांसाठी पोहोचला गरमागरम पिझ्झा
3 ऑफिसमध्ये शेवटच्या दिवशी स्पायडरमॅनच्या वेशात पोहोचला बँक कर्मचारी
Just Now!
X