मॉडेलिंगच्या दुनियेत यशस्वी व्हायचे असेल तर उंची, रंगरूप आणि सौदर्यांचे निकष काटेकोरपणे पाळावे लागतात. त्यामुळे मॉडेल्सना यशस्वी होण्यासाठी बरीच मेहनतही घ्यावी लागते. याशिवाय या क्षेत्राबाबत सामान्यांचे काही समज आणि निश्चित ठोकताळे असतात. मात्र, काही मॉडेल्स या सगळ्याला अपवाद ठरतात. ड्रू पेस्ट्रा ही त्यांच्यापैकीच एक. मॉडेलिंगसाठी चांगली उंची असणे खूपच गरजेचे असते. मात्र, २१ वर्षीय ड्रू पेस्टा हिची उंची फक्त ३ फूट ४ इंच इतकी आहे. मात्र, आपल्या या उणीवेवर मात करून तिने गेल्या काही वर्षांमध्ये एक यशस्वी मॉडेल म्हणून नाव कमावले आहे. या संपूर्ण प्रवासात तिला अनेकांची कुचकट शेरेबाजी आणि टोमणेही सहन करावे लागले. परंतु, या सगळ्याकडे दुर्लक्ष करत ड्रू पेस्टाने आपले ध्येय साध्य केले.

प्रेस्टा ही नेवाडाच्या रीनो या शहरात राहते. सुरूवातीच्या काळात तिला उंचीवरून अनेक टोमणे ऐकावे लागायचे. मात्र, तिने या सगळ्याची पर्वा न करता फॅशन इंडस्ट्रीत करियर करायचे ठरवले. त्यासाठी तिने लॉस एंजालिस गाठले. मध्यंतरी तिचा ‘शेक माय ब्युटी’ हा व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओला तब्बल तीन लाख व्ह्युज मिळाले होते. याशिवाय, सोशल मीडियावरही तिचे बरेच फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवरील तिच्या फॉलोअर्सची संख्या सध्या १७ हजार इतकी आहे. एका लहान शहरातून अमेरिकेमध्ये येऊन फॅशन इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ड्रू पेस्टाचे सोशल मीडियावरील फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत.