मुस्लीम बहुल देशातील कट्टरतावादी लोकांना अमेरिकेत येण्यास मज्जाव करतानाच सीरियातील निर्वासितांना पुढील सूचनेपर्यंत प्रवेश न देण्याच्या आदेशावर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आणि आता याच आदेशमुळे एका सात वर्षाच्या सिरियन मुलाला कॅन्सरच्या उपचारांपासून वंचित राहावे लागले आहे. मुलाला अमेरिकेत उपचारासाठी येऊ द्यावे यासाठी त्याचे वडिल दूतावासाचे उंबरठे झिजवत आहेत.

सात वर्षांच्या मोहम्मदला कॅन्सर झाला आहे. त्याला उपचाराठी अमेरिकेत नेण्याची त्याच्या वडिलांची इच्छा आहे. तिथल्या रुग्णालयात आपल्या मुलावर उपचार होऊ शकतात अशी मोहम्मदच्या वडिलांना खात्री आहे म्हणूनच अमेरिकन दूतावासाच्या पाय-या ते झिजवत आहे. आपल्या मुलाला अमेरिकेत उपचारांसाठी प्रवेश देण्यात यावा अशी विनंती ते करत आहेत पण पित्याच्या वेदनेने कोणत्याही अमेरिकन अधिका-याला पाझर फुटणार नाही कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियातील निर्वासितांना प्रवेश न देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आपल्या मुलाचे उपचार कसे होतील याची चिंता  वडिलांना लागून आहे. त्यामुळे केवळ उपचारांसाठी तरी आपल्याला अमेरिकेत प्रवेश मिळावा अशी विनंती त्यांनी ट्रम्प यांना माध्यमाद्वारे केली आहे.

मूलतत्त्ववादी मुस्लीम दहशतवाद्यांना दूर ठेवण्यासाठी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश जारी केला. या आदेशानुसार इराण, इराक, सीरिया, येमेन, सुदान, लिबिया, सोमालिया या देशांच्या लोकांना ३० दिवस प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, सौदी अरेबिया या देशातील लोकांची कसून तपासणी केली जाईल असे सांगण्यात आले. पेंटॅगॉन येथे कार्यात्मक आदेशावर स्वाक्षरी करताना ट्रम्प यांनी सांगितले की, मूलतत्त्ववादी इस्लामी दहशतवाद्यांना अमेरिकेत येऊ द्यायचे नाही, आम्हाला ते येथे नको आहेत असे स्पष्ट केले. प्रोटेक्शन ऑफ द नेशन फ्रॉम फॉरेन टेररिस्ट एंट्री इन टू द युनायटेड स्टेट्स या शीर्षकाच्या आदेशावर त्यांनी स्वाक्षरी केली. अमेरिकेत ९/११ च्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना अमेरिकेपासून दूर ठेवण्यात अपयश आले आहे असे आदेशात म्हटले आहे. त्या आदेशाविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.