थायलंडमधल्या सर्वात मोठ्या गुहेत अडकलेल्या १२ मुलांपैकी ११ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर उर्वरित दोन जणांना पुढील काही तासांत गुहेबाहेर काढण्यात येणार आहे. सध्या बाहेर आलेल्या नऊ मुलांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तब्बल सोळा दिवसांनी बाहेर आलेल्या या मुलांनी पहिल्यांदा चॉकलेटची मागणी केली आहे. मात्र तूर्त तरी त्यांना चॉकलेट्स देण्यास डॉक्टरांनी नकार दिला आहे. गुहेत काही दिवस राहिल्यांनंतर ही मुलं आजारी पडण्याचा धोका अधिक आहे त्यामुळे या मुलांची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

Thailand Cave Rescue – थायलंडच्या मदतकार्यातील महाराष्ट्राचे कनेक्शन

रविवारी (८ जुलै) रोजी या मुलांना गुहेतून बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू झाली. गेल्या तीन दिवसांत आतापर्यंत ११ जणांची सुटका करण्यात आली आहे. या मुलांना न्यूमोनियाचा धोका अधिक आहे त्यामुळे त्यांना या पुढील सात दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. या मुलांनी गुहेबाहेर आल्यानंतर पहिल्यांदा चॉकलेटची मागणी केल्याचं पाणबुड्यांनी सांगितलं. मात्र चॉकेलटसाठी त्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

ही सारी मुलं ११ ते १६ वयोगटातील आहे. तसेच त्यांच्यासोबत २५ वर्षांचा शिकाऊ प्रशिक्षक देखील आहे २३ जून पासून ही मुलं बेपत्ता होती. बेपत्ता झाल्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी त्यांचा शोध घेण्यास थायलंडच्या नौदल आणि पाणबुड्यांना यश आलं. त्यानंतर आठवडाभर या मुलांना पोहण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे.