तुर्कीमधली विमानतळावर एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. सुमारे १६८ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान लँडिग करताना धावपट्टीवरून घसरलं आणि समुद्राच्या दिशेनं जाणाऱ्या उतारावरून खाली घरंगळत गेलं. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये घबराहट पसरली पण, सुदैवानं हे विमान उतारावरच अडकलं आणि शेकडो प्रवाशांचे जीव वाचले.

पेगसस एअरलाइन्सचे हे विमान होते. तुर्कीची राजधानी अंकारामधून या विमानानं उड्डाण केलं होतं. हे विमान ट्राबझॉन विमानताळावर उतरणार होतं. हे विमानतळ ब्लॅक सीच्या बाजूला आहे. विमान धावपट्टीवर उतरत असताना अचानक हे विमान धावपट्टीवरून घसरून उताराच्या दिशेनं गेलं. पण सुदैवानं हे विमान चिखलात रुतलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा हे विमान थेट समुद्रात कोसळणार असतं. अपघातामुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली होती, पण सुदैवानं एकही प्रवासी या दुर्घटनेत जखमी झाला नाही.

अपघात झाल्यानंतर बचाव पथकानं विमानतळावर घाव घेत साऱ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. या दुर्घटनेनंतर काही काळ धावपट्टी बंद करण्यात आली. या प्रकरणाची आता सखोल चौकशी होत आहे.