फॅशन सिम्बल असलेल्या हमीस हिमालय बर्केन बॅगला सध्या मोठी मागणी आहे. ही बॅग मिरवणं म्हणजे सेलिब्रिटी आणि श्रीमंत महिलांसाठी स्टेटस सिम्बल समजल जातं, पण ही बॅग विकत घेणं म्हणजे सहज शक्य नाही. काही मोजक्याच ग्राहकांना तिची विकली जाते. ज्या व्यक्तीला ही बॅग विकली जाणार आहे तिची समाजातील पत आधी पाहिली जाते, या बॅग खरेदी करण्यासाठी भली मोठी ‘वेटिंग लिस्ट’ आहे. तर अशा सेकंड हँड बर्केन बॅगचा लंडनमध्ये नुकताच लिलाव पार पडला. आता एखादी वापरलेली बँग स्वस्तात विकली जाईल असा जर तुमचा समज असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. कारण नुकत्याच लंडनमध्ये पार पडलेल्या एका लिलावात चक्क दीड कोटींची बोली सेकंड हँड बर्केन बॅगवर लावण्यात आली आहे.

२०१६ मध्ये हमीस हिमालय बर्केन बॅग चक्क २, ७९,००० युरो म्हणजे जवळपास अडीच कोटींहून अधिक किंमतीत विकली गेल्याचं ‘ख्रिस्टीन’च्या अहवलातून समोर आलं होतं. ही बॅग निलो मगरीच्या कातड्यापासून तयार करण्यात आली होती. त्याचप्रमाणे त्यावर पांढरं सोनं आणि हिरेही जडवण्यात आलं होतं. हाँग काँगमधल्या एका व्यक्तीनं ही बॅग खरेदी केली होती. नुकतीच लंडनमधल्या लिलावात विकली गेलेली बर्केन बॅग ही दहा वर्षे जुनी होती. दुर्मिळ पांढऱ्या रंगाच्या मगरीच्या कातडीपासून ही बॅग तयार करण्यात आली होती. १९८१ मध्ये फ्रेंचमधल्या एका लक्झरी फॅशन हाऊस हमीसनं या बॅग डिझाईन केल्या. गायक अभिनेत्री जेन बर्केन हिच्या नावावरून या बॅगना बर्केन बॅग नाव देण्यात आलं.

गेल्या काही वर्षांत सेकंड हँड बॅग्सचा ट्रेंड खूपच वाढला आहे. सध्याच्या घडीला यातील उलाढाल दोन अब्जांहून अधिक आहे. या बॅग्सची निर्मिती मोजकीच असल्यानं सेकंड हँड मार्केटमध्ये या बॅग्सना मोठी मागणी आहे, त्यामुळे सोने किंवा शेअर मार्केटमधील गुंतवणूकीपेक्षा या बॅग्समध्ये गुंतवणूक करणं जास्त फलदायी असल्याचं अनेकजण सांगतात.