क्रिकेटचा चाहता असलेला अफगाणिस्तानचा शेरखान नावाचा एक व्यक्ती आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये आलाय. पण, तब्बल ८ फूट ३ इंच इतकी उंची असलेल्या शेरखानसाठी येथील अनुभव चांगलाच लक्षात राहील असाच आहे.

लखनौच्या इकाना स्टेडियममधून आजपासून(दि.६) अफगाणिस्तान आणि वेस्टइंडिज या संघांमध्ये एकदिवसीय आणि टी-२० मालिकेला सुरूवात होतेय. या मालिकेसाठी शेर खान अफगाणिस्तानहून भारतात आला आहे. पहिला एकदिवसीय सामना पाहण्यासाठी तो लखनऊमध्ये पोहोचला, पण हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी त्याला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. त्याची उंची पाहून हॉटेलमध्ये रुम बुक करताना त्याला विविध समस्यांना सामोरं जावं लागलं. अनेक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही त्याला कोणताच हॉटेल मालक रुम देण्यास तयार होत नव्हता.

कोठेही रुम मिळत नसल्याने अखेरीस शेरखान पोलिसांच्या शरण गेला.  एनबीटीने दिलेल्या वृत्तानुसार, “शेरखान सोमवारी लखनौमध्ये आलाय, तेव्हापासून हॉटेल्सच्या फेऱ्या मारतोय. पण, त्याला रुम मिळाली नाही. त्यामुळे त्याने आम्हाला विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कागदपत्रांची पडताळणी केली. सर्व कागदपत्रांची खात्री केल्यानंतर पोलिसांनी चारबागच्या एका हॉटेलमध्ये त्याला एक रुम मिळवून दिली”, अशी माहिती वरीष्ठ पोलिस अधिकारी विकास चंद्र त्रिपाठी यांनी दिली आहे.

आजपासून वेस्टइंडिज आणि अफगाणिस्तानच्या संघांमध्ये एकदिवसीय आणि टी-२० मालिकेला सुरूवात होतेय. मालिकेतील सर्व सामने लखनौमध्येच खेळवले जाणार आहेत.