मैदानात फटकेबाजी करुन गोलंदाजांना घाम फोडणारा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग खासगी आय़ुष्यातही त्याच्या बेधडक स्वभावासाठी ओळखला जातो. वरिष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांनादेखील विरुच्या या स्वभावाचा अनुभव आला आहे.
इंग्लंडचे क्रीडा पत्रकार पिअर्स मॉर्गन यांनी ऑलिम्पिकमधील भारताच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले होते. ‘१२१ कोटी लोकसंख्या असलेला देश फक्त दोन मेडल्स मिळाल्यावर जल्लोष करतो’ अशी उपरोधिक टीका त्यांनी केली होती. मॉर्गन यांच्या या ट्विटवर देशातल्या सर्वच दिग्गज सेलिब्रिटींनी टीका केली होती. त्यावरही मॉर्गन थांबले नाही. त्यांनी विरेंद्र सेहवागशी पैजही लावली. ‘इंग्लडने वनडे वर्ल्ड कप जिंकण्यापूर्वी भारताने ऑलिम्पिकमध्ये एकतरी सुवर्ण पदक जिंकून दाखवावे. यावर आपण १० लाखांची पैज लावू असे आव्हान त्यांनी सेहवागला दिले होते. पण सेहवागनेही या ट्विटवर त्याच्या शैलीत उत्तर दिले होते. ‘भारताने ऑलिम्पिकमध्ये नऊ सुवर्णपदक पटकावले आहेत. पण इंग्लंडला अजून वर्ल्डकप जिंकता आले नाही. उरला प्रश्न १० लाखांच्या पैजेचा आमचा कोहीनूर हिरा तुम्ही देणे आहात असे सेहवागने म्हटले होते.
ट्विटरवर वीरु आणि पिअर्समधील हा वाद जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. इंग्रजीतील वरिष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या चॅनलवर पिअर्स मॉर्गनच्या वादावर चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात सहभागी होण्याची विनंती अर्णब गोस्वामी यांनी सेहवागला केली होती. मात्र सेहवागने ही विनंती धुडकावून लावली. ‘पिअर्सवरील चर्चासत्रात मी सहभागी होण्याची अर्णब गोस्वामींची इच्छा होती. पण पिअर्सवर चर्चासत्र घ्यावे ऐवढी त्याची पात्रता नाही. म्हणून मी कार्यक्रमात सहभागी झालो नाही’ असे ट्विट विरुने केले आहे. विरेंद्र सेहवागचे ट्विट सोशल मीडियावरही हिट ठरले असून अनेकांनी सेहवागच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.