म्युझिक बँड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अनेक मोठमोठे रॉक बँड आणि त्यांचे सादरीकरण उभे राहते. पण आता ही गोष्ट ऐकून तुम्हाला निश्चितच आश्चर्य वाटेल. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी महिला अनेक लहान मोठे उद्योग सुरु करतात. बचतगटाच्या माध्यमातून एकत्रीत काही व्यवसाय केले जातात. पण बिहारमधील धिबरा या गावातील महिलांनी एकत्र येत आपला आगळावेगळा असा बँड तयार केला आहे. सविता देवी या बँडच्या प्रमुख असून केवळ महिला असलेल्या या बँडचे नावही या महिलांनी ‘नारी गुंजन सरगम म्युझिकल बँड’ असे ठेवले आहे. या बँडमध्ये २० वर्षापासून ६० वर्षांपर्यंतच्या एकूण १० महिलांचा सहभाग आहे.

याहूनही विशेष बाब म्हणजे या सर्व महिला दलित समाजातील आहेत. स्वत:च्या पायावर उभ्या असलेल्या या महिला पैसे कमावतात आणि आनंदाने ते खर्चही करतात. अशाप्रकारे एक वेगळा प्रयोग करुन घराबाहेर पडत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक आगळा आनंद पाहायला मिळतो. वेगवेगळ्या रंगाच्या एकसारख्या साड्या घालून या महिला अतिशय उत्तम अशा बँड वाजवतात. या महिला म्हणतात, एरवी आम्हाला घरातून बाहेर पडणे शक्य होत नाही. मात्र या कामाच्या निमित्ताने आम्हाला बऱ्याच ठिकाणी फिरायला मिळते. काहीवेळा आम्ही बँड वाजविण्याचे काम झाल्यावरही त्याठिकाणी थांबतो जेणेकरुन आम्ही तिथे फिरु शकतो.

अशाप्रकारे बँड सुरु करण्यापूर्वी या दलित महिला मजूर म्हणून काम करत होत्या. त्यामध्ये त्यांना दररोज केवळ १०० रुपये मिळत होते. सुरुवातीला त्यांना या कामातून ५००० रुपये इतके उत्पन्न मिळत होते. मात्र आता त्यांना या कामातून जवळपास १२ हजार रुपये मिळतात. सविता देवी म्हणतात, महिला त्यातही दलित समाजातील असल्याने आम्हाला अशाप्रकारे बँड सुरु करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बँडमध्ये वाद्य वाजविणे हे पुरुषांचे काम आहे. मग तुम्ही कसे करता यासारखे टोमणे आम्हाला सुरुवातीला ऐकावे लागले. मात्र आम्ही या सर्व गोष्टींशी सामना करत स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. या बँडमध्ये चांगल्या पद्धतीने वादन करण्यासाठी या सर्व महिलांनी जवळपास १० महिने दररोज दोन तास वाद्य वाजविण्याचा सराव केला.