सध्या देशात करोनानं थैमान घातलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक उद्योगधंदेही बंद आहे. यामुळे हातावर पोट असलेल्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही जणांकडे अन्नधान्य विकत घेण्यासाठीही पैसे शिल्लक नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर काही जण या संकटकाळात आपल्याकडे असलेले दोन घासही इतरांना देऊन लोकं जगत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. करोनाच्या या संकटकाळात अनेकांनी मदतीचा हातही पुढे केला आहे. इतकचं काय तर लहान मुलांनीही आपले जमवलेले पैसे करोनाच्या संकटदात मदतीसाठी दान केले होते. या सर्वात आता एका ७२ वर्षीय महिलेची खुप चर्चा होत आहे. त्यांनी असं काही केलं ज्यानं सर्वांचंच मन जिंकलं. रायपुरच्या बिलासपुरमध्ये राहणाऱ्या या महिलेनं १ क्विंटल तांदूळ, डझनभर साड्या आणि काही पैसे दान केले आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्या भिक्षेकरी आहेत आणि त्यातूनच मिळालेल्या पैशांच्या माध्यमातून त्यांनी हे सर्व दान केलं आहे.

“लॉकडाउनदरम्यान गरीबांना भोगाव्या लागणाऱ्या समस्यांची मला जाण आहे. मी स्वत: एक भिक्षेकरी आहे आणि त्याच माध्यमातून मी पोट भरते. म्हणूनच माझ्याकडून जेवढी काही मदत करता आली ती मी पालिकेच्या कार्यालयात जाऊन केली. या कठिण प्रसंगात आपल्याला एकमेकांची मदत केली पाहिजे,” असं त्या म्हणाल्या. न्यू इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. “भूक काय असते याची मला कल्पना आहे. त्यामुळेच मी गरजू आणि मदत ही असलेल्या लोकांसाठी जास्तीतजास्त पैसे जमवण्याचा प्रयत्न केला. कोणीही उपाशी झोपू नये असं वाटतं,” असंही त्या म्हणाल्या.

“अनेकजण कोविड १९ मुळे निर्माण झालेल्या संकटात कठिण परिस्थितीत आपलं जिवन जगत आहे. माणुसकी कधी पैशातून तोलता येत नाही हे या आजींनी दाखवून दिलं आहे. त्यांनी हे उचललेलं पाऊल अनेकांना माणुसकीच्या मार्गावर नक्कीच आणेल,” असं प्रतिक्रिया बिलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. संजय अलंग यांनी दिली. यापूर्वीही त्यांनी जमवलेल्या पैशातून घेतलेलं धान्य स्थानिक नगरसेवक विजय केशरवानी यांच्याकडे सोपवले होते.