करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेमध्ये मास्क घालण्यास विरोध करणाऱ्या आणि करोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि समाजसेवक बिल गेट्स यांनी चांगलेच फैलावर घेतलं आहे. गेट्स यांनी मास्क न घालणं म्हणजे पॅण्ट न घालण्यासारखंच असल्याचं म्हटलं आहे. तसेच मास्क न घालणारे लोकं न्यूडिस्ट म्हणजेच नग्नतावादी असल्याचा टोलाही गेट्स यांनी लगावला आहे. एका पॉडकास्टवरील मुलाखतीमध्ये बिल गेट्स यांना अमेरिकन कॉमेडियन राशिदा जोन्स यांनी अनेक प्रश्न विचारले. यामध्ये मास्कवरुन रंगलेलं राजकारण आणि इतर गोष्टींवर गेट्स यांनी चर्चा केली.

करोना लशीसाठी करोडो डॉलर दान करणाऱ्या गेट्स यांनी, जेव्हा आपण एखाद्याला पॅण्ट घालायला सांगतो तेव्हा अमेरिकेतील कोणीच हे चुकीचं आहे असं म्हणत नाही. किंवा पॅण्ट घालणं चुकीचं आहे असं म्हणणारे खूपच कमी अमेरिकन नागरिक आहेत. तसंच मास्कचं आहे. मास्क आता अंत्यंत महत्वाची गोष्ट झाली आहे. आधी आरोग्यतज्ज्ञांनी करोनाची तुलना साधारण ताप आणि सर्दीशी केली होती, मात्र करोना विषाणू या सर्वसामान्य आजारांसाठी कारणीभूत असणाऱ्या विषाणूंपेक्षा खूपच वेगळा निघाला, असं गेट्स यावेळी म्हणाले.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव खूपच वेगाने होतो असं सांगताना गेट्स यांनी श्वसनाशी संबंधित इतर आजार इतक्या वेगाने पसरत नाहीत असं म्हटलं आहे. सामान्यपणे सर्दी झालेल्या व्यक्तीबरोबर तुम्ही एकाच खोलीमध्ये मास्क न घालता बसू शकता. मात्र हीच गोष्ट करोना झालेल्या व्यक्तीसोबत शक्य नाही, असं उदाहरण गेट्स यांनी दिलं. सर्वांनीच मास्क घातल्यास मृतांचा आकडा एक लाखांच्या आत ठेवणं शक्य होतं, हा वॉशिंग्टनमधील इंन्स्टीट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अ‍ॅण्ड इव्हॅल्यूएशनने केलेल्या संशोधनाचा हवालाही गेट्स यांनी दिला.