जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस अशी ओळख असलेले आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. आपल्या भारत दौऱ्याचा एक फोटो देखील त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. रिक्षात बसून इंडिया गेट परिसरात भ्रमंती करत असतानाचा तो फोटो होता. ‘वर्षांतून किमान एकदा तरी मी भारताला भेट देण्याचा प्रयत्न करतो. या प्रत्येक भेटीत मला नेहमीच काहीतरी प्रेरणादायी मिळते’ असे लिहित त्यांनी हा फोटो शेअर केला.

‘इंडिया इज विनिंग इट्स वॉर ऑन ह्यूमन वेस्ट’ नावाचा ब्लॉगही त्यांनी लिहिला. या ब्लॉगच्या माध्यमातून बिल यांनी भारताचे आणि पंतप्रधान मोदींचे देखील कौतुक केले आहे. मोदींनी आपल्या पहिल्याच भाषणात शौचालयाचा मुद्दा मांडला होता. खरंतर हा संवेदशनशील विषय होता, शिवाय भारतीय नागरिकांना उघड्यावर शौचालयास जावे लागते ही लाजीरवाणीही बाब होती. पण मोदींनी त्यावर भाष्य केलं. आतापर्यंत मी कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांना इतके उघडपणे बोलताना पाहिले नव्हते. पण ते फक्त या विषयावर बोललेच नाही तर त्यांनी तोडगाही काढला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावागावात शौचालय बांधण्याचे काम हाती घेतले.

त्यांच्या स्वच्छ भारत संकल्पनेलाही भारतीयांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे हे पाहून आनंद होत असल्याचे त्यांनी म्हटले. भारतात आलेल्या या बदलाचा मी एक व्हिडिओही बनवला आहे. २०१४ मध्ये भारतातील फक्त ४३ टक्के जनता शास्त्रशुद्ध स्वच्छता गृहांचा लाभ घेत होती. पण गेल्या दोन वर्षांत हा आकडा ६३ टक्क्यांवर आला आणि याचा मला आनंद होतो आहे, असेही त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे. बिल यांनी रिक्षातून प्रवास करतानाचा आपला फोटोदेखील शेअर करत भारताची प्रशंसा केली. भारत दौऱ्यात नेहमीच प्रेरणा घेणाऱ्या नव्या गोष्टी घडत असतात, असे त्यांनी सांगितले.