गुजरातमधील जुनागढ येथे सिंह मानवी वस्तीच्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये रस्त्यावर फिरताना दिसणं आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. असाच एक प्रकार सोमवारी पुन्हा पाहण्यात आला. येथील एका हॉटेलच्या कुंपणाची भिंत ओलांडून सिंह हॉटेलच्या आत प्रवेश करताना आणि नंतर हॉटेलच्या आवारातून बाहेर पडताना दिसतोय. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सोशल नेटवर्किंगवर आता हे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. २०१९ साली अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आला होता. या व्हिडीओमध्ये एकाच वेळी सात सिंह रस्त्यावर फिरताना दिसले होते.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक सिंह हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ येतो. त्यानंतर हा सिंह हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आलेल्या इलेक्ट्रीकल चेक पोस्टच्या दांड्यावरुन उडी मारुन रस्त्यावर निघून जातो. हा व्हिडीओ उदयन कांची नावाच्या व्यक्तीने ट्विटरवरुन शेअर केलाय. या व्हिडीओला कॅप्शन देताना जुनागढमध्ये आता सिंह रस्त्यावर दिसणे अगदी सामान्य गोष्ट झालीय. हा व्हिडीओ जुनागढमधील सरोवर पोर्टिको या फाइव्ह स्टार हॉटेलमधील असल्याचा दावाही कांची यांनी केलाय.

सिंह हॉटेलमध्ये प्रवेश करताना

सिंह हॉटेलमधून बाहेर पडताना

अन्य एका व्हिडीओमध्ये हा सिंह कार पार्कींगमध्ये गोंधळलेल्या अवस्थेत फिरताना दिसतोय.

या तिन्ही व्हिडीओंना हजारोच्या संख्येने व्ह्यूज असून सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडीओ १८ हजारहून अधिक वेळा पाहिला गेलाय. जुनागढ येतील सिंहांसाठी आरक्षित वन क्षेत्र असल्याने अनेकदा सिंह मानवी वस्तीजवळ दिसून येतात. या तिन्ही व्हायरल व्हिडीओंखाली अनेकांनी आपली मते मांडली आहेत. काहींनी गुजरात सरकारने या सिंहांसाठी पुरेशी जागा राखून न ठेवल्याने ते अशाप्रकारे मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतात असं म्हटलं आहे. तर काहींनी अशाप्रकारे जंगली प्राणी आणि मानवाचा सातत्याने आमना-सामाना होणं दोघांसाठीही धोकायदाक असल्याचं मत व्यक्त केलं आहे.