‘कोणाला माहिती होतं की माझ्यासारख्या सामान्य मुलाला गुगलमध्ये नोकरी मिळेल? माझं स्वप्न प्रत्यक्षात उतरेल याची कल्पनाही मी कधी केली नव्हती आणि आता मला यावर विश्वासही बसत नाही’ ही प्रतिक्रिया आहे बारावीत शिकणाऱ्या हर्षित शर्माची. वय वर्षे फक्त सोळा असलेल्या छ्त्तीसगढमधल्या या मुलाला गुगलकडून नोकरीची संधी चालून आलीय. गुगलने त्याला १ कोटी ४४ लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी देऊ केलीये. सरकारी महाविद्यालयात आयटीचं शिक्षण घेणाऱ्या हर्षितची गुगलकडून ग्राफिक डिझायनर म्हणून नियुक्ती करण्यात आलीये.

पुढील आठवड्यात तो गुगलमध्ये रुजूही होणार आहे. सुरूवातीला त्याला गुगलकडून ग्राफिक्स डिझायनिंगचं प्रशिक्षण देण्यात येईल. वर्षभर त्याचं प्रशिक्षण असेल. यावेळी त्याला दरमहा ४ लाख रुपये भत्ता देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर हर्षित कंपनीत ग्राफिक्स डिझायनर म्हणून रुजू होईल. विशेष म्हणजे ग्राफिक्स डिझायनिंगचं कोणतंही औपचारिक शिक्षण झालं नसताना त्याला ही नोकरी चालून आली आहे.
‘गुगलकडून मला कधी नोकरीची संधी चालून येईल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती’ अशी प्रतिक्रिया हर्षितने ‘इंडियन एक्स्प्रेस’कडे व्यक्त केली. हर्षितला शाळेत असल्यापासून डिझायनिंगमध्ये विशेष रस होता. आपल्या काकांकडून त्याने डिझायनिंगचे धडे घेतले. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये त्याने आपले डिझाइन्स गुगलला पाठवले होते, तेव्हा गुगलकडून भरघोस पगाराची नोकरी चालून येईल, अशी कल्पनाही त्याने केली नव्हती.