अजगर म्हटले की आपल्या अंगावर काटा येईल. विषारी असणाऱ्या या सरपटणाऱ्या जमातीला बघून एखाद्याच्या अंगातील त्राण गळून जाईल. पण आपल्या पाळीव कुत्र्याला अजगराने त्रास दिल्यानंतर तीन मुलांनी थेट अजगराशीच पंगा घेतल्याची घटना आहे. या घटनेचा व्हिडियो नुकताच समोर आला असून तो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता अजगराचा विळखा म्हटल्यावर तो लवकर सुटणे काहीसे कठिणच. पण या मुलांनी एका काठीच्या साह्याने या अजगराला कुत्र्याला घातलेला विळखा सोडण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे अजगराशी दोन हात करताना ही मुले घाबरत नसल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे. त्यामुळे या मुलांच्या धैर्याचे अनेकांकडून कौतुक होताना दिसत आहे.

आपल्या पाळीव कुत्र्याबाबत सगळ्यांनाच खूप जास्त प्रेम असते. या कुत्र्याला घरातील सदस्याप्रमाणे वागणूक दिली जाते. मग या कुत्र्याला काही त्रास झाला तर तो कोण सहन करणार. त्यामुळेच आपल्या कुत्र्याला अजगराने विळखा घातल्यावर ही तीन मुले त्याच्यावर अक्षरश: तुटून पडले. आपल्या हातातील काठीने सुरुवातीला या अजगराला मारण्याचा प्रयत्न केला. तरीही हे अजगर बराच वेळ विळखा सोडायला तयार नव्हते. पण काही वार केल्यानंतर अजगराची पकड काही प्रमाणात सैल झाली. मग या मुलांनी अजगराच्या शेपटीला पकडून त्याला कुत्र्यापासून ओढून बाजूला काढले. विशेष म्हणजे अजगराने पकडल्याने घाबरुन वेगाने पळत असलेल्या या कुत्र्यानेही अखेर सुटकेचा निश्वास सोडला असावा. बाकी काहीही म्हणा पण तीन मुलांच्या या धैर्यामुळे या कुत्र्याचे प्राण वाचले हे मात्र नक्की.