दक्षिण आफ्रीकेतील पर्यावरण संरक्षण कार्यकर्त्याचा सिंहीणींच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. दोन सिंहीणींना फेरफटका मारण्यासाठी घेऊन जात असतानाच एका बेसावध क्षणी अचानक त्या हिंसक झाल्या आणि त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सफारीचे मालक आणि पर्यावरणवादी वेस्ट मैज्यूसन (वय ६८) यांचा मृत्यू झाला आहे. वेस्ट यांच्या पत्नीसमोरच हा धक्कादायक प्रकार घडला.

वेस्ट हे सिंहीणींना घेऊन चालत असतानाच त्यांच्यावर व्हाइट लायनेस प्रजातीच्या या सिंहीणींनी हल्ला केला. हा सर्व प्रकार मागून कारमधून येणाऱ्या वेस्ट यांच्या पत्नी गील यांनी पाहिला. हल्ला केल्याचे पाहताच वेस्ट यांच्या पत्नीने दोन्ही सिंहीणींचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पश्चिम दक्षिण आफ्रीकेमध्ये लिम्पोपो प्रांतांमध्ये मैज्यूसन दांपत्य ‘लायन ट्री टॉप लॉज’ नावाने लायन सफारीचे केंद्र चालवतात. तेथेच हा धक्कादायक प्रकार घडल्याचे टेलिग्राफने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

या घटनेनंतर सिंहीणींना गेम लॉजच्या दुसऱ्या भागामध्ये हलवण्यात आलं आहे. काही दिवस हल्लेखोर सिंहीणीला नजरकैदेत ठेऊन नंतर जंगलामध्ये सोडून देण्यात येणार आहे. वेस्टबरोबरच चालताना अचानक सिंहीण हिंसक झाली आणि सोबत चालणाऱ्या दुसऱ्या सिंहीणींवर हल्ला करु लागली. त्यानंतर तिने थेट वेस्टवर हल्ला केला. मागेमाग दुसऱ्या सिंहीणीनेही वेस्टवर हल्ला चढवला. काही कळण्याच्या आतच या सिंहीणींनी वेस्टवर पंजा आणि दातांनी हल्ला केल्याने कोणालाच वेस्ट यांची मदत करता आली नाही. वेस्ट यांना लोक ‘अंकल वेस्ट’ नावाने ओळखायचे.

वेस्ट यांच्या नातेवाईकांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये एका हिंसक खेळात त्यांचा जीव गेला असं म्हटलं आहे. या घटनेनंतर सिंहीणीला प्राण्यांच्या देखभाल करणाऱ्या केंद्रात नेलं असून तिथे तिला ट्रॅक्यूलाइज करण्यात आलं आहे. प्रितिबंधित क्षेत्रांच्या सीमांजवळ सिंहांची शिकार करण्याच्या घटनांना वेस्ट यांच्या प्रयत्नांमुळे चाप लागला होता. मात्र सिंहाच्या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.