पैठणी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. साडी म्हटलं की पैठणीचा विषय महिलांच्या तोंडी आलाच पाहिजे. करोना संकट आलं म्हणून महिलांची आवड कमी होईल असा विचार करणं जरा धीराचंच होईल. यामुळेच महिलांची आवड लक्षात घेता करोनाच्या संकटातही महिलांना पैठणीचा आनंद घेता यावा यासाठी दादर येथील राणे यांनी एक खास शक्कल लढवली आहे. पण ही साडी नाही तर आहे चक्क ग्राहकांसाठी खास फॅशनेबल पैठणी मास्क आहे….काय विश्वास बसला नाही ना. पण हे खरं आहे. राणे यांनी पैठणी मास्क तयार केले असून हे सर्वांच्याच पसंतीस उतरत आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागल्यानंतर सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं सक्तीचं केलं. तसेच लॉकडाउन शिथिल केल्यानंतर काहीजण कामासाठी घराबाहेर पडू लागले. त्यांनाही मास्कची गरज भासू लागली. शिवाय लग्न कार्यात मास्कची मागणी वाढली. हे सर्व सुरु झाल्यानंतर अनेकांचा कल मास्क तयार करण्याकडे होता. बचतगटच्या महिला उत्पादकांपासून नामांकित फॅशन ब्रॅण्ड्सनी नक्षीदार, रंगीबेरंगी मास्कची निर्मिती केली आहे. अशापरिस्थितीत दादर येथील निनाद राणे यांनी पैठणीचं मास्क तयार करत ग्राहकांना एक उत्तर पर्याय दिला आहे. तीन वेगवेगळे स्तर असलेल्या राणेंच्या मास्कला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला असून दररोज मागणी वाढत आहे.

ग्राहकांच्या अग्रहाखातर पैठणी मास्कची निर्मिती राणे यांनी सुरू केली होती. ‘राणेज पैठणी मास्क’ हे मास्क बनवतात. ते फक्त मास्क नाही तर, पैठणीच्या कापडाच्या पर्स आणि अन्य वस्तूही बनवतात. सध्या कोरोनामुळे त्यांनी हे पैठणी मास्क बनवायला सुरुवात केली. याबद्दल राणे सांगतात की, महामारीच्या काळात मला पैसा कमवायचा नाही. या मास्कचा रफ मटेरियलची किंमत १०० रुपये आहे. त्याची करणावळ वेगळीच. या मास्कला कमीतकमी तयार करण्यासाठी १५० रुपयांचा खर्च येतो. असे असतानाही अवघ्या १०० रुपयांत आम्ही ग्राहकांना मास्क विकतो.

करोना योद्ध्यांना देणार मोफत मास्क –
निनाद राणे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले की, मुंबईत लढणाऱ्या सर्व करोना योद्ध्यांना मोफत मास्क देणार आहे. सफाई कामगार, नर्स, पोलीस आणि डॉक्टर यांचं करोना लढ्यातील योगदान अमुलाग्र आहे. आम्हाला शक्य होईल तितके मास्क करोना योद्ध्यांना देऊन या लढ्यात आम्ही खारीचा वाटा उचलणार आहे.

करोनाचा धोका जाणवू लागल्यानंतर पैठणीचा मास्क तयार करण्याची कल्पना डोक्यात आली. जसजसे दिवस जात होते तशी ही महामारी वाढत होती. तसा मी पैठणी मास्क बनवण्याचा विचार मनातून काढून टाकला. पण लोकांनीच मागे लागून मास्क बनविण्यास भाग पाडले. लोकाग्रहास्तव मास्क बनवले, पण ते विकताना मात्र पैसे कमवायचे नाही हे मनाशी पक्के केले.
– निनाद राणे