करोनाने जगभरात थैमान घातलं आहे. करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या साडेसहा हजारहून अधिक झाली आहे. तर जगभरात करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या एक लाख ८२ हजारहून अधिक झाली आहे. त्यामुळेच करोनाबद्दल सामान्यांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. याच भितीमधून आणि करोनापासून वाचण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करताना दिसत आहेत. मात्र अशाच अनेकांकडून नको त्या चुका होत आहे. असंच काहीसं अमेरिकेमधील एका प्राध्यापकाने केलं आणि त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे.

टेक्सासमधील एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांनी लिहिलेले पेपर घरी तपासण्यासाठी आणले. मात्र करोनाच्या भितीने हे पेपर स्वच्छ करण्यासाठी त्याने चक्क मायक्रोवेव्हचा वापर केला. उच्च तापमानावर करोना विषाणू मरतात या समजुतीने प्राध्यापकांनी मायक्रोवेव्हमध्ये पेपर गरम करण्यासाठी ठेवले आणि पेपरला आग लागली. यासंदर्भातील ट्विट एका विद्यार्थिनीने केलं आहे. एमली पीरिझ असं या विद्यार्थीनीचं नाव आहे. “आमच्या प्रध्यापकांनी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पेपरवरील करोना विषाणू मारण्यासाठी ते मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच त्या पेपरला आग लागल्याचे माहिती दुसऱ्या एका प्रध्यापकांनी दिली आहे. माझा याच्यावर विश्वासच बसत नाही,” असं एमलीने ट्विट केलं आहे. हे ट्विट चांगलचं व्हायरल झालं असून त्याला ७२ हजारहून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे.

या ट्विटवर ७६ हजारहून अधिक जणांनी आपले मत नोंदवलं आहे. अनेकांनी या प्राध्यापकाची खिल्ली उडवली आहे तर काहींनी पेपर कसा स्वच्छ करावा याबद्दलची माहिती दिली आहे. मागील महिन्यामध्ये चीनमध्येही असाच प्रकार घडला होता. चीनमधील एका महिलेने चलनी नोटेवरील करोना विषाणू नष्ट करण्यासाठी ती नोट मायक्रोवेव्हमध्ये ठेवली होती. यामुळे १०० युआनची ही नोट जळून खाक झाली होती. नोटांमधून करोनाचा संसर्ग होतो या भितीने या महिलेने हे कृत्य केलं होतं.