News Flash

ही आहे जगातली सर्वात महाग गाय… किंमत दोन कोटी ६१ लाख रुपये

"आमच्या गायीला एवढी किंमत मिळेल असं आम्हाला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. या..."

(फोटो सौजन्य युट्यूबवरुन स्क्रीनशॉर्ट)

मध्य इंग्लंडमध्ये पॉश स्पाइस नावाची एका गायीचा लिलाव झाला आहे. या गायीला लिलावामध्ये तब्बल दोन लाख ६२ हजार पाउंड म्हणजेच भारतीय चलनानुसार दोन कोटी ६१ लाख रुपयांची किंमत मिळाली आहे. या गायीचा जन्म शॉपशायरमधील लॉज फार्म येथे २०१९ च्या डिसेंबर महिन्यात झालाय. समोर आलेल्या माहितीनुसार या गायीचा मागील महिन्यामध्येही लिलाव करण्यात आला होता. त्यावेळीही तिला विक्रमी किंमत मिळाली होती. मात्र यंदा मिळालेली किंमत की जगातील कोणत्याही गायीला मिळालेल्या किंमतीमध्ये सर्वाधिक असल्याचा दावा करण्यात येत आहे.

यापूर्वीही या प्रजातीमधील गायीची विक्री एक लाख ३१ हजार पाउंडला झाली होती. २०१४ नंतर सात वर्षांनी युनायटेड किंग्डम आणि संपूर्ण युरोपमध्ये कोणत्याही गायीसाठी इतकी किंमत मोजण्यात आलेली नाही. इंडिपेन्डंटने दिलेल्या वृत्तानुसार या गायीचे मालक असणाऱ्या ख्रिश्चन विलयम्स हे १९८९ पासून पशुपालनाचा व्यवसाय करतात. आपल्या गायीला मिळालेल्या या विक्रमी किंमतीसंदर्भात विलयम्स यांनी समाधान व्यक्त केलं आङे. “आमच्या गायीला एवढी किंमत मिळेल असं आम्हाला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. या लिलावसाठी मिळालेला प्रतिसाद पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. तसेच इतक्या उत्तम प्रतीच्या गायींची आमच्या गोठ्यामध्ये पैदास होते याचा आम्हाला अभिमान वाटतोय,” असं विलयम्स यांनी म्हटलं आहे. जिंजर स्पाइस ही गाय पॉश स्पाइसची आई आहे. जिंजर स्पाइसने येथे आयोजित होणाऱ्या बालमोरल शोमध्ये सलग तीनवेळा जेतेपद पटकावलं आहे. त्यामुळेच पॉश स्पाइसच्या मदतीने अधिक चांगल्या प्रजातीच्या गायींची पैदास करता येईल या शक्यतेमुळे अनेकांनी या गायीवर कोट्यावधींची बोली लावल्याचं चित्र पहायला मिळालं.

कुंबरीयातील मेसर्स जेनकिन्सन आणि ग्रेटर मँचेस्टरमधील बाडेन डेव्हिस यांनी एकत्र येत ही गाय विकत घेतली आहे. हे दोघेही कॅटल ब्रिडर्स म्हणजेच चांगल्या क्षमतेच्या जनावरांची पैदास करुन ती जनावरे विकण्याच्या उद्योगामध्ये आहेत. हा लिलाव ब्रिटीश लिमोसिन कॅटल सोसायटीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. या लिलावानंतर कंपनीने गायीला विक्रमी किंमत मिळाल्याबद्दल विलयम्स यांचं अभिनंदन केलं आहे. “ही गाय विकत घेणाऱ्यांचे आम्ही अभिनंदन करु इच्छितो,” असंही लिलाव आयोजित करणाऱ्या कंपनीचे सचिव विल केटली यांनी म्हटलं आहे. अशाप्रकारच्या लिलावाचा चांगल्या प्रजातीच्या गायींची किंमत वाढवण्यासाठी आणि त्यांची मागणी वाढण्यासाठी उपयोग होईल अशी अपेक्षाही कंपनीने व्यक्त केलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2021 3:56 pm

Web Title: cow named poshspice becomes world most expensive heifer after selling for rs 2 crore 61 lakhs scsg 91
Next Stories
1 भारतापेक्षा पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका जास्त आनंदी देश; १४९ देशांमध्ये भारत १३९ वा
2 US : ‘एअरफोर्स वन’ची शिडी चढताना तीनदा पडले जो बायडेन, नंतर….; व्हायरल झाला Video
3 Viral Video: बकरीसोबत ‘सेल्फी’ घेण्यात मग्न झाली होती तरुणी, पण अचानक…
Just Now!
X