राजकीय वादाला कारण ठरलेल्या ‘कोविड टूलकिट’ प्रकरणाच्या तपासासाठी दिल्लीच्या विशेष शाखेचे पोलीस सोमवारी ‘ट्विटर इंडिया’च्या दिल्ली आणि गुरुग्राम कार्यालयांत धडकले. ‘टूलकिट’प्रकरणी ट्विटरला नोटीस देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र दिल्ली पोलिसांचे पथक ट्विटर इंडियाच्या कार्यालयात पोहचल्यानंतर मागील वर्षभराहून अधिक काळापासून वर्क फ्रॉम होम असल्याने कार्यालयात कोणीच नसल्याचं त्यांना प्रवेशद्वारावरच सांगण्यात आलं. आता याचाच व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ट्विटरचं ऑफिस असणाऱ्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळच सुरक्षारक्षक दिल्ली पोलिसांच्या पथकाला वरच्या मजल्यावर पाठवण्याआधी ट्विटरचं ऑफिस सुरु आहे का तपास करण्यासाठी वरच्या मजल्यावरील व्यक्तीस सांगतात. मात्र ऑफिस बंद असल्याचं सांगितल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेतील अधिकारी इमारती बाहेरपडून गाडीने निघून जातात. यासंदर्भातील व्हिडीओ सीएनएन न्यूज १८ च्या अदित्य राज कौल यांनी पोस्ट केलाय. “दिल्ली पोलिसांच्या विशेष दलातील अधिकाऱ्यांना गुरुग्राममधून परत यावं लागलं तेव्हा त्यांना ट्विटर इंडियाचं कार्यालय बंद असल्याचं सांगण्यात आलं. ट्विटर इंडिया मागील वर्षाच्या मार्च महिन्यापासूनच वर्क फ्रॉम होम करत आहे. दिल्ली पोलिसांचं हे पथक पाठवणं म्हणजे भारत सरकारने संदेश देण्याचा प्रयत्न केलाय का?”, असं अदित्य म्हणालेत.

काँग्रेसच्या कथित ‘टूलकिट’बाबत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रसृत केलेल्या संदेशाला ट्विटरने ‘फेरफार’ प्रकारात वर्गीकृत केले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ट्विटरला रविवारी पत्र पाठवले होते. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलीस म्हणतात….

पोलिसांची दोन पथके ट्विटरच्या दिल्ली आणि गुरुग्राममधील कार्यालयांमध्ये धडकली. पोलिसांनी या कार्यालयांमध्ये छापे घातल्याची चर्चा सुरूवातीला होती. मात्र, पोलिसांनी त्याचा इन्कार केला. ‘नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून नोटीस बजावण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक ट्विटरच्या कार्यालयांत गेले. ट्विटर इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेली उत्तरे संदिग्ध असल्याने, नोटीस बजावण्यासाठी योग्य व्यक्ती कोण याची आम्हाला खातरजमा करायची होती’, असे दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी चिन्मय बिस्वाल यांनी सांगितले. पोलिसांना माहीत नसलेली काहीतरी माहिती ट्विटरकडे असल्याचे दिसते. ही माहिती तपासाकरता महत्त्वाची आहे, असे बिस्वाल यांनी सांगितले.

काँग्रेस म्हणते समाजमाध्यमांना भाजपा घाबरलं

‘‘आम्ही ट्विटरला पत्र दिले होते. ट्विटरकडे टूलकिटबाबतची कोणती माहिती आहे आणि त्यांनी त्याबाबतच्या संदेशाला फेरफार प्रकारात का टाकले, हे आम्हाला जाणून घ्यायचे होते’’, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. करोनास्थिती हाताळणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाची प्रतिमा मलिन करणारे ‘टूलकिट’ कॉंग्रेसने तयार केल्याचा आरोप भाजपने केला होता. मात्र, त्यात तथ्य नसून, चुकीची माहिती पसरवल्याबद्दल भाजप नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी कॉंग्रेसने केली होती. दरम्यान, समाजमाध्यमांच्या ताकदीला सरकार घाबरले आहे. त्यामुळे सरकार कट-कारस्थान रचत आहे, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.