ऑनलाइन शॉपिंग आता काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. हल्ली अगदी छोट्यामोठ्या गोष्टींच्या खरेदीसाठीही ऑनलाइन शॉपिंगला प्राधान्य दिलं जातं. घरबसल्या फोनवरुन ऑर्डर केली की डिलेव्हरी बॉय थेट घरी वस्तू आणून देतो. सामान्यपणे खांद्यावर लावलेली मोठी बॅग आणि हातात डिलेव्हरी करायची असणाऱ्या वस्तूंची यादी अशा अवतारामध्ये डिलेव्हरी बॉय फिरताना दिसतात. अनेक डिलेव्हरी बॉय हे मोठ्या मोठ्या आकाराच्या बॅगा खांद्यावर लावून मोटारसायकलवरुन प्रवास करताना हल्ली दिसून येतात. मात्र सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चा आहे ती वस्तूची डिलेव्हरी करण्यासाठी घोड्यावर आलेल्या एका डिलेव्हरी बॉयची.

काश्मीरमध्ये सध्या मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. यामुळेच रस्ते तसेच विमान वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. काश्मीर खोऱ्यातील सामान्य जनजीवनही विस्कळीत झालं आहे. अनेक मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने काही गावांचा संपर्कही तुटला आहे. काश्मीरमधील या बर्फवृष्टीचे फोटो सोशल नेटवर्कींगवर चांगलेच व्हायरल झालेत. मात्र या सर्व फोटोंमध्ये एका खास व्हिडीओही आहे. या फोटोत काश्मीरमधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने थेट अ‍ॅमेझॉनचा डिलेव्हरी बॉय थेट घोड्यावरुन फिरत असल्याचे दिसत आहे. या घोड्यावरील डिलेव्हरी बॉयचा व्हिडीओ छायाचित्रकार अशणाऱ्या उमर गानी यांनी पोस्ट केलाय.

उमर यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष जेफ बेझॉस यांनाही टॅग केलं आहे. तुमच्या कंपनीने टर्कीमधील अर्टुग्रुल या वेबसिरीजमधून घोड्यावरुन डिलेव्हरी करण्याची प्रेरणा घेतलीय का असा प्रश्न विचारत आहेत.

इतरही अकाऊंटवरुन हा व्हिडीओ व्हायरल झालाय.

मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने रुग्णवाहिकेसारखी अत्यावश्यक सेवाही बंद असल्याने अनेक ठिकाणी रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी पायी किंवा अंगाखांद्यावर उचलूनच प्रवास करण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे.

जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी ही बर्फवृष्टी म्हणजे नैसर्गिक संकट असल्याची घोषणा केलीय. या घोषणेमुळे सरकारला स्थानिकांना वेगवेगळ्या योजनांअंतर्गत मदत करता येणार आहे. नायब राज्यपालांच्या घोषणेमुळे नैसर्गिक संकटानंतर झालेलं नुकसान हे वेगवेगळ्या पद्धतीच्या आर्थिक मदतीच्या रुपात भरून काढण्यासाठी स्थानिकांना मदत होणार आहे.

रविवारपासून काश्मीरमध्ये सतत बर्फवृष्टी होत असून याचा मोठा फटका स्थानिकांना बसला आहे. रस्ते वाहतुकीबरोबरच हवाई उड्डाणांनाही या बर्फवृष्टीचा फटका बसला आहे. रात्री पारा शून्य अंश सेल्सियसच्या खाली असतो. उत्तर काश्मीरमधील गुलमर्गमध्ये रात्रीचं तापमान उणे १० पर्यंत घसरते.

सध्या काश्मीरमध्ये चिल्लाई कालनचा कालावधी सुरु आहे. वर्षातील ४० दिवस सर्वाधिक बर्फवृष्टी होण्याचा जो कालावधी असतो त्याला स्थानिक लोकं चिल्लाई कालन असं म्हणतात. या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये तापमान शून्य अंशाच्या आसपास असते. तसेच अनेक ठिकाणी तलावं गोठलेली असतात. यामध्ये दल लेकसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळाचाही समावेश आहे.