जगाभरातील बहुतांश देशांप्रमाणे केनिया या आफ्रिका खंडामधील देशामध्येही पितृसत्ताक कुटुंबव्यवस्था अस्तित्वात आहे. मात्र याच देशामध्ये एक असं गाव आहे जिथे फक्त महिलांना प्रवेश देण्यात येतो. खरं तर हे गाव फक्त महिलांसाठी असून येथे पुरुषांना प्रवेश नाही. विशेष म्हणजे मागील तीन दशकांपासून या गावामध्ये एकाही पुरुषाला प्रवेश देण्यात आलेला नाही.

उत्तर केनियामधील सांबुरु प्रदेशातील लोकं देशामधील इतर भागांप्रमाणे पितृसत्ताक कुटुंबव्यवस्थेचे पालन करत होते. मात्र १९९० साली ब्रिटिश सैनिकांनी लैंगिक शोषण आणि बलात्कार केलेल्या १५ स्थानिक महिलांना आश्रय देण्यासाठी या गावाची स्थापना करण्यात आली होती. रेबेका लोलोसोली या महिलेने या १५ महिलांना सुरक्षित ठेवण्याच्या हेतूने उमोजो या गावाची स्थापना केली. या गावाच्या भोवती काटेरी झाडांचे कुंपण आहे. स्वाहिली भाषेमध्ये उमोजो या शब्दाचा अर्थ एकता असा होतो. स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचार आणि गुन्ह्यांनंतरही त्यांना सुखाने आयुष्य जगता यावे म्हणून आता या गावातील इतर महिला काम करतात.  आऊट लूक इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आज हे गाव खतना प्रथमेपासून वाचण्यासाठी पळालेल्या मुली, लैंगिक अत्याचार किंवा बलात्कारासारख्या घटनांना समोऱ्या गेलेल्या महिला आणि मुली तसेच बालविवाह आणि घरगुती हिंसेला कंटाळून घर सोडून आलेल्या महिलांसाठी काम करते. येथे अशा अनेक महिला राहतात ज्यांनी स्वत:ला समाजातील अनिष्ठ प्रथा, रुढी आणि परंपरांपासून मुक्त करण्यासाठी आपले घर आणि समाज सोडला आहे.

या गावामध्ये आज ५० हून अधिक स्त्रीया आणि त्यांची मुले राहतात. प्रामुख्याने यापैकी अनेकजणी या केनियामधीलच आहेत. या भागात प्रामुख्याने मसाई जमातीचे लोकं राहतात. या जमातीमध्ये बहुपत्नीत्वाची प्रथा आजही रुढ आहे. त्यामुळेच अनेक महिलांवर अत्याचार होतात. त्यामुळेच अशा अत्याचाराला कंटाळून पळून आलेल्या महिलांना या गावात आश्रय दिला जातो. या गावाची स्वत:ची एक अर्थव्यवस्था आहे. या गावातील महिला वेगवेगळ्या नैसर्गिक गोष्टींपासून नेकलेस, बांगड्या, कानातले दागिने बनवतात आणि ते येथील केंद्रामध्ये विक्रीसाठी ठेवले जातात. अनेक पर्यटक या गावाला भेट द्यायला येतात. ते या वस्तू विकत घेतात. हे गाव अभ्याराण्याच्या सिमेत असल्याने येथे अनेक महिला पर्यटक येत असतात. वस्तूच्या विक्रीमधून मिळेल्या रक्कमेपैकी १० टक्के रक्कम गावाचा कारभार चालवण्यासाठी कर म्हणून प्रत्येक महिला देते. चाव्हडीवर बसून या सर्व महिला गावासंदर्भातील निर्णय घेतात. लोलोसोली या गावातील महिलांच्या प्रमुख आहेत.

येथील प्रौढ महिला या तरुण मुलींना खतना, गर्भपात यासारख्या गोष्टींची माहिती देतात. या गावामध्ये मुलींसाठी एक शाळाही सुरु करण्यात आली आहे. गावातील मुलींबरोबरच आजूबाजूच्या प्रदेशातील मुलींनाही या गावातील स्त्रीया महिला सबलिकरणासंदर्भातील धडे देतात. पुरुषांना प्रवेशबंदी असणारे हे जगातील आतापर्यंतचे एकमेव गाव असल्याचे सांगितले जातं.